स्टोनमन, क्रेन इंग्लंड संघात

0
100

वेस्ट इंडीजविरुद्ध एजबेस्टन येथे १७ ऑगस्टपासून खेळविल्या जाणार्‍या पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने सरेतर्फे काऊंटी क्रिकेट खेळणारा सलामीवीर मार्क स्टोनमन व हॅम्पशायरचा लेगस्पिनर मेसन क्रेन याचा समावेश केला आहे. या दोघांनी अनुक्रमे किटन जेनिंग्स व डावखुरा फिरकीपटू लियाम डॉसन यांची जागा घेतली आहे. क्रेन याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा थोडाफार अनुभव असून स्टोनमन याने अजून पदार्पण केलेले नाही. अष्टपैलू ख्रिस वोक्स याचे दुखापतीतून सावरल्यानंतर संघात पुनरागमन झाले आहे. वोक्ससाठी वेगवान गोलंदाज स्टीवन फिन याला आपली जागा सोडावी लागली आहे. २०१२ साली अँडी स्ट्रॉसने निवृत्ती स्वीकारल्यानंतर ऍलिस्टर कूकसोबत डावाची सुरुवात करणारा स्टोनमन हा १२वा खेळाडू ठरेल. २०१२ पासून निक कॉम्पटन, ज्यो रुट, मायकल कारबेरी, सॅम रॉबसन, जोनाथन ट्रॉट, ऍडम लिथ, मोईन अली, आलेक्स हेल्स, बेन डकेट, हासिब हमीद व किटन जेनिंग्स यांनी इंग्लंडच्या सलामीवीराची जबाबदारी पार पाडली आहे. परंतु, यातील एकालाही आपली जागा निश्‍चित करता आलेली नाही. विंडीजविरुद्धच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना हेडिंग्ले येथे २५ ऑगस्टपासून तर तिसरा व शेवटचा कसोटी सामना लॉडर्‌‌सवर ७ सप्टेंबरपासून होणार आहे.
इंग्लंड संघ ः ज्यो रुट, मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टोव, स्टुअर्ट ब्रॉड, ऍलिस्टर कूक, मेसन क्रेन, डेव्हिड मलान, टोबी रोलंड जोन्स, बेन स्टोक्स, मार्क स्टोनमन, टॉम वेस्ली व ख्रिस वोक्स.