स्टिफन हॉकिंग निवर्तले

0
111

महान शास्त्रज्ञ प्रा. स्टिफन हॉकिंग यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी केंब्रिज विद्यापीठानजीकच्या त्यांच्या राहत्या घरी काल निधन झाले. लुसी, रॉबर्ट व टिम या त्यांच्या मुलांनी त्यांच्या निधनाला दुजोरा देणारे निवेदन जारी केले आहे. इंग्लंडमधील ऑक्स्फर्ड येथे १९४२ साली जन्मलेल्या व विश्‍वरचना शास्त्रज्ञ म्हणून जगप्रसिद्ध ठरलेल्या हॉकिंग यांचे जीवन स्तिमित करणारे ठरले. प्रा. हॉकिंग यांना आल्बर्ट आईन्स्टन पुरस्कारासह वुल्फ पुरस्कार, कॉपले पदक, फंडामेंटल फिजिक्स असे अत्यंत प्रतिष्ठेचे पुरस्कार लाभले. मात्र नोबेल पुरस्काराने त्यांना हुलकावणी दिली.

आकाशातील कृष्ण विवरे कशी तयार होतात याविषयी व अन्य अनेक गूढ रहस्यांची उकल करण्यासाठी त्यांना अविरत संशोधन केले. ब्रिटिश नागरिक असूनही २००९ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकेचे सर्वोच्च असे प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रिडम हे पदक त्यांना बहाल केले होते. प्रा. हॉकिंग यांना मोटार न्युरॉन या असाध्य रोगाने पछाडले असल्याचे १९६३ साली त्यांच्या वयाच्या २१ व्या वर्षी निदान झाले होते. सर्वसामान्यपणे असा रुग्ण जास्त काळ जगू शकत नाही. मात्र हॉकिंग र्दीघ जीवन जगले व एक असामान्य संशोधक म्हणून नाव कमावले. स्नान, कपडे घालणे, खाणे तसेच बोलणे अशा सर्वच बाबतीत परावलंबी असूनही व्हिलचेअरवर बसूनच हॉकिंग यांनी संशोधनाचे अद्वितीय कार्य केले. मानवी जिद्द आणि उत्सुकता यांचे हॉकिंग हे मूर्तीमंत प्रतीक ठरले.