स्कॉटलंडचा ५-० असा खुर्दा

0
106

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या मिश्र सांघिक बॅडमिंटन प्रकारात भारताने काल शुक्रवारीदेखील आपली अपराजित घोडदौड कायम राखत स्कॉटलंडचा ५-० असा पराभव करत ‘अ’ गटात अव्वल स्थानासह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाने महिला एकेरीचा सामना जिंकून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ज्युली मॅकफेरसन हिचा तिने २१-१४, २१-१२ असा एकतर्फी पराभव केला. विजयासाठी तिला अधिक घाम गाळावा लागला नाही. पुरुष एकेरीत मात्र किदांबी श्रीकांतला पहिल्या गेममध्ये कडव्या प्रतिकाराला तोंड द्यावे लागले. श्रीकांतने दुसरा गेम एकतर्फी जिंकून सामना २१-१८, २१-२ असा जिंकत भारताची आघाडी २-० अशी दुप्पट केली.

अश्‍विनी पोनप्पा व सिक्की रेड्डी यांनी यानंतर कर्स्टी गिलमोर व एलेनोर ओडोनेल जोडीला डोके वर काढू न देता २१-८, २१-१२ असा हरवून भारताची आगेकूच निश्‍चित केली. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी या आश्‍वासक जोडीने पॅट्रिक मॅकचुग व ऍडम हॉल यांना अटीतटीच्या सामन्यात २१-१६, २१-१९ असा सरळ दोन गेममध्ये धक्का दिला. मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा व सिक्की रेड्डीने मार्टिन कॅम्पबेल व ज्युली मॅकफेरसन यांना २१-१७, २१-१५ असा हादरा देत स्कॉटलंडला अखेरपर्यंत विजयापासून वंचित ठेवले.