सौर ऊर्जेवरील फेरीबोटी लवकरच : नदी परिवहन मंत्री

0
97
????????????????????????????????????

सौर ऊर्जेवर चालणार्‍या दोन फेरीबोटी बांधणीसाठी लवकरच निविदा जारी केली जाणार आहे. या फेरीबोटी पणजी ते हळदोणा आणि पणजी ते सावर्डे या जलमार्गांवर चालविण्यात येणार आहे, अशी माहिती नदी परिवहन मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल दिली.

नदी परिवहन खात्याच्या तीन नवीन फेरीबोटींचे उद्घाटन केल्यानंतर नदी परिवहन मंत्री ढवळीकर बोलत होते. नवीन फेरीबोटी रायबंदर ते चोडण, मडकई ते कुठ्ठाळी आणि पणजी ते बेती या जलमार्गांवर चालविण्यात येणार आहेत. तीन फेरीबोटींच्या बांधकामावर अंदाजे १.९ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. नदी परिवहन खात्याकडे पाच फेरीबोटी गंजलेल्या आहेत. या पाच फेरीबोटी भंगारात काढून नवीन फेरीबोटी बांधण्याचे काम चालू आर्थिक वर्षात हाती घेतले जाणार आहे, असेही मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.

केरळ येथील सौर ऊर्जेवर चालणार्‍या फेरीबोटींची पाहणी काही महिन्यांपूर्वी केली होती. त्यानंतर गोव्यात सौर ऊर्जेवर चालणार्‍या फेरीबोटी सुरू करण्याबाबत अहवाल सादर करण्याची सूचना अधिकार्‍यांना करण्यात आली होती. सौर ऊर्जेवरील फेरीबोटी सुरू करण्याबाबतचा अहवाल प्राप्त झाला असून सौर ऊर्जेवरील फेरीबोटी बांधण्यासाठी लवकरच निविदा जारी केली जाणार आहे.