सौंदर्यवादी कवी बाकीबाब

0
535
–  पुष्पाग्रज
बाकीबाबांचा उद्या स्मृतिदिन. ज्यांचं स्मरण होतं, त्याना मरण नसतं असं म्हणतात. बाकीबाब तर या सृष्टी आणि समष्टीच्या कणाकणात सामावून गेलेले आहेत. बोरकरांच्या निसर्ग आणि प्रेमकवितांचं एवढं मोठं गारूड मराठी काव्यरसिकांवर व्यापून राहिलं होतं की, ते काव्यगायनासाठी व्यासपीठावर नुसते उभे राहिले तरी टाळ्या आणि गजरांच्या सरीवर सरी सभागृहात कोसळायच्या. मुळात कविता हाच बाकीबाबांचा श्‍वास होता आणि तोच त्यांचा ध्यास होता.
कविवर्य बा. भ. बोरकर हे गोमंतशारदेला पहाटेला पडलेलं एक सुंदर स्वप्न होतं. पुढे जाऊन हे स्वप्न सत्यात उतरलं आणि अवघ्या महाराष्ट्राला ललामभूत ठरलं. बाकीबाबांचा उद्या स्मृतिदिन. ज्यांचं स्मरण होतं, त्याना मरण नसतं असं म्हणतात. बाकीबाब तर या सृष्टी आणि समष्टीच्या कणाकणात सामावून गेलेले आहेत. निसर्गाशी इतका एकरूप झालेला दुसरा कवी महाराष्ट्रात नाही. बोरकरांच्या निसर्ग आणि प्रेमकवितांचं एवढं मोठं गारूड मराठी काव्यरसिकांवर व्यापून राहिलं होतं की, ते काव्यगायनासाठी व्यासपीठावर नुसते उभे राहिले तरी टाळ्या आणि गजरांच्या सरीवर सरी सभागृहात कोसळायच्या. मुळात कविता हाच बाकीबाबांचा श्‍वास होता आणि तोच त्यांचा ध्यास होता.
बोरकरांवर लहानपणी पोथ्या, पुराणे, भजन, ओव्या, लोकगीतांचे जे संस्कार झाले त्यांवर आजवर अनेकांनी लिहिले आहे. त्यातून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते ती बालपणापासूनच आपल्या अवतीभवतीच्या घडामोडींकडे आणि विशेषतः अभंग, शिगम्यातल्या जती, रेंदेराच्या उत्स्फूर्त गाण्यातील लय, ताल आणि नादाकडे चिकित्सकपणे पाहाण्याची त्यांची वृत्ती होती. त्यामुळे गुणगुणणे आणि असे गुणगुणतानाच अभिव्यक्त होणे हा त्यांचा स्थायिभाव झाला. बाकीबाबांच्या वाचनात सर्वात प्रथम जी एक ओळ आली आणि दोन दिवस ते त्या ओळीने भारावून गेले, ती ओळ अशी होती-
‘असें कसें मज पिसें असें हे दिसें वसें मनीं सुलोचना’ या ओळीतील यमक, अंतर्यमक, प्रास, अनुप्रासाने गुंग झालेल्या बाकीबाबांच्या वृत्तीच स्पष्ट होतात. आपण आजपासून साधारणपणे ८०-९० वर्षांपूर्वीच्या सांस्कृतिक गोव्याचा काळ अंदाजाने जरी आठवला तर आजच्यापेक्षा तो निश्‍चितच समृद्ध होता. आज आपल्या प्रत्येक उत्सवाचा ऑर्केस्ट्रा झाला आहे. निरामय, सत्त्वशील सामाजिक, सांस्कृतिक वातावरणात केवळ बोरकरच नव्हे तर अनेक गोमंतकीय कलावंत, गायक, नट, चित्रकार, लेखकांच्या मनाचे भरण-पोषण झाले. संतसाहित्याचा अभ्यास आणि पोर्तुगीज राजवटीमुळे लॅटिन संस्कृतीचा प्रभाव यामुळे बोरकरांच्या कवितेचे एक आगळे रसायन तयार झाले. मराठी काव्यरसिकांसाठी हा अनुभव नवा होता. एकाचवेळी आपले बाहू चौदिशांना फैलावून अवघा निसर्ग अध्यात्माच्या स्तरावर आणणे आणि त्याचवेळी ऐहिकतेच्या स्तरावर येऊन स्त्रीदेहाच्या लेण्यांची चिरंतन पारायणे करणे, हे केवळ बोरकरच करू शकत होते. कवितेचा कंद सांस्कृतिक श्रीमंतीने जाळणारा, निसर्ग स्तोत्र, पर्जन्य स्तोत्र आळवणारा, ज्ञानदेव, तुकाराम, बहिणाबाईना सगे-सोयरे मानणारा हा कवी कामिनीच्या मादकतेचे, तिच्या आव्हानसूचक शरीर विभ्रमाचे रसरशीत चित्र तेवढ्याच तन्मयतेने काढीत असे-
उन्नत चंचल नववक्षस्थल
चाल मस्त ही पद उच्छृंखल
तुडवीत जाशी मदनाचे दल
जणू झाडाचा पाला ग
उन्मादक स्त्रीसौंदर्याचा गौरव करताना बोरकरांची कविता लाजत नाही असं व. दि. कुलकर्णी एके ठिकाणी म्हणतात. अत्युच्च प्रतिभाशक्ती लाभलेल्या बोरकरांच्या रंग-रूप-गंध, नाद आणि स्पर्शाच्या संवेदना अत्यंत तीव्र होत्या. बोरकरांच्या कवितेतील नादमाधुर्य हा तर स्वतंत्र विषय आहे. या लय, ताल आणि नादानेच सर्वांना नादावून टाकले होते. त्यांचे शब्द बोलके असायचे. त्यांची कविता वाचतानादेखील हे शब्द ऐकू यायचे. जसे की-
चांदणकाळी आंदणवेळ
जग सगळे टिपर्‍यांचा खेळ
सृष्टीवरती करिते वृष्टी
स्वरपुष्पांची अमृतवेल
फाल्गुन महिन्याच्या चांदण्यारात्री गोव्यात सर्व गावांत पूर्वी शिगमोत्सवाची तयारी म्हणून ‘टिपर्‍या’ खेळल्या जायच्या. माझं बालपण खेडेगावात गेल्याने हा टिपर्‍यांचा आवाज अजून माझ्या स्मृतिकोशात दडून आहे.
त्यांच्या ‘सरींवर सरी…’मधील गोपी सचैल न्हाल्यानंतर-
गोपी झाल्या भिजून चिंब
थरथर कापति निंब-कदंब
घनांमनांतून टाळ-मृदंग
तनूत वाजवि चाळ अनंग
पाने पिटिती टाळ्या ग
सरिंवर सरी आल्या ग…
या कवितेतील ‘पाने पिटिती टाळ्या’ यातील पानांनी टाळ्या पिटण्याचा आवाज एखाद्या बहिर्‍या वाचकालाही ऐकू यावा इतका लाऊड आहे. एखादं दृष्य आपल्या शब्दकळेने जिवंत उभं करण्याची अलौकिक ताकद त्यांच्यात होती. ‘येणारच नेणारा| जाणारच होडी| भरतीला जोर चढे वेळ उरे थोडी’ या ओळी वाचताना या होडीचे लाटांवरचे हिंदकळणे आपल्याला जाणवल्याशिवाय राहात नाही. या शब्दप्रभूला शब्दांसाठी अडखळणे कधी जमलेच नाही. ‘समुद्रबिलोरी ऐना| सृष्टीला पाचवा म्हैना॥ वाकले माडांचे माथे| चांदणे पाण्यात न्हाते| आकाशदिवे लावीत आली कार्तिक नौमीची रैना॥ अशी त्यांची स्वच्छंद शब्दयोजना असे. बाकीबाब आपली कविता नेहमी गाऊन सादर करायचे; आणि त्यानी ती म्हटली नाही तरी ती गातगातच वाचावी अशी होती. त्यांच्या शब्दाशब्दांत स्वर पेरलेले असायचे. बोरकरांच्या कवितासंग्रहाची नावेच पहा- जीवनसंगीत, आनंद भैरवी, चित्रवीणा, गीतार इत्यादी.
बोरकरांच्या कवितेचे नाणे तर खणखणीत होतेच, परंतु ते वाजवून दाखवण्यातही त्याना काही गैर वाटत नसे. मराठी प्रांतात त्यांचा सर्वत्र संचार असायचा. त्यांचा मित्रपरिवारही मोठा होता. कविता सादरीकरणासाठी त्यांना मोठं व्यासपीठच हवं होतं असं नाही, कुठल्याही छोट्या बैठकांत किंवा एखाद्या कुटुंबात काव्यगायनात ते रमून जात. बोरकरांना तसे कमी आयुष्य मिळाले, परंतु जे जगले ते सर्वांगांनी त्यांनी उपभोगले. स्त्रीसौंदर्याचे ते उपासक होते. खाण्या-पिण्याच्या बाबतीतरही ते चिकित्सक होते. त्यांचे मत्स्यप्रेम भल्याभल्या मत्स्यप्रेमींना शरण आणणारे होते. पु.लं.ना ते एकदा म्हणालेही होते की आयुष्यभर मी या मासळीवर जगलो, मी मेल्यावर मला समुद्रात टाका. आता माझ्यावर या मासळीला काही काळ जगू द्या.
द्राक्ष आणि रुद्राक्ष संस्कृती
बोरकरांचं मद्यप्राशनही तसं सर्वश्रूत होतं. परंतु ते बेताल नव्हतं. त्यांचे डोळे कायम कवितेच्या धुंदीत असायचे. पुण्यात सकाळी आठ वाजताच्या एका कार्यक्रमात दत्तो वामन पोतदार बोरकरांना भेटले. त्यांनी बाकीबाबाना थोडं बाजूला नेऊन विचारलं, ‘‘बोरकर, तुम्ही इथं मद्य पिऊन आलात काय? इतके धुंद डोळे…!’’ बोरकर म्हणाले, ‘‘छे हो! सकाळचे आठ वाजताहेत. ही काय पिण्याची वेळ आहे?’’ पुढे जाऊन बोरकर म्हणाले, ‘‘दत्तोपंत, धुंदीसाठी बोरकराना प्यावी लागत नाही. मी जन्माला येतानाच ही धुंदी बरोबर घेऊन आलो आहे.’’ (बाकीबाबांचे जवळचे मित्र कविवर्य मंगेश पाडगावकरांनी ही आठवण लिहून ठेवली आहे.)
बाकीबाबांचं व्यक्तिमत्त्व व्यामिश्र होतं. अध्यात्मावर त्यांचा पिंड पोसला गेला होता. तशा उच्चप्रतीच्या रचनाही त्यांच्या हातून घडल्या. परंतु त्यांनी स्वतःच लिहून ठेवलंय की, ‘रसलंपट मी, तरि मज अवचित गोसावीपण भेटे’ किंवा ‘स्वर्ग नको, सूरलोक नको, मज लोभस हा इहलोक हवा.’
ऐहिकता आणि आध्यात्मिकता, भोग आणि त्याग, द्राक्षसंस्कृती आणि रुद्राक्षसंस्कृती यांचं मिश्रण त्यांच्या कविप्रकृतीत आढळतं. अरुणा ढेरे त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात, ‘प्रणयाचे विलक्षण अद्भुत रंग त्यांनी स्त्रीभोवती उधळले. तिला कधी त्यांनी देवता म्हटलं, कधी बेगम. तिच्या शरीर-सतारीवर त्यांनी प्रीतीचे मधुर बोल उमटवले. अतिशय धुंद आणि उत्कट अशा मस्तीचं प्रेम त्यांच्या कवितेतून उसळत राहिलं. अशी किमया सौंदर्यवादी कवीनी बोरकरांआधी कुणी घडवली नव्हती असं नाही, पण बोरकरांनी ती इतक्या उत्कट आणि धुंदपणे घडवली की, तसा अनुभव त्याच्या आधी आणि नंतर कुणी दिला नाही.’
बोरकर सौंदर्यवादी कवी होते. त्यांनी विपूल प्रेमकविता, निसर्गकविता लिहिली. आधुनिक मराठी कविता तथा नवकवितेशी मात्र त्यांचा सूर तितकासा जुळू शकला नाही. खरं म्हणजे साठोत्तरी कवितेच्या आसपास मराठी कविता बदलत होती. याच काळात कवी अनिल, कुसुमाग्रज, पु. शि. रेगे, मर्ढेकर, विंदा करंदीकर, वसंत बापट, मंगेश पाडगावकर आदी कवी ज्याप्रकारची कविता लिहीत होते त्यापासून बोरकरांची कविता अलिप्त दिसत होती. बोरकर आपल्या भावनुभवाशी प्रामाणिक राहून आपली कविता लिहीत राहिले. दुसर्‍या महायुद्धानंतर जगण्याच्या संघर्षात निर्माण झालेले ताण-तणाव, बदलत चाललेली जीवनमूल्ये, आहे रे आणि नाही रे यांच्यातील झगडा बोरकरांच्या कवितेला स्पर्श करू शकला नाही. जीवनव्यापार, लौकिक जीवनातील समस्यांकडे लक्ष देण्याची त्यांची प्रवृत्तीही नव्हती असं निरीक्षण प्रभा गणोरकर नोंदवतात. त्यांची कविता आत्मविष्काराधिष्ठित, भावकाव्याच्या रूपातच प्रकटत राहिली. परंतु त्यातूनही वाचकांना जो आनंद मिळाला तो अमर्याद आणि अननुभूत असाच होता. तमाम गोमंतकीयांनी अभिमान बाळगावा असा हा महान कवी; मात्र त्यांच्या भाषावादातील भूमिकेमुळे विशिष्ट वर्गात जी कटुता निर्माण झाली ती शेवटपर्यंत तशीच राहिली. कदाचित या वादामुळेच बाकीबाब मराठीत साहित्य अकादमी तसेच अ. भा. मराठी साहित्य संमेलनापासूनही वंचित राहिले असावेत. तथापि, त्यांची कविता आजही मराठी जनमानसावर अधिराज्य करून आहे हे निःसंशय!
जाताजाता बाकीबाबांची एक आठवण मला या ठिकाणी सांगावीशी वाटते. त्यावेळी मी चौगुले कॉलेजात शिकत होतो. बस न मिळाल्याने कॉलेजकडून मी चालत विद्यानगरच्या बाजूने चाललो असता एका गाडीवाल्याने मला लिफ्ट दिली. कुणा धनाढ्याघरच्या मुलीला कॉलेजात पोचवून परतणारा तो ड्राईव्हर होता. बाबू नायकांच्या घराकडे आम्ही पोहोचलो आणि बसथांब्यावर उभे असलेले बाकीबाब मला दिसले. मनात म्हटलं, आता बाकीबाबांबरोबरच बसने पुढे जायचे. त्याआधी रामनाथीच्या कविता शिबिरात तीन दिवस मला त्यांचं सान्निध्य लाभलं होतं. अधूनमधून एखाद्या कविसंमेलनातही या थोर कवीची भेट घडत होती. मी गाडी थांबवून खाली उतरलो असता ‘अरे पुष्पाग्रज, पुष्पाग्रज’ अशा हाका मारीत ते गाडीपर्यंत आले. मागून त्यांच्या अर्धांगिनी आल्या. म्हणता म्हणता त्यांची मोलकरीणही आली. मी काही बोलण्याआधीच सगळी मंडळी गाडीत स्थानापन्न झाली. त्या ड्राईव्हरला एकंदर प्रकार कळून चुकला, पण त्याने तक्रार केली नाही. मी माझ्या खिशातील वीस रुपयांची नोट हळूच त्याच्याकडे सरकवली. बाकीबाबांच्या गप्पा सुरू झाल्या. मला म्हणाले, चल आपण मासळी बाजारात जाऊ. ताजी मासळी कशी निवडायची हे मी तुला शिकवतो. मडगावात पोचल्यावर मात्र खरी गोष्ट मला त्यांना सांगावी लागली. काही हरकत नाही म्हणत मला घेऊन ते बाजारात गेले.
 कुटुंबाला कुणाच्या तरी दुकानी बसवले आणि खरोखरच ताजी फडफडीत मासळी घेऊन नंतर रिक्षाने कुटुंबासहीत ते कुणातरी नातेवाईकाच्या घरी गेले. तीस वर्षांपूर्वीची ही इवलीशी भेट, पण ती काल घडल्यासारखी आजही माझ्या स्मरणात बसून आहे.