सोहळ्यांची शालीनता हरवतेय!!

0
165

– ओंकार व्यं. कुलकर्णी
खडपाबांध, फोंडा

लग्न हा फक्त एक संस्कार नसून त्या पलीकडे बरंच काही आहे.., किंबहुना आपण ते करून ठेवलं आहे. काहीतरी वेगळं दाखविण्याच्या नादात आपण त्या संस्काराची, सोहळ्याची शालीनताच गमावून बसलोय, असं वाटतं बर्‍याचवेळी!!

हुश्श! लग्नाचा हंगाम संपला (एकदाचा)! मसालेदार जेवण, झगझगीत कपडे, कलकलाट-गोंगाट, डोळे दीपविणारी रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि असं बरंच काही. निदान या हंगामापुरतं तरी संपलं. यंदाच्या हंगामात बरंच काही अनुभवलं. नव्या गोष्टी पाहिल्या.. नजरेस पडल्या.. ऐकण्यात आल्या.. त्या जशा आठवतील तशा लिहिण्याचा प्रयत्न करतो. पण एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली आणि ती म्हणजे लग्नसमारंभ हा एक निव्वळ संस्कार नसून त्यापलीकडेही ‘‘बरंच काहीतरी’’ आहे!

बॉलिवूड चित्रपटांपासून प्रेरणा घेऊन म्हणा किंवा काहीतरी वेगळं करण्याच्या नादात हल्ली आपण सर्रास डीजे, संगीत-मेहंदी असे प्रकार करतो. ते चूक का बरोबर हे मी ठरवू शकत नाही. पण अमक्यानं केलं म्हणून आपणही तेच करणं कितपत् योग्य आहे?…

लग्नातील विधींपेक्षा जास्त आपलं फोटोंवर लक्ष असतं. ‘परफेक्ट क्षण’ टिपण्यासाठी फोटोग्राफरही धडपडत असतो. त्यामुळं बर्‍याच वेळेला एकाच ‘पोझ’मध्ये नवरा-नवरीला थांबावं लागतं. फोटोसाठी लग्न की लग्न आहे म्हणून फोटो… कळत नाही. बर्‍याच वेळा भटजींपेक्षा जास्त विधी फोटोग्राफरला माहीत असतात. ‘‘भटजी, होम करताना फणसाचं लाकूड घालू नका. धूर जास्त होतो…’’ सप्तपदीच्या वेळी मंत्र म्हणताना… भटजींना… ‘‘दूर थांबा, फ्रेममध्ये येता..’’ अशा सूचना येतात. ‘परफेक्ट क्षण’ टिपण्यासाठी फोटोग्राफरची सर्कसच सुरू असते, किंबहुना फोटोग्राफरचा अशावेळी ‘रिंगमास्टरच’ होतो म्हणा, हवं तर..!

लग्नसमारंभ आणि स्वागत समारंभ यामध्ये एक विशेष फोटोसेशन असते. नंतर घामवगैरे येऊन मेक-अप बिघडला तर फोटो खराब येतात. त्यामुळे लग्नासाठी आलेल्या लोकांना तासन्‌तास ताटकळत ठेवून आधी फोटो काढले जातात.

… अशा वेळी माझ्या पोटात असंख्य कावळे लाऊड स्पीकर घेऊन ‘काव कावतात’. अशा वेळी असले हिंस्त्र विचार मनामध्ये येतात म्हणून सांगू!!

हल्लीतर ‘सेल्फी’ नावाचं नवं फॅड आलंय. वर किंवा वधुचे मित्र-मैत्रिण स्टेजवर एकत्र जमून वेगवेगळ्या अँगलने सेल्फी काढतात. असले ‘सेल्फीश’ लोक असतात म्हणून सांगू हे! जो तो प्रत्येक जण स्वतःच्या मोबाइलवरून सेल्फी काढतो. बाकीचे लोक थांबू देत रांगेत… अरे, फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर आहे ना!!

सभागृहाच्या समोरच्या दोन-तीन रांगांमध्ये मावशी-आत्या-मामी यांची टोळी बसलेली असते. यांना नवरा-नवरीला ओवाळून घेतल्यानंतर फार काही कामं नसतात. मग उगाचच तिथे बसून वेळ घालवण्यासाठी या काहीतरी उद्योग सुरू करतात.

… त्यांचा आवडता उद्योग म्हणजे ‘जोड्या जुळवणे’. एका लग्नात दुसर्‍याचं लग्न जमविल्याशिवाय ते लग्न पूर्ण होत नाही, असा यांचा भाबडा समज! मग घरात कोण लग्नाचं आहे याची यादीच या घेऊन बसतात. समोरच्या पार्टीमध्ये मग यांचं शोधकार्य सुरू होतं.

हे झाल्यानंतर दुसरा उद्योग म्हणजे नवरीच्या दागिन्यांकडे निरखून पाहणे! किती, कसले, किती वजनाचे दागिने, जमलंच तर सोनार कोण? आज्जीचेच दागिने पॉलिश करून घातलेत बहुधा..! मग आपलाच सोनार कसा चांगला… अशा अनेक विषयांवर यांचे परिसंवाद घडतात आणि एवढं सगळं बोलून झाल्यानंतर एक-ग्रामवाले दागिने कसे चांगले हे बोलून हा विषय संपवतात.

घरातले जे पुरुष लोक असतात त्यांना तर अजिबातच काही कामं नसतात. त्यामुळे या लोकांनी स्वतःसाठी एकमेव उद्योग शोधलेला असतो आणि तो म्हणजे सर्वांत आधी ‘‘जेवणावर तुटून पडणे’’. भरपेट जेवण जेवून शेवटी ठेवलेलं पान चघळत त्याच पानाला लावलेल्या टूथपिकने दात कोरत कुठल्यातरी फॅनखाली ही मंडळी चर्चासत्रात रमलेली असतात. यांचे प्रमुख विषय म्हणजे राजकारण, क्रिकेट आणि पे कमिशन! यांची राजकारणाविषयीची मतं कुणी ऐकली तर जणू काय पार्टी हायकमांड यांच्याच संपर्कात राहून निर्णय घेतात असं वाटतं! क्रिकेटविषयीचे ‘एक्सपर्ट कमेंट’ऐकून साक्षात तेंडुलकरसुद्धा यांच्याकडे शिकवणी लावेल, अशा अविर्भावात आणि तावातावात हे लोक बोलत असतात. २-३ तासांच्या गहन चर्चेनंतर या लोकांना परत भुकेची जाणीव होते आणि यांचे पाय आपसुकच बुफेकडे वळतात. बाकी काही म्हणा, ही बुफेची पद्धत अजबच आहे. आपल्या पारंपरिक पंगतीला आपण कालबाह्य ठरवलं आणि बुफे पद्धत स्वीकारली. पण या बुफेमुळे आपली मांडी घालून बसण्याची सवयही मोडली आणि मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडीदेखील सुरू झाली.

… मग थोड्या वेळानं आत्या-मावश्या-मैत्रिणी या गोल रिंगण करून गप्पा मारत जेवायला बसतात. या सगळ्यांची एकमेव खासियत म्हणजे कोणीही जेवताना सोबत पाणी घेऊन बसत नाहीत. मग जवळच असलेल्या एखाद्या तरुण मुलाची या कामासाठी वर्णी लागते. मग पाणी… ते आइसक्रीम… अशा अनेक गोष्टींचा त्या टोळीला पुरवठा करण्यासाठी या मुलाची धावपळ सुरू असते. हे सगळं झाल्यानंतर ‘‘तुला एक चांगली बायको मिळू दे.’’ असा आशीर्वाद देऊन हा सगळा गोतावळा उठतो आणि पुन्हा भावी वधु-वर संशोधन कार्य सुरू होतं.

असे अनेक अनुभव आपणा सर्वांनाच अशा समारंभातून येत असतात. पण आधीच म्हटल्याप्रमाणे लग्न हा फक्त एक संस्कार नसून त्या पलीकडे बरंच काही आहे.., किंबहुना आपण ते करून ठेवलं आहे. काहीतरी वेगळं दाखविण्याच्या नादात आपण त्या संस्काराची, सोहळ्याची शालीनताच गमावून बसलोय, असं वाटतं बर्‍याचवेळी!!