सोशल मीडिया आणि मतनिर्मिती

0
203
  • ऍड. प्रदीप उमप

सोशल मीडियाला आधारशी लिंक करण्याची योजना सरकारच्या विचाराधीन आहे. यामागे सोशल मीडियाचा गुन्हेगारीसाठी होणारा वापर हे मुख्य कारण आहे. तथापि, सोशल मीडियाबाबत गोपनीयतेसंदर्भातीलही अनेक मुद्दे चर्चेत आहेत. तसेच सोशल मीडिया हा आज राष्ट्रीय मत बनवण्याचे काम करण्यात मोठा हातभार लावत आहे, ही बाब सर्वांनीच विचार करण्याजोगी आहे.

एखाद्या मुद्द्यावर देशातील जनमत जाणून घेण्यासाठी पूर्वी बराच काळ सातत्यपूर्ण प्रयत्न करावा लागत असे. या प्रयत्नांत प्रदीर्घकाळ सक्रियता असणे गरजेचे होते. एवढेच नव्हे तर उत्साह न गमावता एकच गोष्ट अनेक व्यासपीठांवरून वारंवार सांगावी लागत असे. अशा प्रकारे बरेच प्रयत्न केल्यानंतर एखादी गोष्ट समाजात पोहोचत असे किंवा एखाद्या गोष्टीवर समाजात व्यापक विचारविनिमय सुरू होऊ शकत असे. आता इतके परिश्रम करावे लागत नाहीत. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून अवघ्या २४ तासांत देशवासीयांची मानसिकता तयार केली जाऊ शकते किंवा बिघडवलीही जाऊ शकते. सोशल मीडिया ही अशी ताकद आहे, जिच्यामुळे एखादा विचार क्षणार्धात जगभरात पोहोचविता येतो आणि एखाद्या विषयावर काही तासांच्या अवधीत विचारविनिमयही सुरू होऊ शकतो.

पूर्वी एखाद्या समाजाची मानसिकता तयार करण्यासाठी प्रदीर्घकाळ काम करावे लागत असे. एवढे करूनसुद्धा एखाद्या विषयासंदर्भात समाजाची एकंदर मानसिकता काय आहे, याचा अचूक अंदाज घेता येत नसे. परंतु आता हे काम अवघ्या काही तासांचे आहे. भारतात गेल्या वर्षीपर्यंत सुमारे ७६ कोटी मोबाइल ङ्गोन होते. त्यातील ३३.७ कोटी स्मार्टङ्गोन होते. अर्थातच, हे असे स्मार्टङ्गोन आहेत, ज्यांच्या मदतीने लोक बराच काळ ऑनलाइन राहतात आणि क्षणोक्षणी घडणार्‍या घटना त्यांच्यापर्यंत पोहोचत राहतात. मोठ्या संख्येने स्मार्टङ्गोन कार्यान्वित झाल्याने सोशल मीडिया हे एक सक्षम व्यासपीठ म्हणून उदयास आले. एके काळी हे अभिव्यक्तीचे पर्यायी माध्यम होते. परंतु आज या माध्यमाचा आकार इतका विस्तारला आहे की, एखाद्या मुद्द्यावर देशातील जनतेची अनुकूल आणि प्रतिकूल मते किती प्रमाणात आहेत, याचा वेध अल्पावधीत घेता येतो, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही.

देशात आज एखाद्या विषयावर क्षणार्धात मत तयार होते किंवा एखादा मुद्दा क्षणार्धात हवेत विरूनही जातो. जिथे युवावर्ग मोठ्या प्रमाणावर स्मार्टङ्गोन आणि सोशल मीडियाचा वापर करतो असा चीनच्या खालोखाल भारत हा दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे. अर्थात, चीनच्या तुलनेत भारतीय युवकांची संख्या कमी असली, तरी इतर अनेक बाबतीत भारतीय युवक जगात पुढे आहेत. उदाहरणार्थ, मोबाइलमध्ये इंटरनेटचा वापर करणारे ७० टक्के युवक आपल्या स्मार्टङ्गोनच्या माध्यमातून सतत जगाच्या संपर्कात असतात. एवढेच नव्हे तर सोशल मीडियावरही सतत सक्रिय असतात. सोशल मीडियावर केवळ त्यांची उपस्थिती नसते तर अनेक चर्चांमध्ये युवक सहभागी होतात आणि आपली बाजू मांडतात. या बाबतीत भारतीय युवक सर्वांत आघाडीवर आहेत. कारण भारतीय युवकांची राजकीय जाण आणि सामान्यज्ञान अधिक असते. याच कारणामुळे भारतीय युवक जगातील अनेक देशांमधील युवकांच्या तुलनेत कमी डाटा खर्च करीत असले तरी अनेक बाबतीत प्रतिक्रिया व्यक्त करतात. प्यू रिसर्च सेंटरने युवकांकडून इंटरनेटच्या केल्या जाणार्‍या वापराविषयी केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे की, युवा पिढी इंटरनेटच्या माध्यमातून केवळ सोशल मीडियावरच अधिक सक्रिय आहे असे नव्हे तर सोशल मीडिया सर्व अंगांनी महत्त्वपूर्ण बनविण्यात युवकांचा मोठा वाटा आहे. देशातील प्रत्येक मुद्दा केवळ समजून न घेता त्यावर आपले मतप्रदर्शन करण्यात युवक आघाडीवर आहेत. प्रत्येकजण आपले मत मांडून एखाद्या विषयावर सर्वसमावेशक चर्चा घडवून आणण्यात आपला वाटा उचलतो. भारतात १८ ते ३६ वर्षे वयोगटातील युवक सोशल मीडियावर अधिक संख्येने सक्रिय आहेत.

आजमितीस देशात एक अब्जाहून अधिक मोबाइल आणि स्मार्ट ङ्गोन आहेत. तसेच १८ लाखांहून अधिक मोबाइल स्टेशन आहेत. आज कोणताही राजकीय पक्ष आपला कार्यक्रम सांगण्यासाठी किंवा आपली भूमिका लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी रस्त्यावर उतरण्याऐवजी सोशल मीडियाचे माध्यम हाताळण्यावर भर देतो. कारण या माध्यमाचा प्रसार स्मार्टङ्गोनच्या माध्यमातून देशाच्या ६० टक्के जनतेपर्यंत झाला आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, यापूर्वी संवादाची किंवा संपर्काची जेवढी माध्यमे होती, ती हरघडी लोक आपल्यासोबत बाळगू शकत नसत. उदाहरणार्थ टीव्ही पाहून झाल्यावर तो बंद केला जातो. तो सोबत घेऊन कुणी जात नाही. परंतु आता संवादाची अनेक माध्यमे मोबाइलमध्येच आली आहेत. त्यामुळे आजकाल लोक २४ तास देशात आणि जगभरात घडणार्‍या घटनांशी अवगत असतात. अन्य एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, ७४ टक्के भारतीय आपला स्मार्टङ्गोन शेजारी घेऊनच झोपतात आणि त्यापैकी एक तृतीयांश लोक रात्री कधीही जाग आली तरी सर्वांत आधी ङ्गोनमधील नोटिङ्गिकेशन चेक करतात.

लोकसंचार माध्यमे सतत सक्रिय असण्याच्या या काळात कोणत्याही मुद्द्यावर लोकांची भूमिका आणि प्रतिक्रिया तातडीने समजणे शक्य झाले आहे. परंतु हे केवळ मत नसते, तर सोशल मीडियावर द्विपक्षीय संवाद आणि संचाराची सुविधा असल्यामुळे त्यावर होणार्‍या मंथनातून एक सर्वसाधारण राष्ट्रीय भूमिका तयार होते. एक निर्णायक मूड तयार होतो. २०१७-१८ च्या सुरुवातीच्या काळात ङ्गेसबुकवर दरमहा १५ कोटींपेक्षा जास्त लोक दोन ते चार तास व्यतीत करीत असत. आता ही संख्या वाढून २० ते २१ कोटी एवढी झाली आहे आणि ङ्गेसबुकवर व्यतीत केला जाणारा सरासरी वेळही वाढून ३ तास २५ मिनिटे एवढा झाला आहे. त्याचबरोबर व्हॉट्‌स ऍप हेही जनमत तयार करण्याचे एक प्रभावी माध्यम बनले आहे. दोन वर्षांपूर्वी १६ कोटी लोक व्हॉट्‌स ऍपने जोडले गेले होते. आज ही संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. एकंदरीत सोशल मीडियामुळे केवळ देशाचा मूडच समजतो असे नाही तर देशाचा मूड तयार करण्याचीही ताकद या माध्यमाने कमावली आहे.

जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रद्द करण्यासाठीचे विधेयक काही दिवसांपूर्वी सरकारने राज्यसभेत अचानक सादर केले. जंगलातील वणव्याप्रमाणे ही बातमी संपूर्ण देशभरात पसरणे स्वाभाविक होते. त्याचबरोबर काही तासांतच संपूर्ण देश या बाबतीत सरकारच्या पाठीशी उभा आहे, हेही लक्षात आले. तांत्रिकदृष्ट्या पाहायचे झाल्यास भारत सरकारला कलम ३७० आणि ३५ अ रद्द करण्यासाठी देशभरातून अवघ्या दीड तासांच्या अवधीत प्रचंड पाठिंबा मिळाला. हे सर्व केवळ आणि केवळ सोशल मीडियामुळे शक्य झाले. या महत्त्वाच्या विषयावर एकाच वेळी लक्षावधी-कोट्यावधी लोक एकाच वेळी विचारमंथन करीत होते आणि त्यातून एक राष्ट्रीय मूड तयार झाला. सरकारला तो समजल्यामुळे सरकारचे मनोबल वाढले. तात्पर्य, सोशल मीडिया केवळ मतप्रदर्शनाचे माध्यम नसून, मत घडविण्यासाठीसुद्धा ते एक प्रभावी माध्यम ठरत आहे.