सोशल मिडियाचा वापर आवश्यकतेनुसार हवा

0
176
  • देवेश कु. कडकडे (डिचोली)

जी सेवा लोकप्रिय असते तिच्यात सतत वेगाने परिवर्तन घडत असते. ग्राहकाकडून नावीन्याची सतत ओढ लागलेली असल्यामुळे काहीतरी नवीन असे देण्याची सदैव चढाओढ लागलेली असते. आज इंटरनेट सेवेच्या विलक्षण जादूमुळे याचा जास्तीत जास्त वापर करण्याचा सर्वांचाच कल असतो. आधी इंटरनेटच्या नावाने नाक मुरडणारे आता या अत्यंत सुलभ आणि सुटसुटीत माध्यमाचा त्यातील उपयुक्तता जाणून या क्षेत्राकडे वळत आहे. सुरवातीला बँकींग क्षेत्रामध्ये या माध्यमाचा संपूर्ण वापर करण्यात आल्याचे दिसून येते. आता नोकरी करणारा, शेती करणारा, इतर व्यावसायिक, राजकारणी, समाजसेवक सर्वजण इंटरनेटशी जोडले आहेत.

अलिकडच्या काळात संचार माध्यमामध्ये संशोधन, विकास आणि निर्मितीच्या क्षेत्रात आश्‍चर्यकारक प्रगती झाली. दूरध्वनी आणि संगणक याचे एक मिश्ररुप मोबाईल इंटरनेट सुविधा लोकप्रिय झाली. कोणत्याही प्रकारच्या कॉम्प्युटर प्रशिक्षणाची आवश्यकता नसताना सहज वापरता येत असल्याने सर्व वयोगटातील लोकांच्या हातात मोबाईल आला. मोबाईलवर इंटरनेट आल्यामुळे विश्‍वज्ञान माणसाच्या हातात आले. आरोग्य, बाजारभाव, ताज्या बातम्या, निवडणूक निकाल, शेअर बाजारातील चढ उतार, रेल्वे बुकिंग, विमान तिकीट, हॉटेलचे आरक्षण, फॉर्म भरणे, परीक्षा देणे, परीक्षेचे निकाल, गुणपत्रिका, बँकेचे जास्तीत जास्त व्यवहार यांसारखी अनेक कामे स्वशरीर उपस्थित न राहता घरबसल्या करू शकतो. ईमेलने संदेश परदेशात वेगाने पाठवू शकतो. खर्चही कमी आहे. फॅक्स, टेलेक्स, एस.टी.डी, कुरियरपेक्षाही फारच कमी खर्च. एवढ्या वेगाने संदेश पाठवणारी यंत्रणा निदान भारतात तरी दुसरी नाही. व्यावसायिकांना जाहिरातीचे एक नवे आणि सशक्त माध्यम मिळाले असून कमीत कमी खर्चात उत्पादनात अभूतपूर्व वाढही यामुळे शक्य झाली आहे. एफ. एम. वाहिन्या, दूरदर्शन वाहिन्यांनी थेट प्रेक्षपणाबरोबरच आपल्या कार्यक्रमांना इंटरनेटवर उपलब्ध करण्यास आरंभ केला आहे. वर्तमानपत्रांनीही काळाची पावले ओळखून आपल्या क्षेत्राला इंटरनेटशी जोडून त्याच्याशी ताळमेळ साधला आहे.

काही वर्षांआधी ज्या गोष्टीची आपण कल्पना केवळ कथा-कादंबर्‍या-चित्रपटांतून पाहत होतो त्या सर्व गोष्टी सोशल मिडियामध्ये शक्य झाल्या आहेत. त्यामुळेच आजचे युग हे सोशल मीडियाचे आहे. १९९५ ते २०१२ या काळात जगातील अनेक क्षेत्रांत विलक्षण बदल होत गेला. परिवर्तनाच्या या घोडदौडीत सोशल मिडियाचा खास वाटा आहे. या माध्यमाने समर्थपणे यात समाजाला सामिल करून घेतले आहे. समाजातील कोणतीही व्यक्ती मोबाईलमुक्त नाही. प्रत्येक व्यक्ती कसल्या ना कसल्या रुपात यात सामील असून भारतात रस्त्याच्या कडेला भाजी विकणारी वृद्धा ते दारोदार फिरून भंगार गोळा करणार्‍यांपासून भिकार्‍यांपर्यंत प्रत्येकजण मोबाईलशी जोडला गेला आहे. सोशल मिडियाच्या जबरदस्त वादळाने जगाचे चित्र इतक्या झपाट्याने बदलले की दूरदर्शनसारखे मजबूत माध्यमही एकाएकी मुळापासून हादरले गेले. देशातील १८ ते ३० वर्षांच्या ६०% युवा वर्गाकडे जर एक क्षणही मोबाईल नसला तर अंगातील एक अवयव गायब झाल्यासारखे बेचैन होतात.

एका बाजूला बेरोजगारी वाढत असून दुसर्‍या बाजूला हा मोठा वर्ग सायबर- एडिक्शनची शिकार होत आहे. मुले ३-४ वर्षांची झाली की त्यांच्यासाठी नवीन स्मार्टफोन देण्याची आपल्याकडे परंपरा झाली आहे. याने मुले एकाजागी मोबाईलमध्ये डोके खुपसून बसतात. मुले एका जागी खिळून राहिल्याने त्यांचे आईवडील सुस्कारा सोडतात. आज अनेक मुलांना मोबाईलच्या अतिवापराने १० वर्षांच्या आधीच चष्मा लागतो. कबड्डी, क्रिकेट फुटबॉल सारखे खेळ जे मैदानावर खेळायचे असतात ते खेळ मुले मोबाईलवर खेळतात. ‘ब्लूव्हेल’ सारख्या खेळांनी तर या क्षेत्रातील अघोरी रुपाने सर्वांनाच हादरून टाकले होते. यावर ‘ओव्हर कनेक्टेड’ असल्याची विचित्र समस्या आजारांपासून अनेक वेगवेगळ्या दुष्परिणामांना कारणीभूत ठरत चालल्याचे दिसत आहे. हे इंटरनेट मनुष्याला विक्षिप्त तर्‍हेने तणावग्रस्त बनवते. त्याच्या नियंत्रणात राहतो. प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची क्षमता वेगळी आहे. त्यामुळे जो तो आपल्या दृष्टीकोनातून याचा हवा तसा वापर करतो. यातून माहितीचे विशाल भांडार निश्‍चित आहे, मात्र सत्येतेच्या पायावर या विश्‍वाची प्रामाणिकता आजही संदिग्ध आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून समाजाला जाती-धर्माच्या मुद्यावरून फितवले जाते. दंगल, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी, अपघात अशा खोट्या बातम्या शहानिशा न करता प्रसारित करून गोंधळाची स्थिती निर्माण करतात. सकारात्मक प्रयोगाच्या जागी टाईमपास वेळकाढू रुपात त्याचा नकारात्मक प्रयोग अधिक होतो. सोशल मिडिया हे धर्मदायी तत्वावर स्थापन झालेले नसल्यामुळे यात संपूर्ण व्यावसायिक हेतूच लपला आहे. त्यातील फुकट म्हणून पुरविणार्‍या गोष्टींमधील अनेकजण लाभ उठवतात. परंतु या फुकटगिरीमध्येही दृुष्कृत्ये दडलेली असतात. याचा आम्हाला जेव्हा सुगावा लागतो तेव्हा वेळ गेलेली असते.

वेबसाईटवर सर्च केल्यावर कोणत्याही तर्‍हेची माहिती आपल्या समोर काही क्षणातच झळकते. सोशल मिडियामुळे संवादाचे अनेक प्रकार अस्तित्वात आले आहेत. तरी यातील संवेदना हरवल्या आहेत. एकेकाळी मनुष्य आपल्या संदेवना अभिव्यक्त करण्यासाठी पत्र लिहायचा. या संस्कृतीलाच सोशल मिडियाने मुळापासून उपटून टाकले आहे. आता निःशुल्क संदेशातील मनुष्याच्या संवेदना केवळ काही शब्दांपर्यंतच सिमीत झाल्या आहेत. आपण पत्र लिहिताना त्या नात्याना वेळ देत नात्यातला सुगंध जपत म्हणून आपण जुनी पत्रे जपून ठेवत. आपले फेसबुकवरचे फ्रेण्ड त्यातील काहीजण आपल्याला ओळखतही नाहीत.

केवळ फेसबुकाच्या ओळखीवरून संपर्क वाढल्यामुळे आज अनेक अल्पवयीन मुली प्रेमाच्या जाळ्यात अडकून आयुष्यातून उठल्या आहेत. एका दूरध्वनी फोनवर आपण आपली एटीएम कार्ड व इतर माहिती देतो आणि क्षणात कंगाल होतो. मोबाईल कॅमेर्‍याद्वारे नको त्या स्थितीतले चित्रिकरण करून ब्लॅकमेलिंग सारखे प्रकार वाढल्याने आज सर्वत्र संशयाचे वातावरण पसरले आहे. सोशल मिडियावर आपण काय पाहतो, काय उपद्रव करतो या सर्व गोष्टींची नोंद होते. या वाढत्या उपद्रवी मुल्यामुळे खास ‘सायबर क्राईम’ शाखेची स्थापना करण्यात आली आहे. वर्तमानपत्रे, साप्ताहिके, रेडिओ, दूरदर्शन सारखी माध्यमे माहिती प्रसाराबरोबर ज्या मुल्याच्या प्रतिज्ञाबद्ध होती, तेच सोशल मिडियाच्या माध्यमातून मुल्य विघटनाच्या समस्या सर्व जगाला एक घातक आव्हान बनले आहे. अंमली पदार्थाचा व्यवसाय ज्या तर्‍हेने फैलावतो आहे, त्याबद्दल जशी चिंता वाढते आहे तशीच या बाबतीतही स्थिती आहे. अनेक देशात मानसशास्त्राना चांगले दिवस आले आहेत. अमेरिकेत यासाठी खास वैद्यकीय विभाग कार्यरत आहे. शेवटी रोगाने कब्ज्यात घेण्याआधीच तो टाळण्याकडे भर देणे शहाणपणाच असतो. त्याप्रमाणेच सोशल मिडियाचा आवश्यकतेनुसार वापर यावर जालीम तोडगा आहे.