सोपटे-शिरोडकरांचा पराभव निश्‍चित

0
73

पणजी (न. प्र.)
कॉंग्रेस पक्षातून फुटून भाजपशी हात मिळवणी केलेले मांद्रे मतदारसंघातील आमदार दयानंद सोपटे व शिरोडा मतदारसंघातील आमदार सुभाष शिरोडकर यांना पोटनिवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागेल, असे कॉंग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून बोलताना सांगितले.
दोन्ही आमदारांनी स्वत:च्या स्वार्थासाठी आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे त्यांना मतदारसंघाच्या विकासासाठी आपण आमदारकीचा राजीनामा दिला आहे असे खोटे बोलून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये, असे पणजीकर म्हणाले.
आपल्या शिरोडा मतदारसंघाचा गेली १० वर्षे विकासच झाला नाही असे सांगणार्‍या सुभाष शिरोडकर यांनी तसे असेल तर त्याविषयी गोवा विधानसभेत आवाज का उठवला नाही, असा प्रश्‍नही पणजीकर यांनी केला.
दयानंद सोपटे हे आपल्या मतदारसंघातील १०५ जणांना सरकारी नोकर्‍या मिळाल्याचे सांगतात. तसेच मतदारसंघात कोटींची विकासकामे झाल्याचे म्हणतात. असे जर आहे तर ज्या लोकांना नोकर्‍या मिळाल्या आहेत त्यांच्या नावांची यादी सोपटे यांनी जाहीर करावी. तसेच मतदारसंघात कोणकोणती विकासकामे झाली आहेत तेही सांगावे असे पणजीकर यांनी आवाहन केले.