सोपटेंचे नाव न घेता पार्सेकरांचे टीकास्त्र

0
131
मांद्रे येथे बैठकीत बोलताना माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर.

पेडणे (न. प्र.)
राज्य आणि केंद्रातील भाजप नेत्यांनी आपला नव्हे तर मांद्रे मतदारसंघातील एकनिष्ठ भाजप कार्यकर्त्यांचा विश्‍वासघात केला आहे. २०१२ च्या निवडणुकीपूर्वी भाजपशी गद्दारी केलेल्यांना कार्यकर्त्यांनी पोटनिवडणुकीत धडा शिकवावा असे आवाहन माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल मांद्रे येथे भाजप कार्यकर्त्यांच्या भरगच्च सभेत केले. यावेळी त्यांनी आपल्या घणाघाती भाषणात भाजपात घरवापसी केलेले कॉंग्रेसचे माजी आमदार दयानंद सोपटे यांच्या नावाचा एकदाही उल्लेख न करता जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी पक्षाने स्थानिक निष्ठावंताला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली.
पक्षबदलूंना धडा शिकवण्यासाठी पक्ष संघटना मजबूत करीत असतानाच कार्यकर्त्यांनी संघटित व्हावे असे आवाहन त्यांनी केले. दिल्लीत बिझनेस बैठकीसाठी कोण गेले होते. त्यांनी कोणता बिझनेस करून सुटकेसचा आकार वाढवला हे स्पष्ट करावे असे जाहीर आव्हान पार्सेकर यांनी सोपटे यांचे नाव न घेता दिले. मांद्रेतील मतदारांनी निवडून दिलेल्या आमदाराला साखळी भागातील आमदाराने साखळी घालून ओढून नेल्याचा टोला त्यांनी मारला. सभेला जिल्हा पंचायत सदस्य दीपक कलंगुटकर, अरुण बांधकर, पार्से सरपंच प्रगती सोपटे, भाजप मंडळ अध्यक्ष रमेश मांद्रेकर आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.