सोनसडा कचरा प्रक्रिया प्रकल्पाची जबाबदारी घनकचरा महामंडळाकडे

0
163

सोनसडा-मडगाव येथील कचरा विल्हेवाट प्रक्रिया प्रकल्पाची जबाबदारी सांभाळणार्‍या फोमेंतो कंपनीने या कामातून अंग काढून घेण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर सरकारने सोनसडा येथील कचर्‍याची जबाबदारी गोवा घन कचरा महामंडळाकडे सोपवण्याचा निर्णय काल मुख्यमंत्री प्रमोद सावंत व उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत घेतला. सोनसडा येथील कचर्‍याला आग लागण्याची घटना घडल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल ही उच्चस्तरीय बैठक झाली.

पुढील तीन ते चार महिन्यांत गोवा घन कचरा महामंडळ सोनसडा कचरा प्रकल्प स्थळांची जबाबदारी स्वीकारणार आहे. त्यानंतर तेथे नव्या पद्धतीने कचरा हाताळला जाईल.
२०११ सालापासून या कामाची जबाबदारी फोमेंतो कंपनीकडे होती. फोमेंतो कंपनीने त्यासाठी मडगाव नगरपालिकेशी करार केला होता.
फोमेंतो करारातून मुक्त
फोमेंतो कंपनीने आपणाला या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे, अशी मागणी करणारे एक पत्र मडगाव नगरपालिकेला लिहिल्याने कंपनीला या जबाबदारीतून मुक्त करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.