सेवाही परमो धर्मः

0
526

– प्रकाश आचरेकर, मुंडवेल – वास्को
मनुष्यजन्मात प्रेम, माया, मदत करणे, उपकार, परतफेड, प्रायश्‍चित्त, यातना, प्रार्थना, थोरवी गाणे, मान देणे, आज्ञा पाळणे, सन्मान करणे, आदर करणे, गोड बोलणे, संकटकाळी धावून येणे, अशा अनेक बाजूंनी माणूस माणसाची मदत करतो. परंतु सेवा करणे ही तर सर्व मदतकार्यात उत्कृष्ट मानली जाते. सेवा करण्याची रूची ही वेगळीच असते. ही रुची त्या कर्त्याला परमसुख देणारीही असते.माणूस इतर माणसांची जन्मल्यापासून मरेपर्यंत सेवा करीत असतो. बालपणी आपल्या प्रेमाचे वात्सल्य देत माता त्याची सेवा करते. मुले थोडी मोठी झाल्यावर घरात आईची मदत करून सेवा करतात. पूर्वी गुरू मुलांची तर मुले गुरूची सेवा करीत असत. त्यातून त्यांच्यात विशेष प्रेमभाव उत्पन्न होत असे. भारतीय स्त्रिया लग्नबंधनात अडकताना मनायोग्य जोडीदाराची मनोकामना करतो. जेणेकरून आपणाला त्याची आयुष्यभर सेवा करायला मिळावी. नंतर योग्य व विश्‍वासू जोडीदार मिळालेल्या स्त्रिया आपणाला धन्य समजतात. पतीची सेवा करण्यास परम सुख समजतात. सेवा करणे हे उत्कृष्ट मदतकार्य आहे. भारतात आजसुद्धा म्हातार्‍या आईवडिलाचे संगोपन करून निःस्वार्थ सेवा करीत असल्याचे पाहायला मिळते. याच सेवाकार्यात घरात येणार्‍या परक्या माणसास आदरभावाने मानाने वागवले जाते. यामुळे भारतात ‘अतिथी देवो भव’ ची संस्कृती रुजलेली आहे.
सेवा करण्याचे महत्त्व आपल्याकडे फार प्राचीन काळापासून प्रचलित आहे. शिवपुराणातील गोष्ट घ्या. शंकराचे दोन पुत्र श्री कार्तिकेय व श्रीगणेश. त्यात कार्तिकेय बलवान व धाडसी, तर श्रीगणेश बलवान व आईवडिलांची सेवा करणारा होता. या सेवेमुळेच श्रीगणेशाने आईवडिलांची मने जिंकली व प्रत्येक ठिकाणी विजयी झाला. तसेच रामायणात श्रावण बाळाने आईवडिलांच्या सेवेत प्राणत्याग केल्यामुळे आजपर्यंत सर्वांची मने जिंकली. नंतर हनुमंताने श्रीरामाची सेवा निःस्वार्थपणे केल्याने ती एक शक्तीमान व नवसाला पावणारी व माणसाच्या मनात घर करून बसलेली व अग्रस्थान प्राप्त झालेली देवता समजली जाते, तसेच महाभारतात अर्जुनाने श्रीकृष्णाची अग्रक्रमाने सेवा केल्यामुळे तो कीर्तीमान व अंतिम ध्येयाकडे पोचलेला महापुरुष ठरला. जगातील सर्वांत मोठा ख्रिस्ती धर्म संस्थापक येशू ख्रिस्ताची त्यांच्या शिष्यांनी मनःपूर्वक सेवा केल्याने ते तो धर्म स्थापू शकले व त्याचा त्यावेळी प्रसारमाध्यम नसताना जगभर प्रसार केला. हा सर्व सेवेचा चमत्कार आहे. त्याने उच्च मनोबल प्राप्त होते व अशक्य वाटणारी गोष्ट शक्य होते.
आज सगळीकडे म्हटले जाते की आता माणूस स्वार्थी झालेला आहे. तो दुसर्‍याची सेवा करू शकत नाही. बारकाईने पाहिल्यास समाजात मोठा बदल झालेला नाही. तरी आजचा समाज सुसंस्कृत व समंजस झालेला आहे. त्यामुळेच आज सगळीकडे सुव्यवस्था दिसून येत आहे. म्हणून कुठलाही माणूस सर्व बाबतीत स्वार्थी अथवा निःस्वार्थी असत नाही, कारण माणूस हा एक प्राणी आहे आणि स्वार्थी असणे हा त्याचा स्वभावधर्म आहे.
आता माणसाच्या सेवेचा विचार करूया. सेवेच्या चार प्रमुख पायर्‍या आहेत. पहिली पायरी स्वतः अथवा स्वतःच्या शरीराची आहे. म्हणून सर्वप्रथम स्वतःच्या शरीराची निगा राखायची आहे, कारण या जगात आपण आहे तर इतर सर्व आहे. आपण आहोत, तर आपले कुटुंब, आपला समाज व जग आहे. तेव्हा त्यासाठी देवाप्रमाणे सेवा करून त्याला निरोगी राखायचे आहे आणि कुठल्याही व्यसनापासून दूर ठेवायचे आहे. अशा या शरीरावर प्रेम व त्याची सेवा करायची असते. कुठल्याही परिस्थितीत तिचा द्वेष अथवा तिरस्कार करायचा नसतो. आपल्या या शरीरात तो ईश्‍वराचा वास आहे, असे समजून त्याची सेवा केली पाहिजे.
माणसाच्या सेवेची दुसरी पायरी म्हणजे त्याचे कुटुंब. आपल्याला या जगात रहायचे तर कुटुंबाबरोबरच रहावे लागते. म्हणजे आपले अस्तित्व आपल्या कुटुंबावरच अवलंबून असते. आपल्या कुटुंबाचे संस्कार आपल्यावर येत असतात. त्यासाठी त्याचा उद्धार करायचा असतो. त्याला सुसंस्कृत करण्यास हातभार लावायचा असतो. त्यासाठी प्रेमाने कुटुंबातील प्रत्येकाची सेवा करायची असते. आज आपण पाहत आहोत, कितीतरी कुटुंबे घटस्फोटाने उद्ध्वस्त झालेली आहेत. आणखी अनेक कुटुंबे आहेत, माणसे रात्रीची येतात, जेवतात व झोपतात आणि सकाळी उठून कामाला जातात. कोण कोणाशी बोलणे व संभाषण नाही. अशा या वागण्याने आपण दुसर्‍याची सेवा करीत नाहीत, तर मग दुसर्‍याकडून प्रेमाची अपेक्षा तरी कशी करायची?
माणसाच्या सेवेची तिसरी पायरी म्हणजे मनुष्य समाज आहे. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. इतर माणसांशिवाय त्याचे अस्तित्व नगण्य आहे. माणूस इतर माणसांशी प्रेम, स्नेह व देवाणघेवाणीच्या व्यवहारात आपुलकी असते. सभोवतालचा मनुष्य समाजाची छाप आपल्यावर पडतो व त्याप्रमाणे आपल्याला काही प्रमाणात तरी त्यांचे वळण लागते. म्हणून आपला व आपल्या कुटुंबाचा आर्थिक व सांस्कृतिक उद्धार सभोवतालच्या मानव समाजावर अवलंबून आहे. त्यासाठी आपले कुटुंब व स्वतःच्या उद्धारासाठी मनुष्यसमाजाची सेवा तेवढीच महत्त्वाची आहे.
माणसाच्या सेवेची आणखी एक महत्त्वाची व चौथी पायरी म्हणणे प्राणी व वनस्पतीची सेवा होय. ही निसर्गसेवाही आहे. ही सेवा विशेष महत्त्वाची आहे. आपले अस्तित्व त्याच्यावरच अवलंबून आहे. त्याच्या शिवाय क्षणभरही जिवंत राहू शकणार नाही. आपला श्‍वास घेणारा प्राणवायू व जेवणखाण त्याच्यावरच अवलंबून आहे. त्यामुळे वनस्पती व प्राण्याशिवाय आपले जीवन ही कल्पनाच आपण करू शकणार नाही. म्हणून या सेवेशिवाय आपली सेवा पूर्णत्वाला पोचणार नाही.
आज माणूस वर सांगिल्याप्रमाणे प्रेम, भक्ती व आराधना करतो, तसेच आपल्यावर ईश्‍वरी कृपादृष्टी व्हावी म्हणून आपल्या धर्माप्रमाणे धर्म सेवा करायला लागतो. मग येणे करून आपली व आपल्या कृपा कुटुंबाची आकांक्षा व कामना प्राप्त व्हावी ही त्यांची अपेक्षा असते. परंतु वर सांगितल्याप्रमाणे चार पायर्‍यांनुसार सेवा करीत राहिल्यास आपण योग्य मार्गाने सेवा करतो याचे समाधान तरी प्राप्त होईल.