‘सेनेटरी पॅड’ विल्हेवाटीसाठी स्त्री सखी योजनेचा शुभारंभ

0
173

गोवा कामगार कल्याण मंडळाने राज्यातील खासगी कंपन्यांमध्ये काम करणार्‍या महिला व शालेय मुलींना स्वच्छतेची सुविधा उपलब्ध करणारी नवीन अनोखी स्त्री सखी योजना महिला दिनी काल कार्यान्वित केली.

महिलांना कंपन्यांमध्ये कामाच्या ठिकाणी स्वच्छ वातावरण उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. खासगी कंपन्यांमध्ये सेनेटरी पॅडची विल्हेवाट लावण्यासाठी खास यंत्रे उपलब्ध करण्याची योजना सुरू केली आहे. राज्यातील पाच ते सहा मोठ्या कंपन्यांनी महिला दिनापासून या योजनेच्या कार्यवाहीला सुरुवात केली आहे. मोठ्या कंपन्यांना मशीन बसविणे व नियमितपणे सुरू ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती मजूरमंत्री रोहन खंवटे यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

राज्यातील लघू आणि मध्यम कंपन्यांमध्ये सेनेटरी पॅड विल्हेवाट लावणारी यंत्रणा बसविण्यासाठी मंडळाकडून साहाय्य केले जाणार आहे. या कंपन्यांना केवळ यंत्रणेची देखभाल करावी लागणार आहे. तसेच विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय आणि महाविद्यालयांत सेनेटरी पॅड विल्हेवाट लावणारी यंत्रणा मंडळाकडून बसविण्यात येणार आहे. येत्या एप्रिलपासून प्रायोगिक तत्त्वावर वीस ते पंचवीस विद्यालयांत सेनेटरी पॅड विल्हेवाट यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षापासून सर्वच ठिकाणी यंत्रणा कार्यान्वित करण्यावर भर दिला जाणार आहे. आगामी दोन वर्षांत राज्यातील सर्व औद्योगिक कंपन्यांमध्ये स्वच्छता सुविधा उपलब्ध केली जाणार आहे, असेही मंत्री खंवटे यांनी सांगितले.