सेतुबंधन : अध्यात्म-विज्ञानाचं!

0
538

– प्रा. रमेश सप्रे
दोन मित्रांची एक मार्मिक गोष्ट आहे. ‘रामलक्ष्मण’च म्हणायचे सगळे लोक त्यांना. सर्व गोष्टी दोघेही बरोबरच करायचे. शिक्षण-लग्न-नोकरी-मुलं सारं दोघांचं बरोबरीनं चाललं होतं. जणु समांतर रेषाच. एका बाबतीत मात्र दोघांची मतं अगदी उलटी. उत्तर-दक्षिण ध्रुवांसारखी. त्यांच्यात त्या गोष्टीवरून वाद व्हायचा. प्रचंड वाद. मुद्दे संपले नाहीत तरी गुद्दे सुरू व्हायचे. त्यांची मतं ऐकायला गावातली मंडळी जमायची. त्यांना दोघांचीही मतं पटायची. पण त्यांच्यातलं भांडण मात्र अजिबात आवडायचं नाही. कोणता होता दोघांच्यातला वादाचा विषय?एक म्हणायचा (आपण याला संजय म्हणू या)- सारं विश्‍व कणांचं – अणूंचं बनलंय फक्त पदार्थ! मॅटर! याचा वैचारिक नायक होता अर्थातच वैज्ञानिक कणाद, जो उच्चरवानं सर्वांना सांगायचा – ‘‘पीलवः पीलवः पीलवः’’ भरलेलं आहे. दुसरा म्हणाला स्पिरीट म्हणजेच आत्मतत्त्व (आत्मा). त्याला एक विश्‍वमन आहे. कॉस्मिक माइंड. याचे वैचारिक नामक होते अर्थातच ऋषीमुनी – साधुसंत. थोडक्यात दोघा मित्रात वादाचा मुद्दा होता – मॅटर अँड माइंड! कण आणि मन! अन् हा वाद न संपणारा असाच होता. लोकांना वाईट वाटायचं. एरवी रामलक्ष्मणासारखं वागणारे हे दोघेजण वाद सुरू झाला की राम-रावण का होतात? त्यांच्यातला वाद संपून संवाद कसा घडवून आणायचा?
एके दिवशी गावात एक आत्मज्ञानी साधुमहाराज आले. गावातल्या मंदिरातच त्यांचा मुक्काम होता. त्यांच्या ज्ञानानं-प्रवचनानं सारे दिपून गेले. काहीजण या दोन मित्रांकडे गेले अन् त्यांना त्या साधुमहाराजांना भेटण्याचा सल्ला दिला. त्यानुसार दोघेही गेले. त्या दोघांचेही युक्तिवाद साधुमहाराजांनी ऐकले. त्यांनाही त्या दोघांचा आवेश जाणवला. त्यांच्यात संवाद घडवून आणण्यासाठी साधुमहाशयांनी त्यांना एक स्वाध्याय सांगितला. ‘आजपासून सात दिवस दोघांनीही फक्त विचार करायचा. कशाचा तर जो सारं विश्‍व हे फक्त कणानं व्यापलेलं असं म्हणतो (म्हणजे ‘मॅटर’वाला) त्यानं दुसर्‍याच्या मताचा म्हणजे विश्‍वमनाचा विचार करायचा आणि दुसर्‍यानं (म्हणजे ‘माइंड’वाला) फक्त पदार्थानं व्यापलेल्या विश्‍वाचा विचार करायचा. थोडक्यात संजयनं विश्‍व हे चैतन्यानं भरलेलं आहे, त्याला विश्‍वमन आहे हे स्वतःला पटवून देण्याचा प्रयत्न करायचा.
अजयनं सारं विश्‍व हे कणानं – अणूनं भरलंय हे स्वतःला पटवून द्यायचं. साधुमहाराजांनी हेही सांगितलं- एखाद्या गुहेत समाधिस्त असलेल्या तपस्व्यासारखं दोघांनी सात दिवस राहायचं. चिंतन करायचं. एकमेकांना एकदाही भेटायचं नाही. अन् आठव्या दिवशी स्वतंत्रपणे साधुबाबांकडे मंदिरात यायचे. लोकांनाही कुतुहल होतं. अखेर आठवा दिवस उजाडला. अजय व संजय स्वतंत्रपणे मंदिरात आले. साधुबाबा ध्यानमग्न होते. दोघांनी नमस्कार करून आपण आल्याबद्दल त्यांना सांगितलं. डोळे न उघडता साधुमहाराज म्हणाले- ‘माइंड’वाले अजय सांगा- ‘विश्‍व कशानं भरलेलं आहे?’ यावर अजय उद्गारतो-
‘डझन्ट मॅटर’! म्हणजे विश्‍व कशानं भरलंय ते फार महत्त्वाचं नाहीये.
आता ‘मॅटर’वाले संजय, तुम्ही सांगा- ‘विश्‍व कशानं भरलेलं आहे?’
यावर संजय उत्स्फूर्तपणे म्हणाला- ‘नेव्हर माइंड!’ म्हणजे विश्‍व कशानं भरलंय याला फार महत्त्व देण्याची गरज नाहीये.
सार्‍या लोकांना अजय-संजय या दोघांनी दुसर्‍याची भूमिका समजून घेतल्यावर त्यांच्यात झालेलं एकमत… घडलेला संवाद याचं फार आश्‍चर्य वाटलं. आता हे दोघे कायम राम-लक्ष्मणासारखेच राहतील या विचारानं सार्‍यांना आनंद झाला. त्यांनी साधुबाबांचा त्रिवार जयजयकार केला.
या गोष्टीचं सार काय? – संदेश कोणता? सार हेच की ‘मॅटर’ म्हणजे (पदार्थ) विज्ञान आणि ‘माइंड’ म्हणजे मानसशास्त्र किंवा अध्यात्म यात विरोध नाही, तर संवाद आहे. विज्ञान आणि अध्यात्म या परस्पर संवादी गोष्टी आहेत. समांतर विचारधारा आहेत.
हे विस्तारानं सांगायचं कारण एकच की विज्ञान आणि अध्यात्म हे परस्पर विरोधी विचारप्रवाह नाहीत हे आपल्या मनावर ठसावं. असं म्हणतात की अध्यात्मज्ञानाचा सर्वांत जुना (एल्डेस्ट) ग्रंथ आणि विज्ञानाचा सर्वांत नवा (लेटेस्ट) ग्रंथ एकच विचार सांगतात.
‘भारताचा अमूल्य वारसा’ या नावाचं एक पुस्तक आहे. लेखक आहेत प्रख्यात विचारवंत, खरं तर प्रतिभावंत नानी पालखीवाला. या पुस्तकात आरंभी एक परिच्छेद दिलाय. अगदी तस्साच परिच्छेद नंतर दिलाय. वाचकांना वाटतं मुद्रणदोष आहे की काय? मजकुराची पुनरावृत्ती कशाला? अन् मग त्याला कळतं की पहिला परिच्छेद हा विश्‍वाच्या उत्पत्तीचं रहस्य वर्णन करणारा नासदीय सूक्तातला उतारा आहे, तर दुसरा एका पदार्थविज्ञानाच्या अत्याधुनिक पुस्तकातला त्याच विषयावरचा परिच्छेद आहे. अर्थ स्पष्ट आहे- मुळात अन् अगदी वरच्या पातळीवर विज्ञान व अध्यात्म एकच विचार व्यक्त करतात म्हणजेच वैज्ञानिक (सायंटिस्ट) नि आध्यात्मिक संत (सेंट) एकच भाषा बोलतात. खालच्या पातळीवर जरी विरोध वाटला तरी अत्युच्च पातळीवर विज्ञान म्हणजेच अध्यात्म म्हणजेच विज्ञान… हेच समान सूत्र आहे.
कसं ते कळण्यासाठी काही मनोरंजक उदाहरणं पाहू या. एखादा संत तुकाराम जसा देहू जवळील भंडार्‍याच्या डोंगरावर विदेही अवस्थेत ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरीं वनचरें|’ म्हणत अवघ्या सृष्टीशी एकरूप होतो. अगदी तस्साच एखादा न्यूटनही तहानभूक विसरून आपल्या संशोधन विश्‍वात गुंगमग्न होऊन राहतो. या संदर्भात एक मजेदार प्रसंग आहे. ‘मी संशोधनात – प्रयोगाची निरीक्षणं मांडण्यात नि त्यावर आधारित गणितं करण्यात गुंतलेलो असेन तेव्हा माझ्या अभ्यासात व्यत्यय आणायचा नाही. जेवायची वेळ झाली की जेवणाची थाळी आणून कोपर्‍यातल्या टेबलावर ठेवायची’ अशी सक्त आज्ञा न्यूटननं आपल्या बहिणीला देऊन ठेवली होती. बहीण वैतागायची कारण आपल्या मेधावी, बुद्धिमान भावानं गरम गरम अन्न खावं अशी तिची साधी इच्छा असायची. पुन्हा पुन्हा येऊन पाहायची की भाऊ जेवला का? पण हा पठ्‌ठ्या आपल्या कामात एवढा गर्क असायचा की त्याला भुकेचं भानच नसायचं. सकाळची थाळी संध्याकाळपर्यंत तशीच असायची. एकदा न्यूटनला भेटायला आलेल्या मित्राकडे तिनं याबद्दल तक्रार केली. त्यादिवशीही थाळी बराच वेळ तशीच भरलेली होती. ‘जरा गंमत करुया’ असं म्हणून मित्रानं ती थाळी पूर्ण संपवली नि पुन्हा होती तशी झाकून ठेवली. बर्‍याच वेळानं न्यूटन जेवण्यासाठी आला. आता तो रिकामी थाळी पाहून काय करतो हे पाहण्यासाठी तो मित्र नि न्यूटनची बहीण उत्सुकतेनं लपून राहिले होते. न्यूटन आला. शांतपणे टेबलावरची जेवणाची थाळी उघडली पाहतो तर रिकामी, यावर हसून तो म्हणाला, ‘अरेच्चा, माझं जेवण झालंय की! मी पुन्हा कशाला जेवायला आलो?’ असं म्हणून स्वतःशीच हंसून आपल्याच डोक्यावर चापटी मारून ती थाळी न्यूटननं झाकून ठेवली नि पुन्हा संशोधनात गुंग झाला.
एकूण काय आध्यात्मिक उपासना नि विज्ञानाची साधना एकच अनुभव देणार्‍या गोष्टी आहेत. देहभान विसरणं ही एक प्रकारची उन्मनी अवस्था आहे. भौतिक परिसराचा अभ्यास करताना जी एकतानता लागते तशीच एकरूपता आपल्या अंतरंगाचा ठाव घ्यायलाही लागते.
एकदा आपण एखाद्या विचार-कल्पना किंवा भावनेशी समरस झालो की वेगळ्याच विश्‍वात प्रवेश करतो. ते विश्‍व एकाच वेळी मूर्त नि अमूर्त, पार्थिव नि अपार्थिव, लौकिक नि अलौकिक असतं.
छोट्या कबीराला एकदा गोठ्यातल्या गायींसाठी गवत आणायला वडील शेतात पाठवतात. सकाळची वेळ. कबीर उत्साहानं विळा घेऊन गवत कापण्यासाठी येतो. कापलेल्या गवताचा मोठा भारा डोईवरून घरी न्यायचा व आईवडलांची शाबासकी मिळवायची हा विचारही त्याच्या मनात उसळत असतो. तो खाली बसून गवत कापणार इतक्यात वार्‍याची झुळूक आली. गवत डोलायला लागलं नि त्याच्या पानावरचे दवबिंदू ओघळून खाली पडू लागले. कबीराला वाटलं गवत अश्रू ढाळतंय नि मान हलवून आपल्याला सांगतंय – ‘कापू नको’ मारु नको!’ .. त्याचं कोवळं हृदय त्या दृश्यानं द्रवलं. हातातला विळा बाजूला ठेवून तोही त्या गवताबरोबर डोलू लागला. टाळ्या वाजवत ‘राम राम’ म्हणू लागला. संध्याकाळ झाली तरी अजून का आला नाही म्हणून कामावरून परतलेले वडील शेतावर आले. बघतात तर त्यांना ते हृद्य नि दिव्य दृश्य दिसले. नकळत त्यांचे हातही जोडले गेले. ‘दिव्यत्वाची जेथ प्रचीती| तेथे कर माझे जुळती|’ हा अनुभव कबीराच्या चराचराशी असलेल्या एकात्मतेतून त्यांना आला.
डॉ. अल्बर्ट श्‍वायत्झर हाही कबिरासारखा लहान असतानाचा प्रसंग. सुटीत मामाकडे गेला असताना हट्टानं त्यानं एक साधी बंदूक (एअरगन) मागून घेतली. मामानं लाडक्या भाच्याला ती दिलीही. एखाद्या मोठ्या शिकार्‍याच्या ऐटीत छोटा अल्बर्ट निघाला. समोरच्या झाडावर एक पक्षी बसलेला त्यानं पाहिला. अल्बर्टनं नेम धरला सुद्धा. बंदुकीचा चाप ओढणार एवढ्यात शेजारच्या चर्चमधली घंटा वाजू लागली. तिचे ठोके ज्या पद्धतीनं पडत होते त्यावरून अल्बर्टच्या लक्षात आलं की कोणीतरी मेल्यावर वाजवतात तशी ही घंटा वाजतेय. एका क्षणात एक विचार त्याच्या डोक्यात चमकून गेला. ‘आपल्या बंदुकीच्या गोळीनं हा पक्षी मरणार हे त्या आकाशातल्या देवाला आधीच कळलं आणि त्यानं ही घंटा वाजवली असं तर नसेल ना?’ बस्, त्या क्षणी विज्ञानाचा अभ्यास करण्याची स्वप्न बाळगणारा नि पुढे चांगला डॉक्टर बनलेला अल्बर्ट पूर्णपणे बदलून गेला. त्याच्या जीवनातली हिंसा पूर्णपणे गेली. आफ्रिकेसारख्या काळ्या खंडात जाऊन तिथल्या आदिवासी – वनवासी बांधवांची सेवा करताना एकाच वेळी तो विज्ञानाचा विद्यार्थीही होता नि आध्यात्मिक जीवनशैलीचा उपासकही होता. एक डॉक्टर म्हणून त्या अंधश्रद्ध, अनारोग्याला आमंत्रण देणार्‍या सवयींचे गुलाम असलेल्या, गोर्‍या कातडीच्या लोकांवर बिलकुल विश्‍वास न ठेवणार्‍या मूळ आफ्रिकावासियांची सेवा करताना त्याला वैज्ञानिक दृष्टी उपयोगी पडली तशीच देवावरची, सेवेवरची, मानवतेवरची श्रद्धाही उपयोगी पडली. विज्ञान नि अध्यात्म यांचा मनोहर संगम म्हणजे डॉ. अल्बर्ट श्‍वायत्झरचं जीवन!
सामवेदातील सृष्टीची रहस्य उलगडल्यावर, तिच्या विराट दर्शनानं मंत्रमुग्ध झाल्यावर ‘हाऽऊ हा ऽ ऽऊ’ करत उत्स्फूर्तपणे मनमोराचा पिसारा फुलवून नाचणारे ऋषी नि ल्यूथर बरबँक्स किंवा वोलरसारखे वैज्ञानिक यांच्या आनंदानुभवातच नव्हे तर त्या दिव्यानंदाच्या आविष्कारात काहीही फरक नाही.
आज ज्या कलम करून (ग्राफ्टिंग) नवनवीन फुलांची, फळांची झाडं करण्याच्या तंत्रानं मानव चमत्कार घडवून राहिलाय त्याचा जनक ल्यूथर बरबँक्स हा वैज्ञानिक! वनस्पति शास्त्रज्ञ होता तो. त्याच्या स्वप्नात एक झाड होतं ज्याला जमिनीच्या खाली बटाटे लागणार होते आणि वर लागणार होते टोमॅटो! या अद्भुत झाडाचं नामकरणही त्यानं आधीच करून ठेवलं होतं- पोमॅटो! पोटॅटो (बटाटा) अधिक टोमॅटो! खूप तपश्‍चर्या करावी लागली त्याला. शेकडो प्रयोग असफल झाले. अखेर त्याच्या स्वप्नातलं रोप अवतरलं. वृत्तपत्रांचे वार्ताहर मुलाखतीसाठी धावले. सगळ्यांचा आग्रह एकच- पोमॅटो झाडाच्या बाजूला उभा राहून त्यानं फोटो काढून घ्यावा. नम्रतेनं नकार देत ल्यूथर त्या वार्ताहरांना घेऊन प्रयोगशाळेच्या इमारतीच्या गच्चीवर घेऊन गेला. तिथं अर्धवट वाढलेली काही हिरवी, काही वाळलेली अशी शेकडो रोपं असलेल्या कुंड्या पडल्या होत्या. त्यांच्यामध्ये उभा राहून आपलं छायाचित्र घ्यावं असा आग्रह ल्यूथरनं केला. तसं केल्यावर वार्ताहरांनी त्यामागचं कारण विचारलं. त्यावर ल्यूथर बरबँक्स म्हणतो, ‘हे इतके प्रयोग फसले म्हणून तो अंतिम यशस्वी प्रयोग साकारला. या अर्धवट अवस्थेत वाढलेल्या झाडांच्या कुंड्या नाहीयेत तर पायर्‍या आहेत त्या यशोमंदिराकडे नेणार्‍या ज्याचा कळस आहे ते पोमॅटोचं रोपटं!’
अशीच तपश्‍चर्या रात्रंदिवस रसायनशास्त्राच्या (केमिस्ट्री) एका उदयाला येऊ लागलेल्या नवीन शाखेच्या जनकाची म्हणजे वोलरची होती. रात्रंदिवस एखाद्या गुहेत बसून समाधी अवस्थेत रममाण झालेल्या योग्यासारखा ध्यास त्यानं घेतला होता. जैव (किंवा सेंद्रिय) रसायनशास्त्र (ऑर्‌गॅनिक केमिस्ट्री) मानव इतिहासाच्या रंगमंचावर अवतरत होतं. विशिष्ट प्रकारचा गंध असलेली (ऍरोमॅटिक) संयुगं (कम्पाउंड्‌स्) त्याच्यासमोर जणू प्रकट होत होती. त्यांना सूत्ररूपात दाखवण्यासाठी पूर्वीच्या रसायनातील साखळीसारखी रचना उपयोगी नव्हती. निराळी पद्धती हवी होती हे सेंद्रिय पदार्थ दाखवण्यासाठी. मनात आली- कुठंतरी वाचलेली किंवा ऐकलेली कृष्णगोपींची रासक्रिडा त्याला दिसू लागली. त्याच्या मनाला झपाटून टाकलं त्या चित्रमय नृत्यानं. एक टिपरी कृष्णाची तर एक गोपीची अशी टिपर्‍यांच्या ठेक्यावर रासलीला सुरू होती. त्याच टिपर्‍या वोलरला आपली नवीन सुगंधी संयुगं दाखवण्यासाठी उपयुक्त वाटल्या.
ल्यूथर बरबँक्स त्या शेकडो कुंड्यांच्यामध्ये गोकुळातील गायीवासरांच्या मध्ये धन्यतेनं उभ्या असलेल्या गोपाळकृष्णासारखा दिसत होता तर वोलर रासनृत्यात रंगून गेलेल्या वृंदावनातल्या धुंद गोपीकृष्णासारखा भासत होता. विज्ञान नि अध्यात्म असंच तर एकमेकाला भेटतं. सागराला धरती मिळते तसं! सृष्टीतील चराचरावर हार्दिक प्रेम करणारे पूर्वीचे ऋषीमुनी नि निसर्गातील पशुपक्षीवृक्षवल्ली या सर्वांवर जिवंत प्रेम करणारे डॉ. होमी भाभांसारखे वैज्ञानिक एकाच कुळातले आहेत. ऋषींनी चराचरात देवत्व भरलं – वनस्पती, पशुपक्षी सार्‍यांना देव मानून पूजायला शिकवलं. त्यांना वंदनीय बनवलं. त्यासाठी सणसमारंभ, व्रतंसोहळे यांची परंपरा निर्माण केली. गवतावर दुर्वांची स्थापना करून त्यांना अग्रपूजेचा मान असलेल्या गणेशाच्या माथ्यावर स्थान दिलं. स्मशानाच्या किंवा ओसाड जागेच्या, अगदी उकीरड्याच्या आश्रयानं वाढणार्‍या धत्तुरा किंवा रुईसारख्या झाडांच्या फुला-पानांना शंकर नि हनुमान यांच्या पूजेत मानाचं पान दिलं. उग्र वास असलेल्या, अनाकर्षक रूप असलेल्या, खर्‍या अर्थानं फुलं-फळं न देणार्‍या तुळशीला विष्णुप्रिया बनवलं. वड-पिंपळ-औदुंबर-बेल-आवळा अशा वृक्षांना पवित्र पंचवटीचं साधनास्थळ बनवलं. एवढंच नव्हे तर मोराला सरस्वतीचं वाहन केलं. यात विशेष नसलं तरी सर्वांना हव्याहव्याशा वाटणार्‍या लक्ष्मीला घुबडाचं वाहन दिलं. अगदी वाघसिंहांसारख्या हिंस्त्र पशूंना देवीला वाहून नेण्याचं काम दिलं. मग नंदी (बैल) – गरुड – हंस ही वाहनं बनली यात नवल ते काय!
या भाकड पुराणकथा केवळ काव्य (महाकाव्य) नसून ही एक दृष्टी आहे जी साक्षात्कार करून देते निसर्गातल्या सत्य-शिव-सुंदराचा! ही दृष्टीच एका बाजूनं अध्यात्माची तर दुसर्‍या बाजूनं विज्ञानाची आहे. आज पर्यावरणस्नेही जीवनशैलीच्या घोषणा देतांना वैज्ञानिकांना ‘भूतां परस्परें पडो मैत्र जीवांचे’ या पसायदानातल्या मैत्राचे म्हणजे ज्ञानेश्‍वरांचं कृतज्ञ स्मरण असलं पाहिजे. त्याचवेळी निसर्गपूजकांना वनस्पतींमधल्या भावस्पंदनांचा अभ्यास करून त्यावर प्रयोग करून वृक्षवल्लींच्या भावजीवनाचं दर्शन घडवणार्‍या वनस्पतिशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोसांचं स्मरणही असलं पाहिजे. अत्युच्च पातळीवर अध्यात्म आणि विज्ञान यांच्यात विरोध किंवा विसंवाद नसून समन्वय नि संवादच आहे.
मुंबईतील रस्त्यांचं ज्यावेळी मोठ्या प्रमाणावर रुंदीकरण करण्याचं ठरलं तेव्हा अर्थातच पहिली कुर्‍हाड दोन्ही बाजूंच्या झाडांवरच पडणार होती. यात इंग्रजी राजवटीत लावलेले शे-दिडशे वर्षांचे अनेक वटवृक्ष होते. कोणालाही या कत्तलीबद्दल खेदही नव्हता ना खंत. पण कवीकलाकाराचं हृदय असलेल्या एका जागतिक कीर्तीच्या एका महान वैज्ञानिकाचं मन मात्र या होऊ घातलेल्या हिंसेचा विचार करून बुद्धासारखं आक्रंदन करू लागलं. काही तरी केलंच पाहिजे. या शेकडो वर्षांच्या मूक साक्षिदारांना नि आपल्या स्वस्थ जीवनाच्या साथीदारांना वाचवलंच पाहिजे. या तळमळीतून एक महाप्रकल्प कोणताही गाजावाजा न करता सुरू झाला. ‘ऑपरेशन ट्रान्सप्लांट’ असं आपण ज्याला म्हणू शकू! असा त्या महावृक्षांच्या अगदी मुळापर्यंत खणून त्यांना क्रेननं उचलून एका अशा संस्थेच्या आवारात पुन्हा लावलं गेलं. ते वृक्ष तर जगलेच पण त्यांच्या प्रेमळ छायेत त्या संस्थेचा दृष्ट लागावी असा विकास होत गेला. विज्ञानाची अद्यावत शाखा मानल्या गेलेल्या अणुशक्तिसंशोधनाचा यज्ञ अहर्निश सुरू असलेल्या या संस्थेला सार्‍या राष्ट्रानं कृतज्ञतेनं नाव दिलं ‘भाभा अणुशक्ति संशोधन केंद्र’. ही केवळ एका शास्त्रज्ञाला दिलेली श्रद्धांजली नव्हती तर त्याच्या अंतःकरणात वसत असलेल्या एका ऋषीला वाहिलेली भावांजलीही होती.
डॉ. होमी भाभांसारख्या विज्ञान नि अध्यात्म यांची सांगड आपल्या नित्य जीवनात घालणार्‍या व्यक्ती प्रत्येक कालखंडात नि देशात जन्माला येत असतात. मानवी संस्कृतीच्या पताका अशी महान जीवनंच तर फडकावत असतात.
अल्बर्ट आइनस्टाईन अशीच ऋषितुल्य वैज्ञानिक किंवा विज्ञाननिष्ठ ऋषीसारखी विभूती होती. ज्यावेळी त्यानं ते विश्‍वविख्यात शक्तिसूत्र (एनर्जी इक्वेशन) मांडलं तेव्हाच खरं तर विज्ञान नि अध्यात्म यांच्यात चिरंतन सेतू बांधला गेला. त्या सूत्रानुसार शक्ती (खरं तर ऊर्जा) आणि वस्तुमान (पदार्थ) एकमेकात परिवर्तित होऊ शकतात नि करता येतात. एका अर्थानं जड सृष्टीतल्या अंगभूत चैतन्याकडेच आइनस्टाइन संकेत करत होता. हीच तर पुरातन काळापासूनच्या ऋषीमुनींची किंवा साधुसंतांची दृष्टी आहे. ‘वासुदेवः सर्वम् इति’ हे गीतेत स्वतः वासुदेवच गर्जून सांगत होता. तर उपनिषदांचे ऋषी ‘ईशावास्यं जगत् सर्वम्’ ही घोषणा करत होते. जड, निर्जीव, अचर, अचेतन असं काही नाहीच. सारं अगदी प्रत्यक्ष दिव्य, सजीव, चर नि चेतन आहे. ते व्यक्त होण्यासाठी आध्यात्मिक दृष्टी मात्र हवी. त्याचा साक्षात्कार होण्यासाठी विशाल मनोवृत्ती हवी. यालाच आइनस्टाइनच्या सूत्रात म्हटलंय प्रकाशाच्या प्रचंड वेगाचा वर्ग म्हणजे प्रकाशाच्या वेगाला प्रकाशाच्या वेगानंच गुणायचं आणि त्याला जोडायचं वस्तुकणांना (मास किंवा मॅटरच्या) आणि दिङ्‌मूढ होऊन पाहायचा एक भव्यदिव्य स्फोट … अणुशक्तीचा … जिच्या विधायक, रचनात्मक स्वरूपाचं बीज घटात स्थापून जिच्या विविध रुपांची आपण महाकाली – महालक्ष्मी – महासरस्वती म्हणून नवरात्रीत पूजाअर्चा करतो! चिंतन नि त्यानुसार वर्तन एकाच गोष्टीचं करायचं- प्रकाशाला प्रकाशानं गुणायचं. प्रकाशाचा वर्ग – घन … अगदी अनंत पटीनं विकास नि विलास जीवनात घडवायचा यालाच आपण दिव्यानं दिवा पेटवून दिवाळी साजरी करणं म्हणतो.
ज्ञानेश्‍वर या आनंद अनुभूतीला ‘सामरस्याची दिवाळी’ म्हणतात. परस्परांशी समरस नि सर्गाशी एकरस झाल्याशिवाय विज्ञान-अध्यात्माचे नवनवोन्मेषशाली नवरस जीवनात येणार नाहीत.
यासाठी अब्दुल कलामांनी सुचवलेला योगच योग्य आहे. ‘विज्ञान (सायन्स) नि अध्यात्म (स्पिरिच्युऍलिटी) यांना जोडणं धन्यकृतार्थ जीवनासाठी आवश्यक असेल तर तो सांधणारा सेतु कोणता?’ असं विचारल्यावर या महान वैज्ञानिकानं उत्स्फूर्त उत्तर दिलं – ‘‘सायलन्स इज दॅट ब्रिज!!’’…
शांत – एकांत – निवांत उपासना असलेली जीवनशैलीच असा सेतु आहे. यालाच आपल्या ऋषींनी म्हटलंय – ‘‘ॐ शांतिः शांतिः शांतिः|’’