सेझ : व्याजासह पैसे देण्यामागे घोटाळा

0
148

>> कॉंगे्रसचा आरोप

सेझ कंपन्यांना त्यांचे पैसे व्याजासह परत देण्याचा निर्णय हा एक मोठा घोटाळा असल्याचा आरोप काल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. या घोटाळ्यात काही मंत्र्यांचा हात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

चोडणकर म्हणाले की, सेझवाल्यांनी आपले पैसे वसूल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना सरकारने घाईगडबडीत मंत्रिमंडळ बैठक घेऊन सेझवाल्यांना व्याजसकट पैसे परत करण्याचा निर्णय का घेतला, असा सवालही चोडणकर यांनी केला. गोवा विधानसभेचे अधिवेशन चालू असताना घाईगडबडीत मंत्रिमंडळ बैठक घेऊन ज्या प्रकारे सरकारने सेझ कंपन्यांना व्याजासह त्यांचे पैसे परत करण्याचा निर्णय घेतला तो पाहता हा एक घोटाळा आहे, असे कुणीही सांगू शकेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट न पाहता सेझ कंपन्यांना व्याजासकट अशा रितीने पैसे परत करण्याचा निर्णय घेण्याची काय गरज होती, असे चोडणकर म्हणाले.