‘सृजनसंगम’ ः मंतरलेल्या चैत्रबनात

0
223
सृजनसंगम आयोजन करणारी टीम

गोवा मराठी अकादमी आयोजित सृजनसंगम २०१८ नुकताच साखळीच्या रवींद्र मंदिरात मोठ्या उत्साहाने तुफानी उपस्थितीत पार पडला. उद्घाटनपर कार्यक्रम ते समारोप कार्यक्रम तसेच त्या अंतर्गत झालेल्या विविध स्पर्धा – एकाच वेळी त्या घेण्यातली निपुणता – एवढे सगळे परीक्षक आणि हजारो विद्यार्थी- विद्यार्थिनींचा राबता…. याबद्दल थोडेसे…

गोवा मराठी अकादमी आयोजित सृजनसंगम २०१८ नुकताच साखळीच्या रवींद्र मंदिरात मोठ्या उत्साहाने तुफानी उपस्थितीत पार पडला. एवढं सुंदर आणि नीटनेटकं आयोजन होतं की गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष श्री. अनिल सामंत तसेच त्यांना साथ देणारे परेश प्रभू, सौ. पौर्णिमा केरकर, श्री. वल्लभ केळकर व त्यांची टीम या सगळ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच होय. विद्यार्थ्यांच्या सहभागाविना कॉलेज, उच्च माध्यमिक विद्यालयांच्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाविनासुद्धा हे घडून येणं शक्य नव्हतंच म्हणा! उद्घाटनपर कार्यक्रम ते समारोप कार्यक्रम तसेच त्याअंतर्गत झालेल्या विविध स्पर्धा – एकाच वेळी त्या घेण्यातली निपुणता – एवढे सगळे परीक्षक आणि हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनींचा राबता असताना सगळे कार्यक्रम बिनबोभाट पार पडणे हे मोठे जिकिरीचे काम होते. सळसळत्या तारुण्याचा जोश काय असतो, तो सदर सृजनसंगम कार्यक्रमात अनुभवता आला. रंगमंचावरच्या बॅकड्रॉपपासून सृजनसंगमसाठी खास तयार केलेल्या विष्णू शिरोडकरनी संगीत दिलेल्या संकल्पना गीताचीही वाहवा करावी तेवढी थोडीच!!
सुरुवातीला झालेली शोभायात्रांची सलामी- ती तर प्रत्येक महाविद्यालयाची एवढी देखणी अन् कल्पकतेचा अभिनव आविष्कार असणारी होती की एक एक पथक तालबद्ध पदन्यास टाकत पुढे सरकताना पाहताना देहभान हरपून – तहानभूक विसरून – उन्हातान्हाचे काहीच सोयरसुतक न बाळगता पाहता आली. चैतन्य म्हणतात ते काय असतं हे पहायला सृजनसंगमात यायला हवं.
सर्व मान्यवरांची मुद्देसूद, छोटेखानी भाषणे – समारोपाचे प्रमुख पाहुणे श्री. योगेश सोमण यांनी तर अप्रतिम भाषण करून सर्वांची मनं जिंकली. त्यांच्या उपस्थितीमुळे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरच उपस्थित आहेत.. असं वाटून गेलं.
गोव्याचे सभापतीही कार्यक्रमाची शान वाढवत होते. मुलांना दिशानिर्देशन व्यवस्थित केलं तर मोबाइल-व्हॉट्‌सऍपवर सदान्‌कदा दिसणारी मुलं कलेच्या प्रांतातही मनसोक्त रमतात, हे सृजनसंगमसारख्या कार्यक्रमात वावरताना दिसून आलं. कोण म्हणतो तरुण पिढी बिघडलीय?? संस्कृती – संस्कारांचं बीजारोपण अशा कार्यक्रमांतून करणारेच पाहिजेत. मुलंही मस्त प्रतिसाद देतात. समरसून भाग घेतात. कलेच्या आविष्कारात मनसोक्त डुंबतात. ‘योजक तत्र दुर्लभः’ म्हणतात तेच खरे!
गोवा मराठी अकादमी, गेली दीड-दोन वर्षांपासून सांस्कृतिक संचित तरुण मुलांमध्ये पेरताना दिसून येते. मुलांचा सहभागही सादास प्रतिसाद देताना बघून ऊर भरून आला. सृजनसंगमातले दोन संपूर्ण दिवस मंतरलेल्या चैत्रबनात राहून आल्यासारखे भासले. कार्यक्रमाचे, स्पर्धांचे आकंठ रसपान तर केलेच अन् त्या तरुणाईच्या घोळक्यात वावरताना माझे वयही विसरून मी तरुणांतला तरुण झालो. बेंबीच्या देठापासून घोषणा देताना – त्या घोषणांना मिळणारा प्रतिसाद पाहून ब्रह्मानंदी टाळी लागली. ‘मराठी लिहा तुम्ही मराठी वाचा’, ‘गणपती बाप्पा मोरया’ अन् ‘भारतमातेचा जयजयकार’ करताना आसमंत दणाणून सोडला, अर्थातच रवींद्र भवनातलं अवकाश दुमदुमून गेलं.
काय त्या एकेक स्पर्धा… निर्धारित वेळेत.. वेगवेगळ्या सभागृहात पार पडणार्‍या स्पर्धा – हे बघू की ते बघू… असं होऊन गेलं.
कविवर्य सुदेश लोटलीकर मंचावर कविता लेखन तसेच कविता सादरीकरण पार पडत होतं. स्व. कृष्णा कापडी कलामंचावर रांगोळी, मेंदी वगैरे सजत होत्या. स्व. डॉ. एस.एस नाडकर्णी असे नामकरण केलेल्या खुल्या सभागृहात वक्तृत्व व अंत्याक्षरी स्पर्धा उत्साहात संपन्न होत होत्या. मुख्य सभागृह स्व. मनोहरबुवा शिरगावकरच्या नावे ठेवलेलं… त्यात समूहनृत्य, देशभक्तिपर गीतगायन, कुठे मुखचित्रण तर कुठे सवेष एकपात्री नाट्यप्रवेश – मराठी फॅशन-शो चा प्रकारही मनमोहक होता. एकेकाळी आमच्या वेळी मुलामुलींत बोलणं होत नव्हतं. पण.. आता तर चक्क नवरा-नवरी बनून, हातात हात घालून, रॅम्प वॉक करतानाचे स्थित्यंतर पाहून मजा येत होती. ‘जय मल्हार’च्या गळ्यात माळ घालत पोझ देणारी बानो..वगैरे ग्रेट भासत होती. मग आकाशकंदील बनविणे, किल्ले बनविणे सगळेच रोमहर्षक होते. बाहेर पथनाट्ये रंगत होती… अगदी भर उन्हात… तर दरवाजात व्यक्तिरेखा साकार होत होत्या. व्यक्तिरेखांची चढाओढही काय वर्णावी? साक्षात स्वामी समर्थ बनून आलेला तगडा विद्यार्थी – उघडाबंब – सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होताच, वरून कमीत कमी कपडे घालूनही प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. नाक कापलं म्हणून मोठ्याने रडणारी शूर्पणखा जिवंत अभिनय करणारी – तिचे रडणे एवढे भेसूर होते – अगदी हृदयाचा थरकाप उडविणारे.. ती द्वितीय पारितोषिकाची मानकरी ठरली. वीरभद्र, शंखासुर, शिवाजी महाराज, सोयराबाई… सगळे भाव खाऊन गेलेत. आणि हो, वेणी घालण्याची स्पर्धा… तीही अफलातून होती. अहो, चक्क तीन मुले ही तीस-एक मुलींबरोबर अंगठ्याला दोरी अडकवून वेणी घालत बसलेले… विनासंकोच आणि प्रथम पारितोषिकाचा मानकरी तर एक मुलगाच ठरला. गीतगायन स्पर्धाही झाली. इतके भरगच्च कार्यक्रम – तेवढीच भरगच्च उपस्थिती – चहा, जेवण, न्याहारीही शिस्तबद्ध – किती घेऊ दोन्ही करांनी – किती साठवू दोन्ही नेत्रांनी – ऐकू दोन्ही कानांनी… असं होऊन गेलं!! आणि जुगलबंदी वाद्यांची… ती तर दृष्ट लागण्याएवढी उत्कृष्ट – संवादिनी, तबला, घुमट, झांज, टाळ, समेळ, कासाळे सगळे एकसाथ साथसंगत करताना बघून पाश्‍चात्यिकरण झाल्याची बोंब मारणार्‍यांची बोबडीच वळली असणार!
बक्षिसे प्रदान करतानाची रंगत तर न्यारीच म्हटली जायला हवी. अंताक्षरीचे संचालन करताना पण भारी मजा आली. मुलांचा सळसळता उत्साह, उसळणारे चैतन्य, अंगातून फुटून बाहेर पडणारा जोश – ते तारस्वरात ओरडणे, नाचणे, खुर्च्या सोडून पळणे, रंगमंचावर धाव घेणे… सगळेच त्यांना परमानंद होत असल्याची साक्ष देत होते. यंदाच्या सृजनसंगम २०१८ मध्ये शांतादुर्गा-डिचोली चॅम्पियन ठरले. त्यांच्या जल्लोषाने तर शिग गाठलेली. रंगमंचावर धाव घेत त्यांनी केलेला जल्लोष पाहात रहावा असा मनाला भावला बुवा! सगळ्या कॉलेजांनी लावलेली हजेरी, कसलीच गडबड, गोंधळ न होता पार पडलेल्या स्पर्धा, मराठी संस्कृतीची महत्ता अबाधित ठेवणारा असा सृजन-सोहळा खरोखरच संस्मरणीय होता.