‘सुसंस्कृत समाजा’तील समस्या..!

0
199

– आरती सुखठणकर (निवृत्त मुख्याध्यापिका)

कोणत्याही चित्रकार/कलाकाराला धर्म, जात, लिंग, वर्ण, भाषा-भूषा, वर्ग यांची बंधने रोखू शकत नाहीत. जे सत्य आहे ते शिव आहे नि सुंदरही आहेच… नि तेच परमेश्वराचे रूप आहे. प्रत्येक धर्मग्रंथात हेच तर ठासून भरले आहे, पण आपण माणसांनी या भिंती उभ्या करून आपापसात का बरं दुरावा निर्माण केला आहे?

…. मागील अंकात आपण मूल दत्तक घेताना कोणत्या गोष्टी बारकाईने अमलात आणाव्या हे पाहत होतो. त्यांत सर्वांत महत्त्वाचे म्हणजे काहीवेळा मूल ‘दत्तक’ घेतल्यानंतर दांपत्याला अपत्य संभव होतो. अशा वेळी ‘आपले मूल’ व ‘दत्तक मूल’ असा भेदभाव चुकूनही विचारात, वर्तनात आणू नये. लक्षात ठेवावे की ‘दत्तक’ मुलाच्या पुण्याईने आपल्याला ‘अपत्य संभव’ झाला आहे तेव्हा हे त्याचे आपल्यावर महान ऋण आहे!
…. काही वेळा अगदी ‘सामाजिक भान’ आल्यासारखे, एखादे कुटुंब ‘अनाथाश्रमातील एखादे मूल’ दत्तक घेते. सुरुवातीचे काही महिने वा वर्षे त्या मुलाला किंवा मुलीला अगदी लाडाकोडात वाढवले जाते… जोपर्यंत त्या अनाथाश्रमातील अधिकारी वर्ग चौकशीस येत असतात तोपर्यंतच. नंतर मात्र माणसाचा स्वार्थी समाज त्या लेकराकडून अतोनात कष्ट करून घेतात, मारझोड करतात, पुरेसे अन्नही त्या लेकराला दिले जात नाही… फक्त घरात ‘काम करणारे’ हवे म्हणून ही ‘सामाजिक जाणीव’ असते! काय म्हणावे अशा समाजप्रभुणांना?? अन् काही वेळा तर अशी ‘अनाथ मुले’ श्रीमंत घरात ‘विकलीही’ जातात किंवा ‘धंद्याला’ लावली जातात! किती विदारक सत्य आहे हे आपल्या ‘सुसंस्कृत’ समाजाचे!
त्या दिवशी मी ‘पाहणी’ करण्यासाठी शाळेच्या आवारात फिरत होते… शाळेसमोर एक गुलमोहराचे झाड होते नि त्या झाडाच्या पारावर पोटाशी पाय घेऊन एक अकरा-बारा वर्षांची मुलगी कुडकुडत पहुडली होती. मी जवळ जाऊन पाहिले पण त्या मुलीची ओळख काही पटली नाही. तिच्या डोकीला हात लावून पाहिले तर चांगलीच तापलेली वाटली. मी काम करणार्‍या दोन बायकांना बोलावले व तिला उचलून शाळेच्या दवाखान्यात नेले. शाळेतील एका विद्यार्थ्याचे पालक डॉक्टर होते. त्यांना फोन करून बोलावले. त्यांनी तिला तपासून औषधे लिहून दिली व सांगितले की ‘ही उपाशी असावी’. थोडे ग्लुकोज पाण्यातून तिला पाजले. थोडे बरे वाटल्यावर शाळेच्या कॅन्टीनमधले पोहे, दूध व केळे तिला खायला दिले. त्याने तिला थोडी तरतरी आली. तिला बोलती करण्यासाठी मी विचारले, ‘‘तू कुठे राहतेस नि इथे कशी आलीस?’’ अडखळत अडखळत सपनाने सांगितले, ‘‘मॅडम, मी खालच्या आळीत राहते. मला शाळेत शिकायची खूप इच्छा आहे म्हणून मी पळत पळत इथे आले’’, ‘‘घरी कोण कोण आहे?’’ ‘‘मॅडम, मी अनाथ आहे. पलीकडच्या गावात जो ‘अनाथाश्रम’ आहे ना, तिथेच मी लहानाची मोठी झाले. आमच्या ‘रोझी सिस्टर’ खूप चांगल्या होत्या. आता त्या देवाघरी गेल्या. मागच्या वर्षी एक व्यापारी मला न्यायला आला. ‘बेनी सिस्टर’ म्हणाल्या की आता मी त्यांच्याकडेच रहायचे. त्या मला शिकवतील, खेळात भाग घेता येईल, गाणे शिकता येईल… वगैरे, वगैरे… मी मजेत आश्रम सोडून त्यांच्या घरी राहायला आले… सुरुवातीला त्यांनी मला खूप छान वागवले. पण नंतर मला लवकरच कळले की त्या घरात माझी ओळख फक्त ‘वावराडी’ एवढीच होती. लवकरच ‘अंटी’ बाळंत झाल्या नि घरची सारी कामं माझ्या गळ्यात आली. आश्रमात होते तेव्हा मी शाळेत जात होते. मला शिकायला खूप आवडते. पण आता त्याचा काहीच संबंध नाही. त्या मला उपाशी ठेवतात, घरातली सारी कामे करायला लावतात, ‘नाही’ म्हटले तर मारतात सुद्धा! आज मी तिथून पळून आले आहे. मला परत आश्रमात न्याल का? माझ्याकडे आश्रमाचा पत्ताही नाही नि पैसेही नाहीत. मी काय करू? मला मदत कराल का?’’ सपनाच्या डोळ्यातील करुण भावाने माझे काळीज विरघळले. मी प्रथम तिच्या त्या ‘अंटी’कडे चौकशी करायचे ठरवले. सातवीच्या वर्गात चित्रकलेचे दोन तास होते. ड्राईंग बुक व रंगपेटी देऊन तिला त्या वर्गात बसवले व मी तिच्या ‘अंटी’च्या शोधात निघाले…
‘अंटीच्या घराचा पत्ता शोधण्यापेक्षा आश्रमात जाणे अधिक सोपे असेल असेच वाटले म्हणून शाळेत फोन करून कळवले की शाळा सुटल्यावर सपनाला कॅन्टीनमध्ये खाऊ-पिऊ घालून शाळेतच मी परत येईपर्यंत थांबवून ठेवावे. आश्रमातल्या सिस्टर्सनी मला खूप मदत केली. रजिस्टर शोधून त्या ‘अंटी’चा पत्ताही दिला. त्यांचे म्हणणे होते, ‘‘एकदा मूल दत्तक दिल्यानंतर पहिले सहा महिने आम्ही वरचेवर चौकशी करतो. नंतर मात्र ‘रिपोर्ट’ चांगला असल्यास पुन्हा चौकशी करायला जात नाही’’. सपना तान्ही असताना तिला कोणीतरी आश्रमाबाहेर व्हरांड्यातील पाळण्यात आणून ठेवले व घंटा वाजवून सूचना दिली. सिस्टर दार उघडून बाहेर आली व रात्रीच्या काळोखात एक सावली गडप झालेली पाहिली. मग त्या तान्ह्या बाळाला घेऊन ती आश्रमात आली. मुलीच्या डोकीजवळ एका कागदावर ‘सपना’ असे नाव लिहून ठेवलेले होते. तेव्हापासून सपना तिथेच वाढली, सरकारी प्राथमिक शाळेत चौथीपर्यंत शिकली. मग एक दिवस एक जोडपे तिला ‘दत्तक’ घेऊन गेले. चौथीनंतर सपनाचे शैक्षणिक स्वप्न पार धूसर झाले… तिला रोज आमच्या शाळेत जाणारी मुले दिसत असत. पण… तिच्या नशिबी फक्त शाळेचे स्वप्नच होते जणू! अंटीच्या पत्त्यावर गेले तेव्हा कळले की ते कुटुंब परदेशी गेले आहे. परत केव्हा येणार ते कोणत्याच शेजार्‍यांना माहीत नव्हते… हे कळल्यावर प्रथम मला प्रचंड राग आला… ही कसली पद्धत? नव्हते न्यायचे मुलीला तर तिला पुन्हा आश्रमात तरी सोडायला हवे होते ना! ‘गरज सरो नि वैद्य मरो’ असेच वागले होते ते व्यापारी कुटुंब. सपनाला मानसिक व शैक्षणिक आधार द्यायचा असे मी ठरवले. आमच्या शाळेचे कॅन्टीन चालवणार्‍या बाई प्राथमिक शाळेच्या मुलांसाठी देखरेख व पाळणाघरही चालवत होत्या. त्यांनी सपनाची इतर सोय करायचे कबूल केले. आम्ही सर्व शिक्षक तिचे कुटुंबीय बनलो….
दहावीची परीक्षा पास झाल्यावर शाळेच्या व्यवस्थापकांकडूनही तिला मदत मिळाली… पुढे तिला आमच्याच शाळेत ‘प्यून’ची नोकरी मिळाली, तिचे लग्नही झाले नि तिचे आता स्वतंत्र बिर्‍हाडही थाटून देण्यात सर्व शिक्षकांनी पुढाकार घेतला. एका कळीला कुस्करून न टाकता तिला सुंदरपणे सहज फुलण्यास वाव देणार्‍या सर्व सहशिक्षकांचा मला सार्थ अभिमान वाटतो!!
शाळेची दुसरी टर्म सुरू होता होता शाळेत एक नवीन मुलगा दाखल झाला- ‘पिंटू डिकॉस्टा’. त्याचे वडील एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या हुद्यावर बदली होऊन आले होते. अभ्यासात ‘ठीक’ असलेल्या पिंटूला चित्रकलेची खूप आवड होती. तो सर्व हिंदू देवदेवतांची चित्रे खूपच मनापासून काढत असे… त्याच्या वडिलांना मात्र त्याचा हा छंद अजिबात आवडत नसे. त्याची आई एकदा माझ्याकडे आली व म्हणाली, ‘‘मॅडम, तुम्ही पिंटूला ही चित्रे काढण्यापासून परावृत्त करा. त्याच्या ‘डॅडीं’ना ते अजिबात आवडत नाही.’’ त्या – सौ. डिकॉस्टा सुंदर मराठी बोलत होत्या म्हणून मी त्यांना विचारले त्याबद्दल, तेव्हा त्यांनी सांगितले की त्या स्वतः हिंदू होत्या व ख्रिश्‍चन मुलाच्या प्रेमात पडून त्याच्याशी लग्न करून आता त्याही ‘ख्रिश्‍चन’ झाल्या होत्या!! पण एकदा पिंटूला घेऊन माहेरी जाऊन आल्यापासून तो फक्त हिंदू देवदेवतांची चित्रेच काढतो. तो ‘चित्र काढतो’ याबद्दल ‘डॅडीं’ची हरकत नव्हती पण त्याने ‘हिंदू देवांची’ चित्रे काढावीत हे त्यांना पसंत नव्हते! समस्या जरा वेगळी होती पण यात लक्ष घालायचे ठरवले…
आमच्या शाळेत सर्वधर्मीय शिक्षक व विद्यार्थी होते व शाळेचा निकाल नेहमी चांगला लागत असे. शिवाय एकदम दुसर्‍या सत्रात शाळेत सहज प्रवेश मिळणंही जरा अवघडच होतं! तरीही आमच्या व्यवस्थापकांच्या सिफारशीनुसार त्याला प्रवेश मिळाला होता. एक दिवस हातात कागदांच्या भेंडोळ्या घेऊन पिंटू माझ्याकडे आला नि म्हणाला, ‘डॅडींनी हे सर्व तुम्हाला द्यायला सांगितले आहे!’ मी प्रश्नार्थक चेहर्‍याने त्या ‘भेंडोळ्या’ उलगडल्या- तर त्यात चिंटूने काढलेली चित्रे होती. सर्व ‘पेन्सील स्केचेस’ – सरस्वती, लक्ष्मी, गणपती, विष्णू, ब्रह्मदेव, शेषशायी भगवान विष्णू, राधा-कृष्ण, त्रिगुणात्मक दत्त नि पांडुरंग सुद्धा!! एकापेक्षा एक सरस चित्रे… भक्तीरसाची त्रिवेणीच जणू! मी खुर्चीवरून उठले, पिंटूजवळ गेले, त्याचे दोन्ही हात हातात घेऊन म्हटले, ‘‘व्वा, व्वा! अप्रतिम! पिंटू तू एक महान चित्रकार आहेस- किती मनःपूर्वक, बारकाईने तू ही चित्रे रेखाटली आहेस… साक्षात सरस्वतीच तुझ्या बोटांतून पाझरली आहे रे! तुला प्रवेश दिल्याबद्दल मला खूप अभिमान वाटतोय!…’’
पिंटू डोळे मोठे करून माझ्याकडे पाहात स्तब्ध उभा होता. त्याचा अपमान मी करेन अशी त्याची अपेक्षा होती. या सर्व चित्रांना ‘मूठमाती देण्यासाठी’ तो निघाला होता पण काय वाटले कुणास ठाऊक त्याला… ही चित्रे माझ्या स्वाधीन करावीत असे वाटून तो माझ्याकडे आला नि ‘डॅडींनी हे सर्व तुम्हाला द्यायला सांगितले आहे’ असे मला खोटेच सांगितले!!
हळुहळू पिंटूचे डोळे भरून आले – आपली प्रिय किमती वस्तू आपल्यापासून दूर जाताना होणार्‍या वेदना त्याच्या डोळ्यांत साठल्या होत्या… मी पिंटूला थोपटले नि म्हटले, ‘‘बोल, तुला जे काही बोलावसं वाटतं ते बोल’’, नि पिंटू बोलत राहिला…. मन मोकळं करत राहिला! मी त्याला विचारले की हिंदू देवतांचीच चित्रे काढावीत असे त्याला का वाटले? त्याने जे सांगितलं ते ऐकून माझी मलाच लाज वाटली कारण हिंदू असूनही मी कधीच या देवांना अशा नजरेने पाहिले नव्हते! पिंटू म्हणाला, ‘‘सरस्वतीचेच चित्र पहा- त्यात काय नाही? मुकुट आहे, सर्व दागिने आहेत, पुस्तक आहे, वीणा आहे, जपमाळ आहे, मोर आहे, मागे नदी आहे, वृक्षवल्ली आहेत, पाण्यात कमळं आहेत, हंस आहेत, पर्यावरणाचे सुंदर दृश्य आहे. ही विद्या नि ज्ञानाची देवता आहे! हिच्या डोळ्यांत सर्व प्राणिमात्रांसाठी अपार प्रेम आहे. त्यात सर्वधर्मसमभाव आहे… मला ही खूप खूप आवडते टिचर’’. खरंच, थोड्याफार फरकाने सर्व देवदेवतांच्या चित्रात हे सर्वकाही दिसते आपल्याला! पण पिंटूच्या डॅडींना ते काहीच आवडले नव्हते कारण ते सर्व ‘हिंदूंचे देव’ होते! कोणत्याही चित्रकार/ कलाकाराला धर्म, जात, लिंग, वर्ण, भाषा-भूषा, वर्ग यांची बंधने रोखू शकत नाहीत. जे सत्य आहे ते शिव आहे नि सुंदरही आहेच… नि तेच परमेश्वराचे रूप आहे. प्रत्येक धर्मग्रंथात हेच तर ठासून भरले आहे, पण आपण माणसांनी या भिंती उभ्या करून आपापसात का बरं दुरावा निर्माण केला आहे? पिंटू आमच्या शाळेत दहावीपर्यंत होता. त्याच्या-माझ्यात एक ‘गुपीत’ निर्माण झाले होते. आधी चित्रकलेच्या तासाला व नंतर शाळेत वेळ मिळेल तेव्हा पिंटू अनेक चित्रे काढत असे… ‘अनोखा’ ह्या नावाने त्याने काढलेली निसर्गचित्रे आम्ही शाळेच्या भिंतीवर फ्रेम करून लावली होती. शाळेच्या चित्रप्रदर्शनातही त्याच्या चित्रांनी दालन सुशोभित होई. पिंटूच्या ‘डॅडींचे’ मत मात्र मी नाही बदलू शकले याचं शल्य मला आजही वाटते. ‘आर्किटेक्ट’ होऊन पिंटूने स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केलाय नि नुकतेच त्याचे एक ‘मॅजिक विथ पेन्सील’ नावाचे पुस्तक प्रकाशित झाल्याचे कळले! त्याने चितारलेली पहिली ‘सरस्वती’ आमच्या शाळेच्या कपाटात समाधानाने विराजमान झाली आहे – आजही!!
क्रमशः…