सुर्ला गावात ग्रामस्थांकडून दारू बंदी

0
73

>> गाव एकवटले, एकमताने ठराव संमत

दारूबंदीविरोधात सत्तरी तालुक्यातील सुर्ला ग्रामस्थ एकवटले असून गावातील सर्व बार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील सर्वच घरांतील लोकांनी बार बंदीला आपला पाठिंबा दिला. त्यामुळे गावातील देवस्थानात झालेल्या बैठकीत बार बंदीचा ठराव समंत करण्यात आला.

सुर्ला गावात कर्नाटकमधून पर्यटक येतात. गावात एकूण नऊ बार आहेत. शनिवार-रविवारी हे पर्यटक गावात दाखल होतात व दारू पिऊन अक्षरशः धिंगाणा घालतात. त्यामुळे गावातील लोक हैराण झाले आहेत. हे पर्यटक नशेमध्ये महिलांची छेडछाड, धिंगाणा घालतात. लोकांची वाहने अडवण्याचे प्रकारही त्यांच्याकडून केले जातात बहुतांश बारना पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहने रस्त्यावरच पार्क केली जातात. रस्ता आधीच अरुंद असल्यामुळे गावातील नागरिकांना वाहनेही आत घेता येत नाहीत. अशा विविध समस्यांना या पर्यटकांमुळे त्रास होत आहेत. याबाबत बारमालकांना सांगूनही त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. त्यामुळे अखेर काल रविवारी ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत एकमताने गावातील बार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला मोठी उपस्थिती होती.
दरम्यान, गेल्या काही वषार्ंपासून सुर्ला गावाच्या सभोवतालच्या जंगलांमध्ये चारपेक्षा अधिक मृतदेह आढळून आले आहेत. ते खूनच असल्याचा ग्रामस्थांचा संशय असून दारूमुळेच हे झाले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र त्याची अद्याप कोणतीच चौकशी झालेली नाही.

आमदार राणेंना निवेदन
सुर्ला गावात कर्नाटकातील पर्यटकांमुळे दहशत निर्माण झाली आहे. गावातील लोकांचे जगणे कठीण होऊन बसले असल्याचे बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. या सर्वांवर उपाय म्हणजे बारबंदी हाच असून पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे यांना त्यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. असे पत्रकार परिषदेला उपसरपंच सूर्यकांत गावकर, माजी पंच संतोष गावकर, देवस्थान अध्यक्ष गणू गावकर, पूनम गावकर, जयू गावकर यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

दरम्यान, बार चालवण्यास सरकारनेच परवानगी दिली आहे, त्यामुळे बार बंद करण्याचा निर्णयही सरकारनेच घ्यावा. बार बंद केल्यामुळे रोजगाराचा प्रश्‍न निर्माण होणार असून बारमुळे गावातील शंभर जणाना रोजगार मिळाला असल्याचे बारमालक अनंत गावकर व सुशांत गांवकर ह्यानी सांगितले.