सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

0
174

वेर्ला – काणकात भरवस्तीतील बँक शाखेत दिवसाढवळ्या सुरे आणि बंदुका घेऊन दरोडा टाकला जाण्याची घटना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत तीव्र चिंता निर्माण करणारी आहे. अलीकडे विविध बँकांच्या एटीएमना लक्ष्य करण्याच्या अनेक घटना गोव्यात घडल्या होत्या, परंतु आता थेट बँक शाखेत घुसून भरदिवसा लूटमार करण्याइतपत गुन्हेगारांची हिंमत बळावलेली असेल तर हे गोवा पोलिसांसाठी आणि गृह खात्यासाठी भूषणास्पद निश्‍चितच नाही. ज्या जागृत नागरिकांनी या दरोडेखोरांच्या टोळीपैकी दोघांना जिवावर उदार होऊन पकडले, ते निश्‍चितच अभिनंदनास पात्र आहेत. परंतु त्यातून पोलिसांचे अपयश मात्र दृष्टीआड होत नाही. ही दरोड्याची घटना काही एकाएकी घडलेली असू शकत नाही. संबंधित दरोडेखोरांनी आधीपासूनच या परिसरात वास्तव्य करून, नीट पाळत ठेवून परिसराचा व परिस्थितीचा पूर्ण अभ्यास केलेला असेल. हे पाचही जण परप्रांतीय आहेत. त्यामुळे त्यांनी शस्त्रांसह येथे येऊन वास्तव्य करून परिसराची टेहळणी करीपर्यंत पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाला त्याचा थांगपत्ताही लागू नये हे आश्चर्यकारक आहे. सर्वांत बेफिकिरी दाखवली आहे ती संबंधित बँकेने. ज्या बँक शाखेमध्ये दरोडा पडला, त्या शाखेत सुरक्षा रक्षकच नाही. बँकेसारख्या ठिकाणी जेथे लाखोंची उलाढाल रोज होते, तेथे सुरक्षा रक्षकच नसावा वा सुरक्षा रक्षक नेमणे बँकेला परवडू नये ही मोठीच बेफिकिरी आहे. अशा बेफिकिर बँकांवर या गलथानपणाबाबत कारवाई झाली पाहिजे. सुरक्षा रक्षकच नसल्याने कोणत्याही अडथळ्याविना हे दरोडेखोर शस्त्रांनिशी थेट बँकेत घुसले. सीसीटीव्हीवर आपली दृश्ये टिपली जात आहेत हे ठाऊक असल्याने सीसीटीव्ही काढून त्यातली फुटेज टाकून देण्यापर्यंतचे डोके त्यांनी वापरले. त्यांनी बँकेतील ग्राहकांना धाक दाखवून लुटले, व्यवस्थापक, रोखपाल यांना मारहाण केली, रोकड लुटली, तिजोरी उघडण्याचा त्यांचा प्रयत्न मात्र सफल होऊ शकला नाही. एखाद्या चित्रपटात दिसावे तसे हे सगळे दिवसाढवळ्या एखाद्या गजबजलेल्या वस्तीमध्ये घडावे हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. यापूर्वीही म्हापशातील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत अशाच प्रकारे दरोडा घालण्यात आला होता. एटीएम फोडणे, पळवणे या घटना तर गोव्यात अलीकडे नित्याच्या झालेल्या आहेत. पोलिसांनी आता खबरदारीचा उपाय म्हणून रात्रीच्या वेळी जेथे पहारेकरी नसेल ती एटीएम बंद ठेवण्याच्या सूचना बँकांना केलेल्या आहेत. परंतु ही सूचना करीस्तोवर खूप उशीर झाला. लाखो रुपये आजवर एटीएममधून लुटले गेले आहेत. घरांमध्ये भाडेकरू ठेवताना त्याची माहिती पोलिसांना देणे कायद्याने बंधनकारक आहे, परंतु ते गोव्यात पाळले जात नाही. येथील लॉजिंग बोर्डिंग आणि हॉटेलांमध्ये पर्यटक असल्याच्या बहाण्याने तरूणांची संशयास्पद टोळकी येऊन जातात, त्यांचीही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली जात नाही. नागरिकांमधील ही बेफिकिरीही गुन्हेगारांच्या पथ्थ्यावर पडत असते. नागरिक आणि पोलिस यांच्यातील संवाद प्रभावी करण्यासाठी पोलिसांनी अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पोलिस दलाची खालावलेली प्रतिष्ठा उंचावण्याची जरूरी आहे. एवढ्याशा गोव्यातही जर जनतेला पुरेशी सुरक्षा देता येत नसेल तर पोलीस दलाच्या फेररचनेची वेळ निश्‍चितपणे आलेली आहे असे म्हणावे लागेल. आज तपास यंत्रणांना तंत्रज्ञानाची जबरदस्त मदत होऊ शकते. तिचा वापर करून गुन्हे रोखण्यासाठी आपली यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यासाठी प्रयत्न व्हावे लागतील. गोव्यात घडणार्‍या चोर्‍यामार्‍या, घरफोड्या, वाहनचोर्‍या आणि दरोडे यातील गुन्हेगार बहुतांशी परप्रांतीय असतात. त्यातही बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली आदी भागांतील कट्टर गुन्हेगारांना गोवा म्हणजे दुबई होऊन गेलेला आहे. अशा सोनेरी टोळ्या गोव्यात येऊन लूटमार करून जाणे हे नित्याचे होऊन गेले आहे. त्यांना कायद्याचा धाक दाखवण्यासाठी कोणते प्रयत्न आजवर झाले आहेत? ज्या प्रमाणात गुन्हेगारी घटना गोव्यात घडत आहेत, त्या प्रमाणात त्या गुन्हेगारांना शिक्षा झालेली दिसत नाही. तपासकामातील त्रुटी, बेपर्वाई यातून गुन्हेगार गुन्हे करूनही निसटून चालले आहेत. या एकूणच परिस्थितीवर साकल्याने विचार करून राज्याची सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट आणि कार्यक्षम बनविण्यासाठी गृह खात्याने पावले उचलावीत. चोरा-चिलटांना धाक बसवणारे एक अभेद्य सुरक्षा कवच गोव्यासाठी निर्माण करावे.