सुभाष वेलिंगकरनी मांद्रेतून निवडणूक लढवावी ः गोसुमं

0
107

हरमल (न. वा.)
गोव्याच्या राजकारणाला नवसंजीवनी देण्यासाठी सुभाष वेलिंगकरांनी गोव्याच्या राजकीय पटलावर पदार्पण करताना मांद्रे मतदारसंघांतून निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी गोवा सुरक्षा मंच मांद्रे प्रभागाने पत्रकार परिषदेद्वारे केली आहे.
या पत्रकार परिषदेला विनायक च्यारी यांच्यासमवेत उत्तर गोवा सरचिटणीस अभय सावंत, कार्याध्यक्ष राया नाईक, उपाध्यक्ष कृष्णा नाईक, शशिकांत हरमलकर, युवा अध्यक्ष स्वरूप नाईक, सचिव संजय नाईक, सदस्य शशिकांत पेडणेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
मांद्रे मतदारसंघाने दयानंद सोपटे यांच्यावर विश्वास दाखवला मात्र केवळ दीड वर्षांत त्यांनी मांद्रे मतदारांचा विश्वासघात केला, असे यावेळी गोवा सुरक्षा मंच पक्षाचे संघटक विनायक च्यारी यांनी सांगितले. राज्याची आर्थिक परिस्थिती अगदी कमकुवत असताना दयानंद सोपटे व सुभाष शिरोडकर यांनी गोमंतकीयांवर आर्थिक भुर्दंड लादलेला आहे. या दोघांनाही आता कदापि माफी नाही. दोन्ही मतदारसंघांतील मतदारांनी त्यांचा दारुण पराभव करावा असे आवाहन श्री. च्यारी यांनी यावेळी केले.
शिवोलीचा पूल व एक चोपडे ते केरीपर्यंतचा रस्ता सोडला तर कुठला विकास मांद्रेत झाला हे सोपटे यांनी दाखवून द्यावे. बेरोजगारीच्या दृष्टीने कुठला नवीन प्रकल्प मतदारसंघात आणला ते दाखवावे. येथील हा विकास येथील सर्वसामान्य नागरिकांनी केलेला आहे असे आपले वैयक्तिक म्हणणे असल्याचे श्री. च्यारी म्हणाले. यावेळी उत्तर गोवा सरचिटणीस अभय सावंत यांनी, पार्सेकर यांची सध्याची वक्तव्ये पाहिली असता ते केवळ आपल्याला सहानभूती मिळवण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न असल्याची टीका केली.