सुपर-सब मानवीरच्या गोलमुळे एफसी गोवाची बाजी

0
136

हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) रविवारी एफसी गोवान हैदराबाद एफसीवर १-० अशी मात केली. दुसर्‍या सत्रात बदली खेळाडू मानवीर सिंग याने केलेला गोल निर्णायक ठरला. फेरॅन कोरोमीनास नसताना मानवीर हा गोव्यासाठी सुपर-सब ठरला.
गोव्यासाठी हा विजय अत्यंत बहुमोल ठरला. स्पेनचा स्टार स्ट्रायकर कोरोमीनास सलग तिसर्‍या लढतीस दुखापतीमुळे मुकला. तो नसताना मागील दोन लढतींत त्यांना विजय मिळविता आला नव्हता. आधी जमशेदपूरविरुद्ध पराभव, तर मागील लढतीत केरला ब्लास्टर्सविरुद्ध २-२ अशी बरोबरी झाली होती.

गोव्याने ७ सामन्यांत तिसरा विजय मिळविला असून तीन बरोबरी आणि एकमेव पराभव अशा कामगिरीसह त्यांचे १२ गुण झाले. गोव्याने जमशेदपूर (६ सामन्यांतून ११) आणि नॉर्थइस्ट युनायटेड एफसी (७ सामन्यांतून १०) यांना मागे टाकत तिसरे स्थान गाठले. एटीके (७ सामन्यांतून १४) आघाडीवर असून बेंगळुरू एफसी (७ सामन्यांतून १३) दुसर्‍या क्रमांकावर आहे.

जी. एम. सी. बालयोगी स्टेडियमवरील लढतीत मध्यंतरास गोलशून्य बरोबरी होती. दुसर्‍या सत्रात ६८व्या मिनिटाला मानवीरने गोव्याचे खाते उघडले. ६२व्या मिनिटाला प्रशिक्षक सर्जिओ लॉबेरा यांनी सैमीनलेन डुंगल याच्याऐवजी त्याला बदली खेळाडू म्हणून धाडले होते. सहा मिनिटांत त्याने प्रशिक्षकांचा विश्वास सार्थ ठरविला.
हा गोल कॉर्नरवर झाला. ब्रँडन फर्नांडीसने कॉर्नर घेताच हैदराबादचा आदील खान हा मानवीरला रोखण्यासाठी वेळीच हालचाल करू शकला नाही. त्याचा फायदा उठवित मानवीरने हेडींगवर लक्ष्य साधले.

गोव्याने आक्रमक सुरवात केली. दुसर्‍याच मिनिटाला डुंगलने मुसंडी मारली, पण तो ऑफसाईड असल्याचा इशारा झाला. पुढच्याच मिनिटाला हैदराबादने चाल रचली. उजवीकडून क्रॉस पास मिळताच मार्को स्टॅन्कोविचने मारलेला फटका ब्लॉक होऊन कॉर्नर मिळाला. मार्सेलिनियोने शानदार फटका मारताच रॅफेल लोपेझ गोमेझ याच्या दिशेने चेंडू गेला. गोमेझ मात्र केवळ सहा यार्डवरूनही अचूक हेडींग करू शकला नाही. दहाव्या मिनिटाला गोव्याला मिळालेली फ्री किक अहमद जाहौह याने वाया घालविली. त्याने ३५ यार्डावरून मारलेला चेंडू कुणाही सहकार्‍यापर्यंत जाऊ शकला नाही.
२७व्या मिनिटाला गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझ याच्या ढिलाईमुळे चेंडू थेट महंमद यासीरकडे गेला. यासीरने आपला सहकारी मार्सेलिनियोला पास दिला, पण फिनिशिंगअभावी ही चाल वाया केली. दुसर्‍या सत्रात गोव्याने प्रारंभीच आक्रमक खेळ केला. ५०व्या मिनिटाला ह्युगो बुमुस आणि ब्रँडन यांनी डावीकडून आगेकूच केली. त्यातून ब्रँडनला मोकळीक मिळाली. त्याचा फटका मात्र हैदराबादचा गोलरक्षक कमलजीत सिंगने आरामात अडविला.

अंतिम टप्यात दोन्ही गोलरक्षकांनी चपळाई दाखविली. ८१व्या मिनिटाला एदू बेदीयाच्या पासवर मानवीरने डाव्या पायाने मारलेला फटका कमलजीतने रोखला. त्याआधी ७६व्या मिनिटाला मार्सेलिनियोची फ्री किक नवाझने रोखली.