सुपर किंग्सची केकेआरवर कुरघोडी

0
113

गोलंदाजांच्या भन्नाट मार्‍याच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने काल मंगळवारी बलाढ्य कोलकाता नाईट रायडर्सचा ७ गडी व १६ चेंडू राखून पराभव केला. इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमातील हा २३वा सामना चेपॉकच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळविण्यात आला. कोलकाता नाईट रायडर्सने विजयासाठी ठेवलेले १०९ धावांचे किरकोळ लक्ष्य १७.२ षटकांत गाठून चेन्नईने घरच्या मैदानावरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले.

संथ खेळपट्टीवर वेगाने धावा जमविणे अवघड आहे हे ओळखून चेन्नईच्या फलंदाजांनी खेळपट्टीवर टिकून राहणे पसंत केले. याचा फायदा त्यांना झाला. सलामीवीर फाफ ड्युप्लेसी याने आपल्या दीर्घ अनुभवाचा पुरेपूर वापर करत कोलकाताच्या गोलंदाजांना वरचढ होऊ दिले नाही. त्याने आपल्या डावाची योग्य बांधणी करताना केवळ ३ चौकारांसह नाबाद ४३ धावा जमवल्या. अंबाती रायडू (२१) याच्यासह ड्युप्लेसीने तिसर्‍या गड्यासाठी ४६ धावांची भागीदारी केली. लक्ष्य छोटे असल्या कारणाने धोनीने पाचव्या स्थानावर केदार जाधवला पाठविले. त्याने नाबाद ८ धावा जमवल्या. कोलकाताकडून सुनील नारायणने किफायतशीर मारा करताना दोन फलंदाजांना माघारी धाडले. पीयुष चावलाने एक बळी घेतला.

तत्पूर्वी, चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने नाणेफेकीचा कौल जिंकून आपल्या घरच्या मैदानावर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणार्‍या कोलकाताच्या डावाची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर ख्रिस लिनला दीपक चहरने शून्यावर पायचीत केले. धोनीने दुसर्‍या टोकाने नवीन चेंडू हरभजनच्या हाती सोपवला. त्यानेदेखील कर्णधाराचा विश्‍वास सार्थ ठरवत धोकादायक ठरू पाहणार्‍या नारायणला वैयक्तिक ६ धावांवर माघारी धाडले. हरभजनच्या एका उंची दिलेल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात नारायण बाद झाला. डावातील दुसर्‍याच षटकात २ बाद ८ अशी दयनीय स्थिती झालेली असतानाच भरवशाच्या नितीश राणाने तंबूची वाट धरली. त्यालाही लिनप्रमाणे दीपक चहरने शून्यावर माघारी धाडले. फटकेबाजी करत डावाला स्थैर्य देण्याच्या प्रयत्नात रॉबिन उथप्पाही स्वस्तात झेलबाद झाला. २ चौकार लगावत ११ धाव करून तो माघारी परतला. पॉवरप्लेचा लाभ घेण्यासाठी आडव्या बॅटने ‘पूल’चा फटका खेळण्याचा त्याचा प्रयत्न अंगलट आला. त्यामुळे कोलकाताची अवस्था ४ बाद २४ अशी झाली. जबाबदारीने खेळ करण्याची कर्णधार दिनेश कार्तिककडून अपेक्षा होती. त्या दिशेने त्याने सुरुवातही करताना चेंडूदेखील खर्च केले. पण फटकेबाजीच्या प्रयत्नात तो मिडविकेटवर हरभजनकडे झेल देऊन परतला. त्याने २१ चेंडूत १९ धावा केल्या. युवा खेळाडू शुभमन गिल याला कालच्या सामन्यात चांगली कामगिरी करून दाखवण्याची संधी होती. पण तो इम्रान ताहीरच्या ‘गुगली’वर यष्टिचीत झाला आणि कोलकाताला सहावा धक्का बसला. त्याने ९ धावा केल्या.
काही काळ खेळपट्टीवर तग धरल्यावर पीयुष चावला माघारी गेला. त्याने १३ चेंडूत ८ धावा केल्या. पाठोपाठ कुलदीप यादव (०) धावचीत झाला. लगेचच कृष्णादेखील (०) झेलबाद झाला. रसेलने एकाकी झुंज देत ४४ चेंडूत ५० धावा केल्या. त्याच्या फलंदाजीमुळे कोलकाताने २० षटकांत ९ बाद १०८ धावांपर्यंत पोहोचता आले. चेन्नईकडून दीपक चहरने २० धावांत ३ बळी टिपत चेन्नईला धडाकेबाज सुरुवात करून दिली. त्यानंतर हरभजनने १५ धावा देत २ बळी टिपले. इम्रान ताहीरने देखील विश्वास सार्थ ठरवत २१ धावांत २ बळी घेतले. तर जडेजाने चांगली गोलंदाजी करत १७ धावा देत १ बळी घेतला.

उभय संघांनी या सामन्यासाठी आपल्या संघात कोणताही बदल केला नाही. मागील सामन्यात खेळविलेलाच संघ या सामन्यातही दोघांनी खेळविला. कालच्या विजयासह चेन्नईने गुणतक्त्यात प्रथम स्थान मिळविताना कोलकाताला दुसर्‍या क्रमांकावर ढकलले. यंदाच्या मोसमात पाच विजयाची नोंद करणारा चेन्नई हा पहिलाच संघ बनला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर व राजस्थान रॉयल्स वगळता इतर संघांच्या गुणांत फारसा फरक नसल्यामुळे चेन्नईचे पहिले स्थान भक्कम झाले नाही. आपल्या खात्यात पाच विजय जमा केल्यामुळे ‘टॉप फोर’मधील त्यांच्या स्थानाला सध्यातरी कोणताही धोका नाही.

धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स ः ख्रिस लिन पायचीत गो. चहर ०, सुनील नारायण झे. चहर गो. हरभजन ६, रॉबिन उथप्पा झे. जाधव गो. चहर ११, नितीश राणा झे. रायडू गो. चहर ०, दिनेश कार्तिक झे. हरभजन गो. ताहीर १९, शुभमन गिल यष्टिचीत धोनी गो. ताहीर ९, आंद्रे रसेल नाबाद ५० (४४ चेंडू, ५ चौकार, ३ षटकार), पीयुष चावला यष्टिचीत धोनी गो. हरभजन ८, कुलदीप यादव धावबाद ०, प्रसिद्ध कृष्णा झे. हरभजन गो. जडेजा ०, हॅरी गर्नी नाबाद १, अवांतर ४, एकूण २० षटकांत ९ बाद १०८
गोलंदाजी ः दीपक चहर ४-०-२०-३, हरभजन सिंग ४-०-१५-२, रवींद्र जडेजा ४-०-१७-१, स्कॉट कुगलेन ४-०-३४-०, इम्रान ताहीर ४-०-२१-२
चेन्नई सुुपर किंग्स ः शेन वॉटसन झे. चावला गो. नारायण १७, फाफ ड्युप्लेसी नाबाद ४३, सुरेश रैना झे. चावला गो. नारायण १४, अंबाती रायडू झे. राणा गो. चावला २१, केदार जाधव नाबाद ८, अवांतर ८, एकूण १७.२ षटकांत ३ बाद १११
गोलंदाजी ः पीयुष चावला ४-०-२८-१, प्रसिद्ध कृष्णा ४-०-२३-०, सुनील नारायण ३.२-०-२४-२, कुलदीप यादव ४-०-१६-०, हॅरी गर्नी २-०-२०-०