सुपरनोव्हाजची वेलोसिटीवर मात

0
111

जेमिमा रॉड्रिगीजच्या दमदार नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर सुपरनोव्हाज संघाने वेलोसिटी संघावर १२ धावांनी मात करीत वूमन टी-२० चॅलेंज स्पर्धेत शानदार विजयासह गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळविले आहे. सुपरनोव्हाज आणि वेलोसिटी संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम लढत रविवार ११ मे रोजी जयपूर येथे होणार आहेत.

काल जयपुरमध्ये झालेल्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना जेमिमा रॉड्रिगीजच्या दमदार नाबाद अर्धशतकामुळे सुपरनोव्हाज संघाने २० षट्‌कांत ३ गडी गमावत १४२ अशी धावसंख्या उभारली. प्रीय पुनिया (१६) ही सलामीवीर शिखा पांडेच्या गोलंदाजीवर वेदा कृष्णमूर्तीकडे झेल देऊन परतली. जेमिमाने चमारी अट्टापटूच्या साथीत दुसर्‍या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी केली. ५ चौकारांसह ३१ धावा केलेली चमारी अट्टापटू एमेलिया केरच्या गोलंदाजीवर सुषमा वर्माकडून यष्टिचित होऊन परतली. परंतु त्यानंतर जेमिमाने फलंदाजीची सूत्रे आपल्या हाती घेत सुपरनोव्हाजला १४२ अशी धावसंख्या उभारून दिली. तिने सोफी डिवायनच्या (९) साथीत तिसर्‍या विकेटसाठी ५० धावा जोडल्या. जेमिमाने १० चौकार व १ षट्‌कारासह ४८ चेंडूत ७७ धावांची नाबाद खेळी केली. वेलोसिटीकडून एमेलिया केरने २ तर शिखा पांडेने १ गडी बाद केला.

प्रत्युत्तरात खेळताना वेलोसिटी संघाला ३ गड्यांच्या मोबदल्यात १३० धावांपर्यंत मजल मारता आली. राधा जाधवने शेफाली वर्माला (२) त्रिफळाचित करीत सुपरनोव्हाजला चांगली सुरुवात करून दिली. हेली मॅथ्यूजही (११) अंजू पाटीलच्या गोलंदाजीवर पायचित होऊन परतली. पूनम यादवच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झालेल्या डॅनियली वॅटने ४३ धावा जोडल्या. त्यानंतर मिथाली राज आणि वेदा कृष्णमूर्ती यांनी अविभक्त भागी करीत विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. परंतु त्यांना १२ धाव कमी पडल्या. मिथाली राजने ३ चौकारांसह नाबाद ४० तर वेदा कृष्णमूर्तीने ३ चौकारांसह नाबाद ३० धावा जोडल्या.