सुनील गर्ग लाचप्रकरण सीबीआयकडे सोपविणार

0
118

सरकारने माजी पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांच्या विरोधातील कथित लाच प्रकरण सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षता खात्याने केंद्रीय गृहमंत्रालयाला तसे पत्र पाठवून लाच प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.

दक्षता खाते या लाच प्रकरणाच्या तपासासाठी गंभीर नाही. त्यामुळे लाच प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करण्यासाठी पत्र पाठविण्यात आले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने या तपास प्रकरणी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

येथील जिल्हा न्यायालयाने जानेवारी २०१८ मध्ये माजी पोलीस महानिरीक्षक गर्ग यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश भ्रष्टाचार विरोधी विभागाला (एसीबी) दिला आहे. राज्य सरकारकडून माजी पोलीस महानिरीक्षक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यास मान्यता न मिळाल्याने माजी पोलीस महानिरीक्षक गर्ग यांच्याविरोधात अद्यापपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. दरम्यान, गर्ग यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेऊन जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर ७ जून रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.

वास्को येथील व्यावसायिक मुन्नालाल हलवाई यांनी पोलीस महानिरीक्षक गर्ग यांनी तक्रार नोंद करून घेण्यासाठी साडेपाच लाख रुपये घेतल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी भ्रष्टाचार विरोधी विभागाकडे तक्रार दाखल करून गर्ग यांच्याविरोधात सर्व पुरावे सादर केले होते. एसीबीने गर्ग यांच्याविरोधात गुन्हा दाखल न केल्याने तक्रारदार हलवाई यांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. जानेवारी २०१८ मध्ये जिल्हा न्यायालयाने एसीबीला गर्ग यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता.