सुनील गर्ग यांच्याविरुध्द एफआयआर नोंदवा : कोर्ट

0
134

मुन्नालाल हलवाई यांच्याकडून लाच घेतल्याचा आरोप असलेले गोव्याचे माजी पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांच्याविरुध्द एफ्‌आय्‌आर नोंद करण्याचा आदेश काल उत्तर गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिला.

आपली फसवणूक करण्यात आल्याची एक तक्रारी हलवाई यांनी फोंडा पोलीस स्थानकात नोंदवली होती. त्या संदर्भात आपण सुनील गर्ग यांची भेट घेतली असता गर्ग यांनी सदर प्रकरणी एफ्‌आय्‌आर् नोंद करण्यासाठी आपणाकडून ५.५ लाख रु.ची लाच घेतल्याचा आरोप केला होता. त्यासंदर्भात पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याच्या पार्श्‍वभूमीवर हलवाई यांनी कोर्टात धाव घेतली होती. काल न्यायालयाने या प्रकरणी सुनील गर्ग यांच्याविरुध्द एफ्‌आय्‌आर् नोंद करण्याचा आदेश दिला.

कोर्टाच्या आदेशानंतर पत्रकारांशी बोलताना हलवाई म्हणाले, की हा केवळ आपला विजय नसून आम आदमीचा विजय आहे. ह्या प्रकरणी आपल्याला न्याय मिळावा म्हणून आपण मुख्य सचिवांकडेही धाव घेतली होती.

पण आपणाला न्याय मिळू शकला नव्हता. त्यामुळे आपण न्यायालयात धाव घेतली होती असे ते म्हणाले. काल न्यायालयाने दिलेल्या निकालाने आपणाला न्याय मिळाला असल्याचे हलवाई यांनी सांगितले. न्याय मिळवण्यासाठी आपणाला मोठा लढा द्यावा लागला. मोठ्या पदांवर बसणार्‍या बर्‍याच व्यक्ती अशा प्रकारे भ्रष्टाचार करीत असल्याचे सांगून आम आदमीने अशा लोकांच्या विरोधात लढा देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.