सुजाण पालकत्व

0
2139

– म. कृ. पाटील

यश आणि अपयश एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्हीचे दायित्व स्विकारण्यासाठी मन खंबीर ठेवण्यासाठी आपण साहाय्य करा. आपल्या अपत्याना कोणत्याही गोष्टी तर्कशुद्ध, ज्ञानरचनात्मक वृत्तीने आत्मसात करण्यास प्रोत्साहन द्या. आपल्या जीवनशैलीला अनुसरून केलेला सारासार विचार व अनुभव यातून सुजाण पालकत्व स्वीकाराल अशी अपेक्षा आहे.

प्रत्येक मातापित्याना आपल्या मुलामुलींचे चांगले व्हावे, अशी अपेक्षा असते. आपली मुले स्वस्थ, निरोगी, सुदृढ, आनंदी आणि बहुगुणी असावीत ही त्यांची अपेक्षा रास्त असते. सर्वच क्षेत्रात त्यांनी यशस्वी व्हावे. त्यांच्या वाट्याला अपयश कधीच येऊ नये. मुलांना लहानाचे मोठे करताना, त्यांच्याकरिता भौतिक सुखसोयी, सुविधा निर्माण करताना अवघड परिस्थितीला तोंड देत भगिरथ प्रयत्न करावे लागतात. मुलांना शालेय अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देत, प्रेरित कसे करावे हीच विवंचना त्यांना सारखी सतावत असते. दोन भावंडांची आपापसातील भांडणे, वादावादी कशी सोडवावीत ही समस्यांची उकल करताना ‘‘धरले तर चावते आणि सोडले तर पळते’’ अशी मनःस्थिती तयार होते. कारण प्रत्येक मुलाला आपुलकीने माया ममता करत लाडाकोडाने वाढविलेले असते. या समयी अतिशय संयमाने आणि समजुतदारपणाने दोघांनाही न दुखवता वाद मिटवावा लागतो.
अनेकदा पालक आपल्या लहानपणीच्या गोष्टी, अनुभव आठवून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतात. माझ्या आईवडलांनी माझे लालनपालन करताना ज्या पद्धती, रीती वापरल्या त्या आज विज्ञान तंत्रज्ञान माहिती युगात योग्य ठरत नाहीत. कारण त्यावेळची कौटुंबिक, सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थिती व वातावरणामध्ये फारच तफावत असल्याची जाणीव होते. पण ते बोलून दाखवता येत नाही. यावर मात करण्यासाठी समवयस्क मित्रांना, सहकार्‍यांना मदतीसाठी विचारणा करतात. वैश्‍विक जाळे, संगणक, भ्रमणध्वनि या भौतिक साधनांद्वारे प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात. सर्वांकडून उत्तरे मिळतात, पण ती अर्धवट, संदिग्ध आणि व्यक्तीनिरपेक्ष असतात. कारण ‘‘व्यक्ती तितक्या प्रकृती’’ हा निसर्ग नियम आहे. आजच्या जमान्यात समाजात, अवतीभवती चंगळवादाचा प्रवाह अमर्याद वेगाने वाहतो आहे. मुलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्यांना शांत करण्यासाठी कधीतरी त्या प्रवाहाबरोबर जाण्याचा नकळत प्रयत्नही केलेला असतो. शिशुवर्गातील मुले हट्ट करतात, रुसतात, रडतात. मागणी पूर्ण होताच हसू लागतात. किशोर आणि कुमार वयातील कधी कधी आक्रमक होऊन आकांडतांडव करतात. कोणत्याही उद्भवलेल्या प्रसंगी रागवा-रागवी, ओरडणे, भांडणं, हमरीतुमरी आणि अपशब्द बोलणे हे सर्व कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न, खटाटोप करायलाच हवा. रागावल्याने प्रश्‍न, समस्या, प्रसंग अधिकाधिक जटील होतात. ‘राग येणे’ मनुष्याचा स्वाभाविक गुणधर्म आहे. चारचौघात अथवा घरात त्याचं प्रदर्शन हिंसक व्हायला नको एवढं पथ्य पाळणं हे पालकांच्याच हाती असतं. आपल्या प्रतिष्ठेची, मानसन्मानाची नको तिथे शोभा करण्यात तथ्य नसतं. याची जाण आणि भान सातत्याने ठेवावेच लागते.
आपल्या मुलांच्या चांगल्या वर्तनाचे, कामाचे कौतुक अथवा शाब्बासकी देताना शब्दरचना तोलून मापून करणे गरजेचे आहे. त्याचे कौतुक करताना इतर भावंडांशी किंवा तिर्‍हाईतापेक्षा चांगला/चांगली वागलीस, अशी तुलना मुळीच करू नका. मुलांना अशी एकमेकांशी केलेली तुलना आवडत नाही. त्यांना कमीपणा वाटतो. मुलामुलींचे कौतुक करणे म्हणजे चांगल्या अर्थपूर्ण शब्दांचा सकारात्मक दृष्टीकोनातून केलेला सुयोग्य-सुसंगत वापर असतो. ते करताना अंगलट (बूम रँग) होणार नाही याची खबरदारी मात्र घ्यायलाच हवी. मुलांनाही वाटते आईबाबांनी सारखे सारखे अभ्यासाचे टुमणे लावू नये. इतर मुलांसमोर, परक्या माणसांसमोर अपशब्द वापरून अपमान करू नये. ‘हेच कर, ते करू नको, मी सांगतो ते ऐकलंच पाहिजे, तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत आहेत….’ मुलांना हे सर्व माहीत असते. त्याचा पुनरुच्चार केला की कटकट वाटते. असा अनुभव पालकांना एकदा ना एकदा तरी आलेला असतोच.
आईवडिलांच्या काही अपेक्षा, आकांक्षाही असतात. यात आगळेवेगळे असे काहीच नाही. पण ज्यावेळी मुलं आई- वडलांच्या अपेक्षांची पूर्ती करू शकत नाहीत त्यावेळी सर्वच आईवडिल स्वतःच त्रागा करतात. विशेषतः परीक्षेच्या वेळीचे गुणपत्रक पाहिल्यावर, क्रीडा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यावेळी हा त्रागा जास्त. त्राग्याची जागा राग घेतो आणि त्यातून आईवडिल व मुलांमध्ये दुरावा, नकळत निर्माण होतो. आईवडिल आणि मुलांच्या अपेक्षांमध्ये मतभेद असतात. मुलांचे संगोपन करत असताना, लाड, कोडकौतुक किती करायचे, शिस्त कशी लावायची, वेळेचे महत्त्व कसे पटवून द्यायचे याबद्दलही आईवडलांमध्ये एकवाक्यता नसते. त्यातूनही मुलांनी यश संपादन केलं तर त्यामध्ये आमचा वाटा असं सांगताना मातापित्यांचा अहंभाव सुखावतो. यश आणि स्थैर्य जर मूलं मिळवू शकली नाही तर त्याला आम्ही जबाबदार नाही, आमचे दायित्व नाही, असे म्हणून झटकताही येत नसते. अनेकदा यशापयशाच्या मोजायच्या फूटपट्‌ट्या मातापित्यांच्या आणि मुलांच्या वेगळ्या असतात. यामुळे घरात वैचारिक आणि भावनिक गोंधळाचे वातावरण निर्माण होते. नात्यामध्ये असह्य ताण-तणाव निर्माण होतो. याचा विचार अवश्य करायला हवा.
मातापिता मुलांना प्रेम, माया, आपुलकी, प्रोत्साहन देऊ शकतात. परंतु मुलांना विचार देऊ शकत नाहीत. मुलांचे स्वतःचे स्वतंत्र असे विचार असतात. पालकांच्या हाती त्यांचे विचार प्रगल्भ करण्याची संधी असते. पालकांनी मुलांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करावा, पण मुलांना आपल्यासारखं बनविण्याचा अट्टाहास करणे टाळावे. कारण त्यांचं असं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतं. त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अवश्य प्रयत्न करावेत. व्यक्तिमत्त्वाला बाधा पोहचेल असे करण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येक मुलाची आवड-निवड, ध्येय, आकांक्षा, अपेक्षा वेगळ्या असू शकतात. पालकांनी आपल्या अपेक्षा, आपली मते बळजबरीने लादून व्यक्तिमत्त्व विकासातील अडसर बनू नये. सर्व वयाच्या टप्प्यांवर मुलांच्या आवडीचं काहीतरी करणं आवश्यक असतं. एक तरी कला किंवा खेळ, छंद मुलाच्या आयुष्यात असला पाहिजे. म्हणजे एकाग्रता, साधनेचा प्रश्‍न येत नाही. मुलं ‘क्षणस्थ’ असतात. काय काय घडलं, उद्या काय होईल याचा विचार न करता आजच्या या क्षणात त्यांचा जीव रमतो. हा ‘क्षणस्थ’ एकाग्र होण्याचा गुण मुलांच्या स्वभावात कायम टिकायला हवा. कल्पना, विचार आणि कृती याची उचित सांगड घातली तर, मन, मनगट आणि मस्तकही सृजनशील राहण्यात खचित मदत होईल. यामुळे मुलांचे आंतरिक मनोबल आणि मानसिक सौंदर्य खुलण्यास संधि प्राप्त होईल. मुलामुलींच्या जीवनातील ऐन मोक्याच्या क्षणी मानवी मूल्य, विवेकबुद्धी आणि कौशल्य अपेक्षित असलेल्या घटना प्रसंगामध्ये कच खाणार नाहीत. मुलं व्यक्ती म्हणून व्यक्तिमत्त्वाचे बहुरंगी, बहुढंगी आणि बहुगुणी बनतील यात तिळमात्र शंका नाही.
आपल्या मुलामुलींशी विविध प्रसंगी सुसंवाद साधताना खालील विचार करून पहा काही परिवर्तन होते का?

मुलांशी बोलताना…

असे सांगणे टाळा – त्यांच्याशी असं बोलावं.
वडिलधार्‍यांचं नेहमी ऐकावं – तुला काय वाटतं सांग बरं
दिलेला अभ्यास पाठ कर – अभ्यास समजून उमजून घे
उगाचच फाजील चर्चा नको – यावर आपण चर्चा करुया
पाठ्यपुस्तकाप्रमाणे सांग – तुझ्या स्वतःच्या शब्दात सांग
जशास तसं लिहून काढ – तुझं तू लिहून बघ
जसं आहे तस्सं पाहून कर – तुला आवश्यक ते बदल कर
भिऊन वाग – आपले काम योग्य असेल तर भिऊ नको
प्रश्‍न विचारू नकोस – शंकानिरसनासाठी जरूर प्रश्‍न विचार
लहानांनी मोठ्याचं ऐकावं – लहानांना स्वतःची मतं असतात
यशस्वी व्हायलाच हवं – यशापेक्षा प्रयत्नांचं समाधान महत्त्वाचं

वरील परीवर्तनामुळे विद्यार्थी किंवा मुलं आपले स्वतंत्र विचार मांडतील. विचार करण्याचे सामर्थ्य आणि धैर्य दाखवतील. याकरिता मुलांशी प्रत्येक वेळी नकारात्मक दृष्टीकोनातून न पाहता, सकारात्मक दृष्टीकोनातून त्यांच्याशी सुसंवाद साधण्यातच आपल्या मुलांचा सर्वंकष विकास होईल. मुलांच्या मनोबलाला भरभक्कम असे अधिष्ठान लाभेल. वर्तमानकाळातून भविष्यकाळाचा वेध कसा घ्यावा याचे ज्ञानही अवगत होईल.
आपल्या लहानपणापासून प्रौढ वयापर्यंत ‘फिटनेस’चा वेगळा विचार करण्याची आवश्यकताच नव्हती. कारण आपल्या घरातील जीवनशैलीच आरोग्यवर्धक होती. आजही थोडासा व्यायाम, शारीरिक हालचाली आणि सुयोग्य संतुलित आहार यांचा समावेश दैनंदिन जीवनशैलीत अथवा दिनक्रमाने करायलाच हवा. कारण मुलांच्या वाढत्या वयातील शारिरीक ऊर्जा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. घरातच मोबाईलवर खेळा, दूरदर्शनवरील धारावाहिका पहा असा आपण त्यांना सल्ला व धाक देत असतो. शारीरिक ऊर्जेचे परिवर्तन चरबीमध्ये झाले की मग ‘‘फिटनेस’’साठी प्रयत्न करतो. ज्याक्षणी शारीरिक हालचाली मंदावतील, त्या क्षणापासून अनेक व्याधी, तक्रारी सुरू होतील. आपण धाक देऊन मुलांच्या शारीरिक हालचाली थांबविल्यास आजारांना आवतन देणार हे निश्‍चित! शारीरिक हालचाली, कवायत, योगाने मन प्रसन्न आणि उत्साही होते. आळस, निराशा आणि नकारात्मक विचारांचा निचरा होतो. मन प्रसन्न असेल तर शरीरही प्रसन्न, ताजेतवाने असते. शारीरिक व्याधीमुळेच मानसिक आरोग्य बिघडते. त्याकरिता जीवनात शारीरिक हालचाली, खेळ, व्यायाम यांना स्थान द्यायलाच हवे. ‘‘निरोगी सुदृढ शरीर हाच खरा दागिना आहे’’ असे आपणही अनुभवता आहात.
मानसिक आरोग्य बिघडण्याचे पहिले कारण म्हणजे खाणं किंवा दैनंदिन आहार. मुलांचा आहार कधी कमी तर कधी जास्त असतो. आहार घेतात पण अनियमितपणा असतो. अति खाण्याच्या वृत्तीमध्ये कधी जंकफूड, कधी चिल्ड कोल्ड्रिंक असते. कधी भूकच नाही. आहार आवडता नाही. जेवणाला चवच नाही. खमंग व चमचमीत नाही… अशी अनेक कारणे सांगतात आणि जेवणं टाळतात. त्याचा परिणाम शरीरावर आणि मनावरही होतो. त्यामुळे मानसिक आरोग्य बिघडते. मूलं चिडचिडे, रागीट, उतावळी आणि हटवादी बनतात. मानसिक आरोग्य म्हणजे आपल्या मुलांच्या आयुष्यात घडणार्‍या आणि भविष्यात येणार्‍या बर्‍यावाईट, सुख आणि दुःखदायक अनुभवाना खंबीरपणे सामना करण्याचे मनोबल असणे. घरातील, समाजातील, विद्यालयातील व इतर व्यक्तींशी चांगला सुसंवाद साधून, एकमेकांना समजून आणि उमजून घेण्याची मानसिक शक्ती होय. संवेदनशील असणे हे सुयोग्य वर्तनाचं लक्षण आहे. पण अतिसंवेदनशील व हळवे होणे योग्य नाही. मात्र घडलेल्या घटनेनुसार अभिव्यक्त होताना संयम आणि समतोल राखणं महत्त्वाचं असतं. आपली मुलं नको तिथे आक्रमक किंवा हळवी होतात. त्यावेळी त्यांना कसं हाताळायचं, समजवायचं हे न सुचल्यामुळे आपण हतबल होतो. मुलांनी खेळात सातत्याने भाग घेतल्यास सहभावना, सहनाभूती, सात्त्विक वृत्ती जोपासली जाते. जिंकण्यासाठी नव्हे तर खिलाडू वृत्ती, सोशिकपणा जोपासण्यासाठी खेळ खेळायलाच हवेत. त्याचबरोबर मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेकविध पैलू पडतात.
आजच्या धकाधकीच्या जीवनात आपणा सर्वांना साध्या सोप्या आणि सुटसुटीत नियमांची आवश्यकता वारंवार भासते. अशा नियमांची व्याप्ती व मर्यादाही जास्त असली पाहिजे. वयाच्या सातव्या वर्षापासून ते पंधराव्या वर्षापर्यंत उपयोगी पडणारी नियमावली पुढे देत आहे…
१. आपल्या मुलांना स्वतःची काळजी घ्यायला प्रेरीत करा.
२. स्वतःवर आणि स्वतःच्या कार्यावर पूर्ण विश्‍वास ठेवायला शिकवा.
३. मुलांच्या जिज्ञासू वृत्तीला पोषक वातावरण निर्मिती करा.
४. स्वतःचे ध्येय, उद्देश आणि कार्याचा ध्यास ठरवायला शिकवा.
५. मुलांना योजना बनवायला प्रेरीत करून मदत करा.
६. मुलांना खेळाचे नियम जपत खिलाडू वृत्ती जपायला सांगा.
७. मुलांना कार्यानुभव मिळण्याकरिता कृती करायला प्रोत्साहन द्या.
८. मुलांना दैनंदिन जीवनातील व्यवहारज्ञान शिकवा.
९. घराची संस्कृती आणि शिष्टाचार पाळायला उद्युक्त करा.
१०. नेहमी विजेत्यासम वर्तन ठेवायला प्रेरित करा.
वरील दहाही नियमांमध्ये सूक्ष्म असा परस्पर संबंध आहे. त्यात मध्ये तर्कशुद्ध क्रमवारी आहे. आपणच आपल्या पाल्यांचे/मुलांचे आद्य गुरू आहात. प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि हितचिंतक आहात. याकरिता…
अ) स्वतःची जबाबदारी/दायित्व आणि सहनशीलता अंगी बाणविण्यासाठी उत्तम मार्गदर्शक व्हा.
ब) सर्वत्र घरी, विद्यालयात निःपक्षपातीपणाची कास धरायला प्रोत्साहन द्या.
क) परिस्थितीनुसार कणखर आणि मृदू वर्तन करण्यास प्रेरीत करा.
ड) यश आणि अपयश एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्हीचे दायित्व स्विकारण्यासाठी मन खंबीर ठेवण्यासाठी आपण साहाय्य करा. आपल्या अपत्याना कोणत्याही गोष्टी तर्कशुद्ध, ज्ञानरचनात्मक वृत्तीने आत्मसात करण्यास प्रोत्साहन द्या. आपल्या जीवनशैलीला अनुसरून केलेला सारासार विचार व अनुभव यातून सुजाण पालकत्व स्वीकाराल अशी अपेक्षा आहे.