सुंजवानमधील चारही दहशतवाद्यांचा खात्मा

0
165

>> शहीद सैनिकांची संख्या ५ वर : दहा नागरीक जखमी

जम्मू-पठाणकोट मार्गावर असलेल्या सुंजवान लष्करी तळावर शनिवारी पहाटे जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याविरोधातील मोहीम भारतीय जवानांनी सर्व चारही दहशतवाद्यांचा खात्मा करून फत्ते केली असली तरी या तुंबळ धुमश्‍चक्रीत हौतात्म्य पत्करलेल्या जवानांची संख्या काल पाचवर गेली.

एका स्थानिक नागरीकाचाही यावेळी मृत्यू झाला. या मोहिमेदरम्यान परिसरातील सहा महिला व बालकासह १० जण जखमीही झाल्याचे सांगण्यात आले.
शनिवारी पहाटे सुरू झालेली मोहीम चारही दहशतवाद्यांचा खात्मा करून काल दुपारी संपली. या दहशतवाद्यांजवळ एके-५६ रायफली, हातबॉम्ब व अन्य दारूगोळा यांचा साठा लष्कराने ताब्यात घेतल्याची माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने दिली.

जखमी झालेल्या महिलांपैकी एक महिला गर्भवती होती. सदर महिलेची नंतर शस्त्रक्रियेद्वारे प्रसुती करण्यात आली. महिला व अर्भकाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. तसेच एका १४ वर्षीय मुलाच्या कपाळावर गोळी लागली असून त्याची प्रकृती गंभीर आहे. या लष्करी तळावर जवानांची अनेक कुटुंबे आहेत. ही कुटुंबे राहत असलेल्या ठिकाणीच दहशतवादी घुसले होते. त्यानंतर त्या भागाला भारतीय सैनिकांनी वेढा घातला होता. या दहशतवादी हल्ल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेकडून मिळाली होती.

नि:शस्त्र मदनलालचे
अतुलनीय शौर्य
सुंजवानच्या लष्करी तळावर ५० वर्षीय सुभेदार मदन लाल चौधरी याने नि:शस्त्र असूनही दहशतवाद्यांचा इरादा सफल होऊ दिला नाही. एके-५६ रायफलींसह सुसज्ज दहशतवाद्यांच्या हल्ल्याला मदनलाल बेडरपणे सामोरा गेला. अनेक गोळ्या त्याने छातीवर झेलल्या व आपल्या कुटुंबियांचे प्राण त्याने वाचविले. कुटुंबीय वस्तीत असलेल्या खोलीत येण्यापासून दहशतवाद्यांना रोखण्यासाठी मदनलालने अतुलनीय साहस दाखवले. त्याची २० वर्षीय मुलगी व मेहुणीही यावेळी जखमी झाली. मात्र मदनलाल शहीद झाला.