सीबीआयवर संशय

0
86

एका लाचखोर अधिकार्‍याचे अवघे कुटुंब कसे उद्ध्वस्त झाले त्याची कहाणी गेल्याच आठवड्यात माध्यमांद्वारे जगापर्यंत पोहोचली. केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयातील महासंचालक बालकिशन बन्सल यांना एका फार्मा कंपनीकडून नऊ लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयने रंगेहाथ पकडले आणि त्यानंतरच्या घटनाक्रमात आधी त्यांच्या पत्नी आणि मुलीने आत्महत्या केली आणि आता स्वतः बन्सल आणि त्यांच्या मुलानेही आत्महत्येचा तोच मार्ग स्वीकारला. एक कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त झाले. आता बन्सल पितापुत्रांनी मागे लिहून ठेवलेल्या चिठ्‌ठ्यांवरून मोठे राजकारण सुरू झालेले दिसते. सीबीआयने केलेल्या छळणुकीमुळेच आपल्या पत्नी आणि मुलीने आत्महत्या केली आणि आपणही तोच मार्ग अनुसरत आहोत असे त्या चिठ्ठीत लिहिलेले आहे. अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्ष आता या चिठ्ठीवरून सीबीआय आणि अर्थातच केंद्र सरकारविरुद्ध शड्डू ठोकून उभा ठाकलेला दिसतो आहे. त्याचे कारणही येथे नमूद करणे आवश्यक आहे. ज्या अधिकार्‍यापाशी या प्रकरणाचा तपास होता, त्याचे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याशी जवळचे संबंध आहेत असे केजरीवालांचे म्हणणे आहे. शिवाय त्यानेच केजरीवालांच्या सचिवांवर भ्रष्टाचार प्रकरणी छापे टाकून कारवाई केली होती! त्यामुळे बन्सल यांच्या आत्महत्येवरून हे सगळे राजकारण सुरू झालेले दिसते. मुळात संपूर्ण बन्सल कुटुंबियांनी आत्महत्येचा मार्ग अनुसरेपर्यंत सीबीआयने त्यांची छळणूक केली का हा या प्रकरणातील सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे. बन्सल यांच्या पत्नी आणि मुलीने आधी जी आत्महत्या केली, ती केवळ सीबीआयच्या छळणुकीमुळे केली की, बालकिशन यांना सीबीआयने लाच घेताना पकडल्याने झालेल्या मानहानीपोटी केली हे स्पष्ट होत नाही. दुसरे म्हणजे स्वतः बन्सल आमि त्यांच्या मुलानेही आत्महत्येचा मार्ग अनुसरला त्यालाही केवळ सीबीआयची छळणूक कारणीभूत आहे की इतर गोष्टी हेही स्पष्ट नाही. जरी बन्सल आणि मुलाने लिहून ठेवलेल्या चिठ्‌ठ्यांत सीबीआयच्या तपास अधिकार्‍यांची नावे असली, तरी केवळ छळणुकीमुळेच त्यांनी हा मार्ग अनुसरला की आपल्यावर कारवाई करणार्‍या सीबीआय अधिकार्‍यांवर सूड उगवण्यासाठी त्यांनी हा टोकाचा मार्ग अनुसरला हे सांगणे अवघड आहे. सीबीआयचा तपास योग्य पद्धतीने झाला होता का, की त्यात खरोखरच बन्सल कुटुंबाची छळणूक चालवली होती याची शहानिशा वरिष्ठ पातळीवरून आणि निष्पक्षपातीपणे व्हायला हवी. याचे कारण सीबीआयच्या एकंदर कार्यपद्धतीबाबत जनतेमध्ये आधीच अविश्‍वास आहे. सीबीआयची कार्यपद्धती ही नेहमीच ‘हिज मास्टर्स व्हॉईस’ या प्रकारची असते असे आजवर दिसून आलेले आहे. ज्याचे सरकार, त्याची री ओढायची आणि त्याच्याच निर्देशांनुसार कारवाया करायच्या यासाठी सीबीआय बदनाम आहे. त्यामुळे बन्सल प्रकरणात त्यांनी लाच स्वीकारली असल्याने ते गुन्हेगार जरी असले, तरी सीबीआयने तपासाच्या नावाने त्यांची विशिष्ट हेतूने छळणूक तर चालवली नव्हती ना या उपस्थित करण्यात येत असलेल्या शंकेचे निरसनही होणे आवश्यक आहे. या अनुषंगाने खरे तर सीबीआयच्या कार्यपद्धतीचे मापदंड निश्‍चित करणे अधिक जरूरीचे आहे. सीबीआयचे कोणतेही तपासकाम, छापे, कारवाई हे सगळे विशिष्ट हेतूप्रेरित व राजकीय आश्रयदात्यांच्या सांगण्यानुसार होत असते का या जनतेच्या मनातील संशयाचे निराकरण करणारी निष्पक्ष, स्वायत्त कार्यपद्धती जोवर सीबीआय अनुसरू शकत नाही, तोवर हा संशय असाच राहणार आहे. बन्सल यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाचे केवळ राजकारण करण्यापेक्षा सीबीआयच्या स्वायत्ततेसंदर्भात आजवर जी पावले टाकली गेली, ती अधिक वेगवान करण्याच्या दिशेने प्रयत्न व्हायला हवेत.