सीएएमुळे गांधीजींची इच्छापूर्ती ः राष्ट्रपती

0
205

>> संसदेत अभिभाषणावेळी विरोधकांचा आक्षेप

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने प्रारंभ झाला. यावेळी कोविंद यांनी मोदी सरकारने नुकत्याच संमत केलेल्या सिटिझन्स अमेंडमेंट ऍक्ट (सीएए) या कायद्यामुळे राष्ट्रपिता महात्मा गांधींची इच्छापूर्ती झाल्याचे आपल्या भाषणात नमूद केले. यावेळी विरोधकांनी आक्षेप घेत गदारोळ केला.

सीएए हा कायदा एक ऐतिहासिक कायदा असल्याचे कोविंद यांनी सांगितले. यावेळी काही विरोधी सदस्यांनी ‘शेम शेम’ अशा घोषणा दिल्या. तसेच फलक उंचावले. वादविवाद व चर्चा यामुळे लोकशाही सशक्त होते. मात्र निषेधावेळी हिंसाचार झाल्यास त्यामुळे लोकशाही कमकुवत होते असे कोविंद म्हणाले. सीएए विरोधी आंदोलनादरम्यान होणार्‍या हिंसाचारांच्या अनुषंगाने त्यांनी ही टिप्पणी केली.

सरकारकडून विक्रम
सत्तेवर येऊन अवघ्या ७ महिन्यांत मोदी सरकारने अनेक महत्त्वाचे कायदे तयार करून विक्रम केल्याचा दावा राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात केला. मोदी सरकारने हे शतक भारताचे शतक करण्याच्या दिशेने खंबीर पावले उचलली असल्याचे ते म्हणाले.
दहशतवादाच्या बिमोडासाठी मोदी सरकारने सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक दिली असल्याचा उल्लेख कोविंद यांनी केला.

काळ्या फिती बांधून
विरोधकांची उपस्थिती
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी राहुल गांधी यांच्यासह १४ विरोधी पक्षसदस्यांनी सीएएच्या निषेधार्थ हातावर काळ्या फिती लावून उपस्थिती दर्शवली. सेंट्रल हॉलच्या एकाच भागात हे विरोधक बसले होते. विरोधी पक्षनेता म्हणून पुढच्या रांगेत आरक्षित आसन कॉंग्रेस नेत्यांनी स्वीकारले नाही.