सिद्धार्थला न्याय

0
231

पणजी विधानसभा मतदारसंघाच्या येत्या पोटनिवडणुकीत अखेर उत्पल पर्रीकर यांच्या ऐवजी सिद्धार्थ कुंकळकर यांना उमेदवारी घोषित करून भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने उशिरा का होईना, राजकीयदृष्ट्या उचित पाऊल उचलले आहे. ही पोटनिवडणूक लढवून वडिलांचा राजकीय वारसा चालवण्याची भले उत्पल यांची किंवा त्याहून अधिक त्यांच्या पाठीराख्यांची तीव्र इच्छा जरी असली, तरी या पोटनिवडणुकीचा एकूण रागरंग पाहता तेथे सिद्धार्थसारख्या अनुभवी व्यक्तीलाच रिंगणात उतरवणे शहाणपणाचे ठरणार आहे. उत्पल आणि अभिजात हे मनोहर पर्रीकर यांचे दोन्ही पुत्र आजवर कधीही राजकारणाच्या प्रवाहात सक्रियपणे उतरलेले नव्हते. मनोहर पर्रीकर यांनी आपल्या मुलांचे, आपल्या कुटुंबाचे खासगीपण नेहमीच जपले. पक्षापासून, राजकारणापासून त्यांना कसोशीने दूर ठेवले. अर्थात मनोहर पर्रीकर यांच्या मृत्यूनंतर त्यांनी मागे ठेवलेला राजकीय वारसा खांद्यावर घेऊन पक्षकार्यात सक्रिय होण्याची इच्छा त्यांचे ज्येष्ठ पुत्र उत्पल यांच्या मनात उपजली तर ते चूक म्हणता येत नाही. मनोहर यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी त्यांच्या उत्तराधिकार्‍याचे पक्षकार्यात व राजकारणात उतरणे आवश्यक आहे असे त्यांच्या हितचिंतकांना वाटले तर तेही चूक नव्हे, परंतु उत्पल यांच्या राजकारणातील आगमनासाठी सिद्धार्थ कुंकळकर यांचा पुन्हा एकदा बळी देणे योग्य नव्हते. जनतेमधूनही तशा प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या, कारण उत्पल हे आहेत कसे, बोलतात कसे, वागतात कसे हे आजवर कोणीच पाहिलेले नव्हते. म्हापशाच्या सभेत आपल्याला पाच कमळे मिळवून द्या असे आवाहन त्यांनी जनतेला केले तेव्हाच त्यांची छबी आम गोवेकरांनी प्रथम पाहिली. मनोहर पर्रीकर यांच्यासाठी सिद्धार्थ यांनी दोन वेळा क्षणांत आपल्या आमदारकीवर पाणी सोडून पर्रीकरांचे आपल्यावरील ऋण सव्याज फेडले यात त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि पक्षनिष्ठा दिसून आली. परंतु त्यांच्या त्या त्यागाला गृहित धरून पुन्हा एकवार पर्रीकरांच्या पुत्रासाठीही त्यांना राजकारणातून अकारण बाजूला फेकणे हे न्यायोचित ठरले नसते. त्यातून घराणेशाहीचीही टीका सुरू झाली होती. उत्पल यांनी आपल्याला सक्रिय राजकारणात उतरण्याची इच्छा असल्याचे संकेत दिले, तेव्हा सिद्धार्थ यांनी आपण त्यांच्यासाठी काम करायला तयार आहोत असे जाहीररीत्या सांगितल्याने जनमानसातील सिद्धार्थ यांची प्रतिमा उंचावली होती. उत्पल पर्रीकर हे राजकारणात पूर्णपणे नवखे आहेत. आपण लहानपणापासून पक्षकार्य आणि पितृकार्य जवळून बघत आलो, असे त्यांचे जरी म्हणणे असले, तरी स्वतः पर्रीकरांनी त्यांना आपले राजकीय उत्तराधिकारी घडविण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न केल्याचे गोमंतकीयांच्या तरी कधी पाहण्यात नव्हते. त्यामुळे उत्पल यांचे राजकारणातील आगमन भावनिकदृष्ट्या जरी मतदारांना साद घालणारे ठरू शकत असले, तरी पणजी पोटनिवडणुकीचा सध्याचा रागरंग पाहता ते कितपत व्यावहारिक ठरले असते याबाबत साशंकता होती. पहिली बाब म्हणजे यावेळी बाबूश मोन्सेर्रात यांच्यासारखा बाहुबली उमेदवार कॉंग्रेसच्या तिकिटावर लढण्यासाठी समोर शड्डू ठोकून उभा आहे. त्यातच माजी संघचालक सुभाष वेलिंगकर यांनी पणजीच्या पोटनिवडणुकीतून राजकीय रिंगणात उडी घेतलेली आहे. त्यामुळे पणजीतून भाजपच्या तिकिटावर लढणार्‍या उमेदवारापुढे हे असे दुहेरी आव्हान उभे आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक केवळ मनोहर पर्रीकर यांच्या मृत्यूच्या भावनिक मुद्दयावर जिंकण्याइतपत सोपी राहिलेली नाही. त्यामुळे अशा अटीतटीच्या निवडणुकीतून उत्पल पर्रीकर यांचे राजकीय पदार्पण त्यांच्यासाठी आणि पर्यायाने पक्षासाठी धोक्याचे ठरू शकले असते. त्यामुळे सिद्धार्थ यांच्यासारख्या दोनवेळा विजय संपादन केलेल्या सक्रिय, अनुभवी स्पर्धकालाच पुन्हा रिंगणात उतरवण्याचा निर्णय पक्षाने घेतला. मात्र, या निर्णयाला मनोहर पर्रीकर यांच्या पुत्राला तिकीट नाकारले असा विपरीत रंग दिला जाणे गैर आहे. स्वतः उत्पल यांच्या राजकीय पदार्पणाची ही तर नुसती सुरूवात आहे. त्यांनी आधी पक्षकार्य करावे, कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा विश्वास संपादन करावा, पक्षकार्याचा, राजकारणाचा थोडा अनुभव घ्यावा आणि नंतर पित्याचा राजकीय वारसा चालवण्यासाठी सज्ज व्हावे. चार पावले पुढे जाण्यासाठी प्रसंगी दोन पावले मागे यावे लागतेच. गोव्याच्या राजकारणात लंबी रेसका घोडा ठरायचे असेल तर तूर्त दोन पावले मागे यायला हरकत नसावी!