सिक्किम १३६वर गारद; गोव्याची दमदार सुरुवात

0
103

गोलंदाजांच्या शानदार कामगिरीमुळे गोव्याने प्लेट गट रणजी चषक स्पर्धेच्या आपल्या शुभारंभी लढतीत काल सिक्किमला १३६ धावांवर गारद केले. प्रत्युत्तरात स्मित पटेलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पहिल्या दिवसअखेरपर्यंत ३ गडी गमावत १२४ धावा केल्या असून ते केवळ १२ धावांनी पिछाडीवर आहेत. पर्वरी क्रिकेट अकादमीच्या मैदानावर ही स्पर्धा खेळविली जात आहे.

गोव्याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला व त्याचा हा निर्णय योग्य ठरविताना लक्षय गर्ग, हेरंब परब आणि फेलिक्स आलेमाव या दु्रतगती गोलंदाजांनी सूत्रबद्ध मारा करीत सिक्किमचा पहिला डाव १३६ धावांवर संपुष्टात आणला. गोव्याच्या भेदक मार्‍यासमोर एकवेळ सिक्किमची स्थिती ८ बाद ९३ अशी झाली होती. परंतु त्यांच्या ली यॉंग लेपचाने ९ चौकारांच्या सहाय्याने ११७ चेंडूत ५६ धावांची खेळीत करीत संघाला १३६ धावांपर्यंत नेले. त्याने पाल्जर तेमंगच्या साथीत नवव्या विकेटसाठी ४३ धावा जोडल्या. गोव्याकडून लक्षय गर्गने ३ तर हेरंब परब, फेलिक्स आलेमाव व दर्शन मिसाळ यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

प्रत्युत्तरात खेळताना गोव्याची सुरुवातही एकदम खराब झाली. सुमिरन आमोणकर (४) आणि आदित्य कौशिक (४) हे दोघे सलामवीर झटपट तंबूत परतल्याने गोव्याच्या २ बाद २८ अशा धावा झाल्या होत्या. परंतु त्यानंतर फलंदाजीस आलेल्या व्यवसायिक क्रिकेटपटू स्मित पटेलने ११ चौकारांच्या सहाय्याने ५८ चेंडूत ५३ धावांची अर्धशतकी खेळी केल्याने दिवसअखेरपर्यंत गोव्याने ३ बाद १२४ अशी सुस्थिती गाठली आहे. स्मित फिरकीपटू इक्बाल अब्दुल्लाच्या गोलंदाजीवर पायचित होऊन परतला. तत्पूर्वी त्याने कर्णधार अमित वर्माच्या तिसर्‍या विकेटसाठी महत्त्वपूर्ण ७३ धावा जोडल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अमित वर्मा ३४ तर स्नेहल कवठणकर ११ धावांवर नाबाद खेळत होते. सिक्किमकडून इश्वर चौधरी, इक्बाल अब्दुल्ला आणि पाल्जोर तामंग यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक ः सिक्किम, पहिला डाव ः ५८.२ षट्‌कांत सर्वबाद १३६, (फैजान खान २०, यशपाल सिंग १४, इक्बाद अब्दुल्ला १०, पाल्जोर तामंग १६, ली यॉंग लेपचा ५६ धावा. लक्षय गर्ग-२३, हेरंब परब २-३२, फेलिक्स आलेमाव २-२९, दर्शन मिसाळ २-१२, अमुल्य पांड्रेकर १-१८ बळी), गोवा पहिला डाव ः २८ षट्‌कांत ३ बाद १२४, (सुमिरन आमोणकर ४, आदित्य कौशिक ४, स्मित पटेल ५६, अमित वर्मा खेळत आहे ३४, स्नेहल कवठणकर खेळत आहे ११ धावा. इश्वर चौधरी, पाल्जर तामंग, इक्बाल अब्दुल्ला प्रत्येकी १ बळी).