सिंधू, सायना दुसर्‍या फेरीत

0
97

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू व सायना नेहवाल यांनी परस्परविरोधी विजय मिळवताना आशिया बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. ऑलिम्पिक व जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या रौप्यपदक विजेत्या सिंधूने जपानच्या ताकाहाशी सायाका हिला एकतर्फी लढतीत २१-१४, २१-७ असे केवळ २८ मिनिटांत गारद केले. पुढील फेरीत तिचा सामना इंडोनेशियाच्या चोयरुनिसा हिच्याशी होणार आहे. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या सायना नेहवाल हिला मात्र विजयासाठी अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागली. सातव्या मानांकित सायनाने पहिला गेम गमावल्यानंतर चीनच्या हान युई हिला १२-२१, २१-११, २१-१७ असे पराभूत केले. दुसर्‍या फेरीत तिच्यासमोर दक्षिण कोरियाच्या किम गा इयुन हिचे आव्हान असेल.

पुरुष एकेरीत समीर वर्माने संघर्षपूर्ण लढतीत जपानच्या साकाई काझुमासा याचे आव्हान २१-१३, १७-२१, २१-१८ असे परतवून लावले. पुढील फेरीत समीरला हॉंगकॉंगच्या एनजी का लॉंग अँगस याच्याशी दोन हात करावे लागतील. पाचव्या मानांकित किदांबी श्रीकांत याला पहिल्याच फेरीत धक्कादायक पराभवाने गाशा गुंडाळावा लागला. इंडोनेशियाच्या शेसार हिरेन रुस्तावितो याने श्रीकांतला २१-१६, २२-२० असे हरविले.

पुरुष दुहेरीत एमआर अर्जुन व श्‍लोक रामचंद्रन यांचे आव्हान पहिल्याच फेरीत आटोले. त्यांना चीनच्या ही जिटिंग व टान क्वियांग यांनी २१-१८, २१-१५ असे पराजित केले. महिला दुहेरीत मेघना जक्कमपुडी व पूर्विशा राम यांना थायलंडच्या जोंकोलफान किथिथाराकूल व रविंदा प्रांजोगजाय यांनी २१-१३, २१-१६ असे स्पर्धेबाहेर फेकले.