सिंधू, प्रणिथ उपउपांत्य फेरीत

0
109

पी.व्ही. सिंधू व बी. साई प्रणिथ यांनी परस्परविरोधी विजय मिळवत जपान ओपन ‘सुपर ७५०’ बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत काल गुरुवारी प्रवेश केला. इंडोनेशिया ओपन ‘सुपर १०००’ स्पर्धेच्या उपविजेत्या सिंधूने जागतिक क्रमवारीत विसाव्या स्थानी असलेल्या जपानच्या अया अहोरी हिला एका गेमच्या पिछाडीनंतर ११-२१, २१-१०, २१-१५ असे पराजित केले. यापूर्वी सिंधूला पाच प्रयत्नांनंतरही जपान ओपनची दुसरी फेरी ओलांडणे शक्य झाले नव्हते. प्रणिथला विजयासाठी फारसा घाम गाळावा लागला नाही. त्याने केवळ ४५ मिनिटांत कांता त्सुनेयामा याचा खेळ २१-१३, २१-१६ असा खल्लास केला. पुढील फेरीत त्याच्यासमोर इंडोनेशियाचा टॉमी सुगियार्तो असेल. पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी व सात्विकसाईराज रंकीरेड्डी यांनी चीनच्या काय शियांग हुआंग व चेन लियू यांचा १५-२१, २१-११, २१-१९ असा पराभव करत अंतिम ८ जोडींत स्थान प्राप्त केले.

जपानच्या अहोरीने पहिल्या गेममध्ये आपल्या अप्रतिम क्रॉस कोर्ट फटक्यांनी दबाव टाकत भारताच्या २४ वर्षीय सिंधूला झुकण्यास भाग पाडले. पहिला गेम सहज जिंकत तिने सिंधूला विचार करण्यास भाग पाडले. सिंधूने अहोरीची रणनीती ओळखून दुसर्‍या गेममध्ये आपल्या खेळात बदल केला. सिंधूने ओहोरीला दीर्घ रॅलीजमध्ये गुंतवून ठेवले. वेळोवेळी नेटलगत हळुवार फटकेदेखील खेळत अहोरीचे अस्त्र निकामी करताना सिंधूने दुसरा गेम एकतर्फी जिंकला. तिसर्‍या व निर्णायक गेममध्ये सिंधूने ८-४ अशी आघाडी घेतली होती. परंतु, अहोरीने सलग चार गुण मिळवत ८-८ अशी बरोबरी साधली. यानंतर मात्र सिंधूने अहोरीला क्वचितच संधी दिली. अहोरीचा सिंधूविरुद्धचा हा सलग आठवा पराभव ठरला. तिला सिंधूविरुद्ध एकदाही विजय मिळविता आलेला नाही. आज शुक्रवारी पाचव्या मानांकित सिंधूचा सामना चौथ्या मानांकित अकाने यामागुची हिच्याशी होणार आहे. यामागुचीविरुद्ध सिंधूचा जय-पराजयाचा रेकॉर्ड १०-५ असा शानदार आहे.