साहित्याचा स्नेहोत्सव

0
234
  • सोनाली शेणवी देसाई

इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझातर्फे फर्मागुडीच्या आवारात दोन दिवसांचा साहित्यिकांचा स्नेहमेळावा आयोजित केला होता. या स्नेहमेळाव्यात विविध साहित्यिक कार्यक्रमांसोबतच इतर सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते. या साहित्यिक मेळाव्याचा हा थोडक्यात आढावा.

शनिवार दि. १० आणि रविवार दि. ११ मार्च असे दोन दिवस इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझातर्फे कवी-लेखक साहित्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मला सगळ्यांसोबत बसगाडीने जाता आलं नाही. सगळीजण शनिवारी दुपारी साडेतीन वाजता फोंडा फार्मागुडी येथे जमायचं ठरलं होतं, मला मात्र पोहोचेपर्यंत साधारण तासभर उशीरच झाला. मेळाव्याच्या उद्घाटन सत्राला सुरुवात व्हायचीच होती. मी गेल्यागेल्याच पाहिले तर या मेळाव्याचे प्रेरणास्थान आणि संस्थेचे सदस्य सचिव गोरख मांद्रेकर सर सगळ्याचे हसतमुखाने स्वागत करत होते. आपलेपणाची भावना स्वागतात दडलेली असते. प्रत्येकाची नावनोंदणी झाल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रख्यात लेखिका प्रतिभा कारंजकर यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी गोमंतकीय कवी, साहित्यिक पुष्पाग्रज ऊर्फ अशोक नाईक तुयेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा संस्थेतर्फे आयोजित करण्यात येणार्‍या प्रत्येक कार्यक्रमात नेहमीच वेळेचे महत्व पाळले जाते. यावेळीही अशाच प्रकारे विविध सत्रांचे आयोजन करण्यात आलेले. पहिल्या सत्रात ज्येष्ठ कवी पुष्पाग्रज, लेखिका प्रतिभा कारंजकर यांच्या हस्ते मेळाव्याचे उदघाटन झाले. त्यानंतर मेळाव्यात सहभागी झालेल्या साधारण साठ कवींनी आपल्या कविता सादर केल्या. यावेळी पहिल्यांदाच प्रकर्षाने जाणवले की मेळाव्याच्या व्यासपीठावर मराठी, कोंकणी, हिंदी अशा तीन वेगळ्या भाषेतील कविता सादर करण्यात आल्या. कविता फक्त वाचूनच नाही तर गाऊनही सादर करण्यात आल्या. पुष्पाग्रज आणि आर. रामनाथ यांनी उत्फूर्त कविता, चारोळी सादर करून कार्यक्रमात उत्साह भरला. साहित्याची देवाण-घेवाण महत्वाची आहे. साहित्याला उच्च पातळीवर नेण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे इथे भाषेला महत्व देणे आयोजकांनी टाळले होते. आयोजकांचा हा उपक्रम खरोखर कौतुकास्पद होता.

मेळाव्यात जमलेली बरीच लेखक आणि कवी मंडळी एकमेकांच्या ओळखीची होती. तर काही अगदीच नवीन चेहरे. तरीही ग्रुपिझम
मात्र इथे दिसून आले नाही. ज्येष्ठ कवींनी नवोदित कवी-लेखकांचे कौतुक केलेच. पण कुठली पुस्तके वाचावी, कशा पद्धतीने लेखन करावे अशा माहितीचे आदानप्रदान केले. रात्री मनोरंजनाच्या कार्यक्रमात लेखन वगळता आपल्यात असणार्‍या इतर कलागुणाचं दर्शनही कवी-लेखकांनी करून दिले. नूतन दाभोळकर, नयना आडारकर, ज्योती कुंकळीकर, गुलाब वेर्णेकर, आरती दिनकर, चित्रा क्षीरसागर, लक्ष्मण पित्रे, हनुमंत चोपडेकर, राजय पवार अशा अनेक कवींनी कार्यकमात अधिक रंजकता आणली.

दुसर्‍या दिवशी सकाळी योगाने दिवसाची प्रसन्न सुरुवात करण्यात आली. भारत स्वाभिमानचे डॉ. सूरज काणेकर यांनी योगाचे धडे दिले. त्यानंतर झालेल्या सत्रांत बाल साहित्य आणि विनोदी साहित्याबाबत चर्चा करण्यात आली. मुलांना साहित्याकडे कसे वळविता येईल यावर उपस्थितांनी सल्ले दिले. तर विनोदी साहित्य हे हलकेफुलके जीवन जगण्यासाठी आवश्यक असूनही त्याकडे अजून गंभीरतेने पहिले जात नाही याकडे लक्ष केंद्रित केले. कला संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांचे साहित्यप्रेम या मेळाव्यावेळी दिसून आले. व्यासपीठावरून एका कवितेचे कडवेही यावेळी त्यांनी सादर केले. संस्थेच्या कर्मचारी आशा गेहलोत आणि इतर
कर्मचारीही संस्थेचा मेळावा हा केवळ सरकारी काम नसून तो घरचा कार्यक्रम असल्याच्या भावनेत वावरत होते. रविवारी दुपारी फार्मागुडीच्या निसर्गरम्य परिसरातून सगळ्यांनी एकमेकांचा स्नेह जपत निरोप घेतला.