सासष्टी तालुक्याचा पाणीपुरवठा रोखण्याचा सांगेवासियांचा इशारा

0
240

>> धरण असूनही पाणी टंचाईमुळे संताप

राज्यातील एक मोठे धरण सांगे तालुक्यात असूनही तालुक्यातील ५ पंचायतींना अद्याप पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत ही व्यवस्था करण्यात यावी अन्यथा आंदोलन करून सासष्टी तालुक्याला होणारा पाणीपुरवठा बंद पाडण्याचा इशारा सांगे तालुक्यातील लोकांनी दिला आहे, असे सांगेचे माजी आमदार व भाजप नेते सुभाष फळदेसाई यांनी काल येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

साळावली येथे धरण उभे रहावे यासाठी सांगे तालुक्यातील लोकांनी जमिनी दिल्या. मात्र, साळावली धरणासाठी ३५ वर्षांपूर्वी जमिनी दिलेल्या जमिनदारांचे अद्याप पुनर्वसनही झालेले नाही. ज्या तालुक्यात धरण उभे राहिले त्या तालुक्यातील ५ पंचायतींना अजूनही पाणीपुरवठा केला जात नाही. त्यामुळे लोक भडकले असून अशा परिस्थितीत आम्ही आता आयआयटीला जमीन का द्यावी, असा पवित्रा या लोकांनी घेतला असल्याचे फळदेसाई म्हणाले.

सासष्टी तालुक्यातील लोक आपल्या तालुक्यात एकही प्रकल्प येऊ देत नाहीत. सरकारने एखादा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केला तर त्याला कडाडून विरोध केला जातो. सरकारने कुजिरा येथे ज्या प्रकारे विद्यालय संकुल उभारले आहे त्याचप्रमाणे संकुल दवर्ली येथे उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र, सासष्टीतील लोक या प्रकल्पालाही विरोध करीत असल्याचे फळदेसाई म्हणाले.