सावधान ! अमली पदार्थ बनतोय गोव्याची संस्कृती

0
125
  • शंभू भाऊ बांदेकर

पंजाब राज्याचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मंत्रिमंडळ बैठक घेऊन अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी दोषी ठरवलेल्या गुन्हेगारांना मृत्युदंड ठोठावण्याची शिफारस केंद्र सरकारला पाठविली आहे. स्तुत्य असाच हा निर्णय असून कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ड्रग्ससंबंधित दोषींना नेस्तनाबूत करण्याचा मार्ग सुचवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनीही असा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे ठेवून संमत करून केंद्राकडे पाठवावा.

पूर्वी गोवा आणि आसपासचे लोक विशेषत: एप्रिल-मे महिन्यात विश्रांतीसाठी घटप्रभा येथे जायचे. तेथील आरोग्यधामात गोव्याचे सुपुत्र कै. डॉ. माधवराव वैद्य यांच्याकडे रक्ततपासणी, लघवी वगैरेंच्या प्राथमिक चाचण्यांपासून अनेक रोगांवर रामबाण उपायांची सोय केली होती. त्यांच्या हयातीत व नंतरही डॉ. वैद्य यांचे पुत्र, कन्या आरोग्यधामात कार्यरत होते व बहुधा अजूनही असावेत.

गोव्यात लागून असलेल्या महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गुजरात अशा राज्यांतून (आता तर मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार राज्यांचा समावेश करावा लागेल) विश्रांतीसाठी हवापालट म्हणून शांत, निसर्गरम्य गोव्याची निवड करायचे. यात मात्र, ‘खाओ, पिओ मजा करो’ वाल्यांचाही समावेश असायचा. आता याच राज्यांतून (आणि तामीळनाडू, दिल्लीतून) पर्यटनाच्या नावाखाली बारमाही लाखो नागरिक गोव्यात येत असतात. यात त्यांचा ओढा मद्यपान, अमली पदार्थांची देवाणघेवाण आणि अनैतिक व्यवहार यांच्याकडे असतो, हे आता उघड गुपित होऊन राहिले आहे.
पूर्वी लोकांना गोव्यातील तळलेले ताजे मासे, ताज्या मासळीचे हुमण, ताज्या भाज्या, गावठी (घरगुती) कोंबडीचे चिकन, कोवळ्या बकर्‍याचे मटण यांचे अप्रूप असायचे. आता यांचा आस्वाद तर ते मनमुरादपणे घेतातच, पण भरीस कॅसिनो, समुद्रस्नान, संगीत रजनी, मद्यपान वगैरे वगैरे सुविधा हात जोडून उभ्या असल्यामुळे ते जिवाचा गोवा करून पैशांची उधळपट्टी करून निरोप घेतात. तोही लवकरच पुनश्‍च ‘हरि ॐ’ म्हणून गोव्यात येण्याचा बेत आखूनच!

या सगळ्या व्यवहारात गोव्याला महसूल मिळतो. स्थानिकांच्या खिशात चार पैसे घोळतात इथपर्यंत हे ठीक आहे, पण संस्कृतीला मारक आणि युवापिढीला घातक ठरणारा हा ‘अव्यापारेषु व्यापार’ तर नाही ना, हा प्रश्‍न ना सत्ताधार्‍यांना सतावत आहे ना संस्कृतीचे गोडवे गाणार्‍यांना जाचक वाटत आहे. हे असेच चालू राहिले तर कळत वा नकळत तो येथील संस्कृतीचा एक अविभाज्य घटक बनेल याचा सत्ताधारी विचार करणार आहेत की नाही, हाच खरा प्रश्‍न आहे.
पूर्वी अमली पदार्थांची देवाणघेवाण विदेशी नागरिक करीत असत. अमलीपदार्थविरोधी खास पथकाने अनेकवेळा त्यांना मुद्देमालासह रंगेहाथ पकडले. त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली. त्यांचा व्हिसा रद्द करण्यात आला. त्यांना घडलेल्या अद्दलीमुळे ते शहाणे झाले आणि झटपट पैसे करण्याच्या अट्टहासापोटी देशी नागरिक स्थानिकांच्या सहकार्याने हा धंदा चालवू लागले आणि तेही राजरोसपणे.

सत्ताधारी आमदार तथा उपसभापती मायकल लोबो यांनी खास पत्रकार परिषद घेऊन ड्रग्स व्यवहार केव्हा, कुठे चालतो हे सांगितले होते, पण कुणावरही काहीही कारवाई झाल्याचे वाचनात आले नाही. आता तर आमदार दयानंद सोपटे यांनी, राज्यातील ड्रग्स व्यवहाराला राजाश्रय मिळत असल्याचा आरोप करून ड्रग्स माफियांकडून राजकारण्यांना हप्ते मिळत असल्याचा दावाही केला आहे. मात्र, कोणत्याही राजकारण्याने आम्ही ड्रग्स माफियांकडून हप्ते घेत नाही व आम्ही हे आव्हान स्वीकारतो, असे अद्याप तरी म्हटलेले नाही.

पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांचे याबाबत म्हणणे असे की, राज्यात जो अमलीपदार्थांचा व्यवहार चालू आहे त्याविषयी सरकारला चिंता आहे. (अबब!) अमली पदार्थांचा व्यवहार करणार्‍या माफियांचे कंबरडे मोडण्यासाठी सरकारला पत्रकार व लोकांचे सहकार्य हवे आहे, कुठे कुठे हे व्यवहार चालू आहेत ते वरील घटकांनी दाखवून द्यावे असे आजगावकर म्हणाले. मला वाटते आमचे पर्यटनमंत्री पोलीस, पत्रकार यांना घेऊन उपसभापतींकडे गेले, तर हा व्यवहार कुठे, कसा आणि कुणाच्या पाठबळाने चालतो याची शहानिशा होऊ शकेल. आमदार सोपटेंनाही बरोबर न्यावे. म्हणजे मग, परत आरोप प्रत्यारोपांना जागा उरणार नाही व जनतेलाही दुधात पाणी जास्त आहे की, पाण्यात दूध कमी आहे की निव्वळ दूधच आहे, याचाही प्रत्यय येऊ शकेल!

ड्रग्ससंबंधित दोषींना मृत्युदंंडाची शिफारस पंजाब सरकारने केंद्र सरकारला पाठविण्यात आली असल्याचे नुकतेच माझ्या वाचनात आले. या बाबतची सविस्तर माहिती अशी की, राज्यातील विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्ती व नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात टीका व आंदोलने झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर पंजाब राज्याचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मंत्रिमंडळ बैठक घेऊन अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी दोषी ठरवलेल्या गुन्हेगारांना मृत्युदंड ठोठावण्याची शिफारस केंद्र सरकारला पाठविली आहे. स्तुत्य असाच हा निर्णय असून कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ड्रग्ससंबंधित दोषींना नेस्तनाबूत करण्याचा मार्ग सुचवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनीही असा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे ठेवून संमत करून केंद्राकडे पाठवावा. त्यासाठी सुजाण गोमंतकीय त्यांना मनापासून दुवा देतील.

हे झाले अमली पदार्थांसंबंधी. आता मटका जुगार कसा लोकांना फटका देतो ते पाहुया. वानगीदाखल आपण दहा दिवसांपूर्वी मोरजीत मटका अड्डा उद्ध्वस्त केला त्याकडे वळूया. मोरजी येथील एका घरातील मटका जुगार अड्‌ड्यावर दुपारी ३ वा. छापा टाकून ६० लाख रुपये व मटका जुगाराचे साहित्य जप्त केले गेले. तसेच प्रमुख संशयितांसह अकराजणांना अटक करण्यात आली. गोव्यातील आजपर्यंतचा हा सर्वात मोठा छापा आहे, असे उत्तर गोवा पोलीस अधीक्षक चंदन चौधरी यांनी या छाप्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. याबाबत पोलीस अधीक्षक चंदन चौधरी या शूर महिलेचे अभिनंदन केले पाहिजे, कारण या जुगारात अडकलेल्या पुरुष मंडळींना जेरबंद करून त्यांनी अनेक महिलांचा दुवा घेतला आहे.

अनेक संसार या मटक्यापायी उद्ध्वस्त झाल्याची उदाहरणे काही कमी नाहीत. मी फक्त मोरजीचे प्रकरण ताजे आहे व त्यात मिळालेले घबाड मोठे आहे म्हणून हे उदाहरण दिले. तसे पेडण्यापासून काणकोणपर्यंत आणि वास्कोपासून वाळपईपर्यंत अनेक ठिकाणी दिवसाढवळ्या हा मटका चालू असतो. तो कुणाच्या पुण्याईवर चालतो याचा छडा लावता येणे अगदीच अशक्य नाही. आता हेच पाहा ना, उत्तर गोव्यातील एका मंत्र्याने काही दिवसांपूर्वी ‘पेडणे तालुक्यातील मटका, जुगार कोण बंद करतो ते मी पाहतो,’ असे वक्तव्य केले होते. त्याचाच परिणाम हा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला. कदाचित त्यातील पोलीस घाबरणार किंवा तेही त्यात अडकलेले असणार म्हणून पोलीस अधीक्षकांनी स्थानिक पोलिसांना न कळवता गुप्त छापा घातला असे कळले. यानंतर सोशल मीडियावरून मागणी करण्यात आली की, या छाप्यानंतर पेडणे तालुक्यात मोठ्या प्रमाणात जुगारी अड्डे सुरू असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे पेडणे स्थानकातील सर्व अधिकारी आणि पोलिसांची बदली करावी. धिरयो, मटका, जुगार यावर पोलिसांचे नियंत्रण नाही. त्यामुळे बदली हाच त्यावर उपाय आहे. म्हणून अमलीपदार्थ व मटका याचे प्रमाण वाढत असून ते जणू येथील संस्कृतीचे घटक बनत आहेत. त्यामुळे त्यांचे नष्टचर्य शक्य तितक्या लवकर संपवले पाहिजे.