साळजीणीत दरड हटवण्याचे काम रोखल्याने तणाव

0
116

चार दिवसांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर दरड कोसळून साळजीणी गावाचा तुटलेला संपर्क पूर्ववत करण्यासाठी दरड हटविण्याचे सुरू असलेले काम काल वन खात्याने हरकत घेत बंद केल्याने साळजीणी गावात वातावरण तंग बनले आहे. दरम्यान, या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी आज उपवनपाल भेट देणार असल्याची माहिती स्थानिक आमदार तथा वनविकास महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद गावकर यांनी दिली.

वैले तुडव – साळजीणी हे गाव वन खात्याच्या नेत्रावळी अभयारण्य क्षेत्राखाली येते. त्या गावांना जाडणारा रस्त्याचे काम करण्यास वन खात्याची हरकत आहे. चार दिवसांपूर्वी जिथे दरड कोसळली होती त्या भागात मामलेदार, साबांखा, स्थानिक पंचायतीच्या पुढाकाराने काम सुरू होते. ते वन खात्याच्या अधिकार्‍यांनी काल अडवल्याने गावाकडे जाणार रस्ता अजूनही बंदच आहे. त्या जागेच्या १/१४ च्या उतार्‍यावर एक खाण कंपनी व ग्रामस्थाचे नाव आहे. वन खात्याचे कुठेच नाव नसताना रस्त्याचे काम कसे काय अडविण्यात येते असा प्रश्‍न सरपंच तथा साळजीणीच्या पंच सदस्य रजनी गावकर यांनी केला आहे.

दरम्यान, स्थानिक आमदार प्रसाद गावकर यांनी या प्रश्‍नावर आज अभयारण्य क्षेत्राचे उपवनपाल श्री. वराडकर यांना सोबत घेऊन पाहणी करणार असल्याचे सांगितले. स्थानिक पंचायत मंडळ, वन खाते व ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.