साळगावकरचा विजय

0
61

पणजी (क्री. प्र.)
गोवा प्रो लीग स्पर्धेतील काल सोमवारी धुळेर येथे झालेल्या सामन्यात साळगावकर एफसीने बार्देश एफसीचा ३-१ असा पराभव केला. कॉर्प्स ऑफ सिग्नल्सविरुद्धच्या सामन्यात चार गोल झळकावल्यामुळे आत्मविश्‍वास उंचावलेल्या साळगावकरने कालदेखील आक्रमक खेळाची पुनरावृत्ती केली. बार्देशने सामन्यातील पहिला गोल केला. ४५व्या मिनिटाला रिचर्ड कार्दोझच्या पासवर ड्वेन टिकलो याने हा गोल झळकावला. मोबिन राय याने अवैधरित्या चेंडू हाताळल्यामुळे साळगावकरला ७२व्या मिनिटाला पेनल्टी मिळाली. यावर मॅकरोयने गोल केला. बदली खेळाडू डॅनिल याने साळगावकरला २-१ असे आघाडीवर नेणारा गोल नोंदविला. स्टीफन सतरकर याने साळगावकरचा तिसरा गोल लगावला. साळगावकरने या सामन्यासाठी संघात दोन बदल केले तर एफसी बार्देशने धेंपोविरुद्ध दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर संघात काही नवीन खेळाडूंना संधी दिली.