‘सार्क’ परिषदेत भारताच्या प्रस्तावांस पाकचा विरोध

0
78

दक्षिण आशियाई देशांमध्ये जवळचे संबंध प्रस्थापित होण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे भरलेल्या ‘सार्क’ देशांच्या परिषदेत काल व्यक्त केली असतानाच पाकिस्तानने मात्र भारताने पुढे केलेल्या महत्त्वपूर्ण प्रस्तावांचा मार्ग रोखून धरला. त्यामुळे अठरावी सार्क परिषदही निष्फळ ठरली. ‘सार्क’ देशांदरम्यान व्यापार उदिमास चालना मिळावी यासाठी रस्ता व रेल वाहतूक खुली करणे, ऊर्जा ग्रिड एकत्रित करणे आदी भारताच्या प्रस्तावांस पाकिस्तानने विरोध केला आहे. मोदींनी आपल्या भाषणामध्ये त्या सूचना केल्या होत्या.
‘सार्क’ देशांदरम्यानचा संपर्क वाढवण्यासंदर्भातील कराराला ‘अंतर्गत प्रक्रिया पूर्ण झालेली नाही’ असे सांगत पाकिस्तानने विरोध केला. मात्र, हा विरोध औपचारिकरीत्या केला जात आहे का या प्रश्नावर पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांनी मौन पाळले.
दरम्यान, ‘सार्क’ देशांच्या संमेलनात प्रथमच सहभागी झालेल्या नरेंद्र मोदी यांनी ‘सार्क’ देशांदरम्यान अधिक चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत यासाठी काही सूचना केल्या. ‘सार्क’ च्या सदस्यांमध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान व श्रीलंका यांचा समावेश होतो. २००६ मध्ये या देशांदरम्यान मुक्त व्यापार करार होऊनही देशांतर्गत व्यापार केवळ पाच टक्के आहे. सार्क देशांदरम्यान मुक्त दळणवळण सुरू व्हायला हवे. विजेच्या समस्येवर मात करण्यासाठी वीज ग्रीडचे एकत्रिकरण व्हायला हवे आदी सूचना मोदींनी आपल्या भाषणात केल्या.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनीही आपल्या भाषणात ‘सार्क’ देशांदरम्यान प्रादेशिक सहकार्य झाले पाहिजे असे सांगितले होते, मात्र भारताच्या प्रस्तावांत पाकिस्तानने खोडा घातल्याने ‘सार्क’ परिषद निष्फळ ठरली आहे. ‘सार्क’ देशांदरम्यान मुक्त दळणवळण सुरू व्हावे यासाठी भारतातर्फे प्रस्ताव ठेवण्यात आला होता व श्रीलंकेनेही त्याचे जोरदार समर्थन केले होते. मात्र पाकिस्तानने त्याला विरोध दर्शवला. मंगळवारी भारत व नेपाळ दरम्यान अशा प्रकारचा वाहतूकविषयक करार झाला होता. पंतप्रधान मोदी यांनी काल आपल्या भाषणात आपण देशांच्या सामान्यजनांच्या जीवनाला जोडू शकलो तरच देशांमधील संबंध बळकट होतील असे मत मांडले होते. रस्ता व रेल्वेमार्ग जोडणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. ‘‘व्यापार, गुंतवणूक, प्रत्येक क्षेत्रातील सहाय्य व सहकार्य, लोकांदरम्यानचा संपर्क आणि अमर्याद जोडणी’’ अशी पंचसूत्री मोदींनी सांगितली. काल २६ नोव्हेंबर असल्याने मुंबईवरील हल्ल्याचाही मोदींनी आपल्या भाषणात उल्लेख केला. मोदींच्या सूचना उचलून धरताना श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी देशांदरम्यान चांगले दळणवळण राहिल्यास त्यातून आर्थिक सहकार्य वाढीस लागेल असे मत व्यक्त केले. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनीही भारताच्या प्रस्तावास पूरक मत व्यक्त केले.
पाकिस्तानने केलेल्या विरोधासंदर्भात भारताच्या विदेश व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते सईद अकबरुद्दिन यांना विचारले असता ते म्हणाले की करारांवर विविध पातळ्यांवर चर्चा सुरू असून कोणत्याही देशाने अधिकृतरीत्या विरोध केलेला नाही, मात्र काहींना त्यांची अंतर्गत प्रक्रिया पूर्ण करायची आहे. दरम्यान, सार्क परिषदेच्या अनुषंगाने यावेळी भारत व पाकिस्तानच्या पंतप्रधानांदरम्यान बैठक होणार नसल्याचे भारताने काल स्पष्ट केले.