सारस्वत समाजातील स्वातंत्र्यसेनानी ऍड. पांडुरंग सिनाई-मुळगावकर

0
135

– प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट

त्यांनी गोमंतक व गोमंतकाबाहेरही ‘गोमंतक मुक्तिचळवळी’साठी होणार्‍या सभा-बैठकांना उपस्थित राहून आपल्या वक्तव्यातून स्वातंत्र्यसेनानींच्या मनातील गोवा मुक्तीसंबंधीची ऊर्जा धगधगत ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य केले होते.

खोर्ली-म्हापसा येथील सारस्वत ब्राह्मण समाजातील आणखी एक स्वातंत्र्यसेनानी म्हणजे कै. ऍड. पांडुरंग मुळगावकर. स्वा.सै. ऍड. पांडुरंग जगन्नाथ सिनाई-मुळगावकर यांचा जन्म केपे तालुक्यातील ‘मोरकोरे’ या खेडेगावात १० ऑक्टोबर १९१७ रोजी झाला. मराठीतून प्राथमिक शिक्षण घेतल्यावर आल्तिनो-पणजी येथे ‘लिसेव’चा सात वर्षांचा पोर्तुगीज भाषेतून अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी कायद्याची वकिली सनद मिळवली. त्याचबरोबर पोर्तुगीज कायद्याची पदविकाही संपादन केली. इ.स. १९४८ च्या दरम्यान गोवा, दमण व दीव या पोर्तुगीज साम्राज्यशाहीच्या अधिपत्त्याखालील प्रदेशासाठी राजकीय कायदा तयार करण्यासाठी पोर्तुगीज शासनाने नेमलेल्या विधिमंडळावर नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. १८ जून १९४६ नंतर गोमंतक मुक्तिसंग्रामातील ज्या स्वातंत्र्यसेनानींना अटक करून प्रादेशिक लष्करी लवादासमोर त्यांची सुनावणी चालली होती त्यांचा बचाव करण्याचे वकीलपत्र स्वीकारून सुटकेसाठी त्यांनी प्रयत्न चालवले होते.

इ.स. १९५३ पासून ते ‘नॅशनल कॉंग्रेस- गोवा’चे सदस्य होते. इ.स. १९५३-५४ मध्ये ते ‘नॅशनल कॉंग्रेस- गोवा’ या संघटनेचे गोव्यातील शाखेच्या कार्यकारी मंडळाचे एक सदस्य म्हणून कार्यरत होते. ‘गोमंतकीय जनतेने पोर्तुगिजांची जुलमी राजवट आणि प्रादेशिक लष्करी लवादाने व न्यायालयाने दिलेला अटकेचा आदेश झुगारून गोमंतक मुक्तिचळवळीत सहभागी झाले पाहिजे’ हे सर्वसामान्य गोमंतकीय व स्वातंत्र्यसेनानी यांच्या मनावर बिंबवण्याचा अविरत प्रयत्न केला होता. इ.स. १९५३ व १९५४ मध्ये त्यांनी गोमंतक व गोमंतकाबाहेरही ‘गोमंतक मुक्तिचळवळी’साठी होणार्‍या सभा-बैठकांना उपस्थित राहून आपल्या वक्तव्यातून स्वातंत्र्यसेनानींच्या मनातील गोवा मुक्तीसंबंधीची ऊर्जा धगधगत ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य केले होते. गोवा मुक्तिसंग्रामातील त्यांच्या या सहभागाबद्दल ३० जून १९५४ रोजी पोर्तुगिजांनी त्यांना अटक करून आग्वाद तुरुंगात टाकले होते. पुढे मग प्रादेशिक लष्करी लवादासमोर सुनावणी होऊन ५ जुलै १९५५ रोजी त्यांना आठ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. शिवाय दर दिवसासाठी २० इश्कुदप्रमाणे (तत्कालीन पोर्तुगीज चलन) दोन वर्षे दंड व पंधरा वर्षांसाठी त्यांचे राजकीय व नागरी हक्क तात्पुरते स्थगित ठेवण्यात आले होते. त्यानंतर १७ मे १९५९ रोजी त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. तुुरुंगातून सुटका झाल्यावरही ते राष्ट्रीयवादी विचारसरणीच्या नागरिकांच्या आणि तुरुंगातून सुटून आलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या सतत संपर्कात राहून गोवा मुक्तिचळवळीत सहभागी होण्यासाठी ते प्रोत्साहित करीत होते.
इ.स. १९६० मध्ये या सर्वाची परिणिती म्हणून त्यांच्या घराची झडती घेणे, निवासाच्या ठिकाणी पहारा ठेवणे, जबानीसाठी पुन्हा पुन्हा पोलीस चौकीवर नेणे, त्याचबरोबर काही अराष्ट्रीय वृत्तीच्या नागरिकांनी त्यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारी यामुळे तत्कालिन पोर्तुगीज गव्हर्नर जनरलांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर स्वा.सै. कै. पुुरुषोत्तम काकोडकर यांच्याबरोबर नवी दिल्लीस जाऊन गोवा, दमण व दीव या पोर्तुगीज साम्राज्यशाहीच्या अखत्यारीतील प्रदेशाला ‘प्रादेशिक स्वायत्तता’ द्यावी यासाठी होणारी मागणी व गोव्यातील राजकीय वातावरण व परिस्थिती याची भारताचे पंतप्रधान कै. पंडित जवाहरलाल यांना देऊन त्यावर योग्य तो मार्ग शोधून काढण्यासंबंधी चर्चा करण्याची परवानगी दिली. स्वा.सै. पुरुषोत्तम काकोडकर व स्वा.सै. ऍड. पांडुरंग मुळगावकर यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची भेट घेऊन भारत सरकारने गोमंतकीय नागरिकांवर जी बंधने घातली होती त्यावर चर्चा केली आणि भारत सरकारकडून यातील थोडी बंधने शिथिल केली होती.
१९ डिसेंबर १९६१ रोजी पोर्तुगिजांच्या हुकूमशाही राजवटीतून भारतीय लष्कराने गोवा मुक्त केल्यावर पणजी येथे जानेवारी १९६२ मध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या पहिल्या बैठकीत नॅशनल कॉंग्रेस- गोवाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. मे १९६२ ते १९६३ पर्यंत ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या गोवा, दमण व दीव प्रदेशासाठी स्थापन झालेल्या अस्थायी समितीचे कोशाध्यक्ष होते.
केंद्र सरकारने गोवा मुक्तिसंग्रामातील त्यांच्या योगदानाच्या सन्मानार्थ त्यांना ताम्रपट प्रदान केले होते. १८ जून १९८३ रोजी गोवा, दमण व दीव संघप्रदेश प्रशासनानेही त्यांचा सन्मान केला होता. पणजी येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमातही त्यांचा सत्कार झाला होता.
स्वा.सै. कै. पुरुषोत्तम काकोडकर, कै. पीटर आल्वारिस, कै. गोपाळ आपा कामत, कै. डॉ. पुंडलिक गायतोंडे, कै. माधव बीर, कै. शंकर सरदेसाई व इतर स्वातंत्र्यसैनिक गोवा मुक्तिसंग्रमात त्यांचे सहकारी होते. ते वकिली व्यवसायात होते. त्यांची मुलेही वकिली व्यवसायात आहेत. येता १० ऑक्टोबर २०१७ हा त्यांचा जन्मशताब्दी दिवस आहे.
स्वा. सै. कै. ऍड. पांडुरंग मुळगावकर यांना मी बालपणी पाहिले आहे. अनेकदा न्यायालयातून घरी जाताना ते आमच्या श्री मारुती देवळाजवळील वडिलांच्या दुकानासमोरून खोर्ली-सीमेवरील आपल्या घरी जाताना दिसायचे. यावेळी ते काळ्या रंगाच्या सुटा-बुटात असायचे. शिवाय बालपणी म्हापसा- खोर्ली सीम येथील श्री देव राष्ट्रोळी मंदिराजवळील कै. विनायक कवळेकर यांच्या बंगल्यावर आम्ही खेळायला जात असू. त्यांची मुले आमची शालेय मित्रमंडळी असल्यामुळे आणि त्यांच्या प्रशस्त बंगल्याच्या अवती-भोवती व टेर्रेसवर खेळायला भरपूर जागा उपलब्ध असल्यामुळे शाळा सुटल्यावर व रविवारच्या दिवशी त्यांच्या बंगल्यावर जाणे आमचे नित्याचेच झाले होते. त्यांच्या बंगल्याच्या उत्तर दिशेकडून जाणार्‍या रस्त्याच्या पल्ल्याड असलेल्या एका जुन्या वळणाच्या माडीच्या प्रशस्त घरात ते वास्तव्याला होते. खेळायला गेलो असता कै. विनायक कवळेकर यांच्या टेर्रेसवरून त्यांच्या घराकडे नजर टाकली की अधूनमधून त्यांचे दर्शन व्हायचे. त्यानंतर मी शिक्षकी पेशाबरोबरच राजकारणातही सक्रिय झालो. विविध कारणांमुळे अनेकदा त्यांची भेट घेणे व्हायचे. सडपातळ देहयष्टी, गोरा रंग, हसरा चेहरा, धारदार नाक, बोलके डोळे, डोळ्यांना चष्मा, लांड्या हाताचा बुशसर्ट व पँट असा पेहराव.
गोवा मुक्तीनंतर ९ डिसेंबर १९६३ रोजी गोवा, दमण व दीव या संघप्रदेशाच्या विधानसभेसाठी जी पहिली निवडणूक झाली त्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे पाळी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत राष्ट्रीय कॉंग्रेसचं पूर्ण पानिपत झालं होतं. मराठी भाषा व गोव्याचे महाराष्ट्रातील विलिनीकरण या मुद्दांवर ही निवडणूक लढवणार्‍या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने बाजी मारली होती. या निवडणुकीत पाळी मतदारसंघातून म. गो. पक्षाचे श्री. अच्युत उसगावकर ५४२६ मते मिळवून निवडून आले होते. स्वा.सै. कै. ऍड. पांडुरंग मुळगावकर यांना १४०० मते मिळाली होती. यु. गो. पक्षाचे कै. सित्रिआनो डिसौझा यांना ७२१ मते तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेले स्वा.सै. कै. शिवाजी देसाई यांना ७० मते प्राप्त झाली होती.
दरम्यान, केंद्र सरकारने १६ जानेवारी १९६७ रोजी ‘संघप्रदेश म्हणून स्वतंत्र अस्तित्व ठेवायचं की गोव्याचं महाराष्ट्रात विलिनीकरण करायचं’ या मुद्यावर जनमत कौल घेतला. स्वा.सै. कै. ऍड. पांडुरंग मुळगावकर हे गोव्याच्या विलिनीकरणाच्या विरोधात आणि संघप्रदेश म्हणून स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याच्या बाजूने प्रचारात उतरले होते. गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व राखण्याचा कौल जनतेने दिला.
त्यानंतर २८ मार्च १९६७ रोजी झालेल्या गोवा, दमण व दीव या संघप्रदेशाच्या दुसर्‍या निवडणुकीतही कै. ऍड. पांडुरंग मुळगावकर यांनी पणजी मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. कारण, या निवडणुकीत राष्ट्रीय कॉंग्रेस सहभागी झाली नव्हती. या निवडणुकीतही त्यांना कै. यशवंत देसाई (युनायटेड गोवन्स- सिक्वेरा गट) यांच्याकडून पराभूत व्हावे लागले होते. कै. देसाई यांना ३८४६ तर कै. ऍड. मुळगावकर यांना १०५१ मते प्राप्त झाली होती, तर म. गो. उमेदवाराला ३७७६ मते मिळाली होती. या पराभवानंतर ते राजकीय अज्ञातवासात गेल्यासारखेच होते. उच्चशिक्षित असूनही राजकीय सत्तेने त्यांच्याकडे पाठ फिरवली होती.
ऍड. जयंत मुळगावकर या त्यांच्या सुपुत्राने आपल्या वडिलांबद्दल लिहिताना एका स्मरणलेखात ऍड. पांडुरंग मुळगावकर यांचे मुक्तिलढ्यातील एक सहकारी व गोवा, दमण व दीव विधानसभेचे माजी सभापती ऍड. गोपाळ आपा कामत यांचे आपल्या वडिलांबद्दलचे मत उद्यृक्त केले आहे. कै. ऍड. गोपाळ कामत यांनी कै. ऍड. मुळगावकरांबद्दल लिहिले आहे की, ‘कर्तव्याला ते कधी चुकणार नाहीत. मैत्रीला कधी ते विसरणार नाहीत. दुसर्‍याला कधी ते दुखावणार नाहीत. त्यांना जे वाटेल ते ते बोलून दाखवतील. परंतु होता होईतो गोड शब्दांनी मनाचा सरळपणा व वर्तनातील प्रामाणिकपणा हे गुण राजकारणात इतकी वर्षे असूनही टिकून आहेत! त्यांचा स्वभाव मानी आहे. स्वाभिमानी आहे. बाणा करारी आहे. वृत्तीत कणखरपणा आहे. गोड स्वभाव, हसरा चेहरा व सहानुभूतीचा ओलावा यामुळे त्यांनी अनेक मित्र मिळवले आहेत व फितविले आहेत.’
कै. ऍड. गोपाळ कामत यांनी कै. ऍड. पांडुरंग मुळगावकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे केलेले हे वर्णन सार्थ नाही असे या दोघांनाही ओळखणारे कोणी म्हणणार नाहीत. ऍड. जयंत मुळगावकर म्हणतात की, त्यांच्या वडिलांचा राष्ट्रवाद आणि राजकारण महात्मा गांधी आणि पं. जवाहरलाल नेहरू यांच्या मार्गाने जाणारे होते. पंडित जवाहरलाल नेहरूंचा लोकशाही मार्गाने जाण्याचा आग्रह, त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन व सर्वसमावेशक आणि संप्रदाय निरपेक्ष राष्ट्रबांधणी करण्याचे स्वप्न याकडे त्यांचे वडील बांधिल राहिले होते. त्यांनी सांगितलेली आणखी एक आठवण म्हणजे कै. ऍड. पांडुरंग मुळगावकर यांनी वर्षभर गुरुनाथ केळेकरांबरोबर शणै गोंयबाबांच्या साहित्यातील शब्दांचा संग्रह करण्याचे कार्य तर केलेच, शिवाय स्वा. सै. जेम्स फर्नांडिस यांना फ्रेंच भाषा शिकवली, फेलिसियो कार्दोज यांची देवनागरी लिपीशी ओळख करून लिली. सुरेश काणेकरांकडून ते इंग्रजी भाषा शिकले होते.