सारझोरा स्पोर्ट्‌स क्लबला अझुम्टा चषक

0
129

यजमान सारझोरा स्पोर्ट्‌स क्लबने अंतिम सामन्यात दिकरपाली स्पोर्ट्‌स क्लबचा टायब्रेकरवर ५-४ अशा गोलफरकाने पराभव करीत अझुम्टा चषक फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले.

सारझोराच्या साग मैदानावर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात पूर्ण वेळेत दोन्ही संघ गोलशून्य बरोबरीत राहिले होते. त्यामुळे रेफ्रीने निकालासाठी टायब्रेकरचा अवलंब केला. त्यात विजेत्या ठरलेल्या सारझोरा स्पोर्ट्‌स क्लबकडून जॉयरन फर्नांडिस, मेरिलो फेर्राव, मायरन कॉस्ता, सेल्विन फर्नांडिस व चादेल फर्नांडिस यांनी गोल नोंदविले. तर पराभूत दिकरपाली स्पोर्ट्‌स क्लबच्या जॉयल कुलासो, मॅक बॉर्जीस, स्टँडली मिरांडा आणि लेझर रायकर यांनाच प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला चकविता आले.
विजेत्या सारझोरा स्पोर्ट्‌स क्लबला रु. ४०,००० व चषक तर उपविजेत्या दिकरपाली स्पोर्ट्‌स क्लबला रु. ३०,००० व चषक प्राप्त झाला. प्रमुख पाहुणे फा. ओझवाल्ड डिसोझा यांच्याहस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.

वैयक्तिक बक्षिसे पुढील प्रमाणे ः अंतिम सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू – सनी फर्नांडिस (सारझोरा स्पोर्ट्‌स क्लब), उत्कृष्ट बचावपटू – सेल्लिन फर्नांडिस (सारझोरा स्पोर्ट्‌स क्लब), उत्कृष्ट गोलरक्षक – सनी फर्नांडिस (सारझोरा स्पोर्ट्‌स क्लब), उत्कृष्ट मध्यरक्षक – जॉयल कुलासो (दिकरपाली स्पोर्ट्‌स क्लब), उत्कृष्ट शिस्तबद्ध संघ – पॅरिश यूथ नुवे, स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडू – स्टॅलोन फर्नांडिस (सेंट सेबॅस्तियान युनियन बाणावली).