सायना, सिंधू, श्रीकांत, प्रणॉय एकेरीच्या उपांत्य फेरीत

0
132

>> बॅडमिंटनमध्ये भारताचे वर्चस्व कायम

२१व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन चमूने आपले वर्चस्व कायम राखण्यात यश मिळविले. फुलराणी सायना नेहवाल, स्टार महिला शटलर पी. व्ही. सिंधू, जागतिक अग्रमानांकित खेळाडू किदम्बी श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉय यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत महिला व पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
काल खेळविण्यात आलेल्या महिला एकेरीच्या लढतीत सायनाने कॅनडाच्या राशेल होंडिरिचवर मात केली. सायनाने राशेलचे आव्हान २१-८, २१-१३ असे संपुष्टात आणत अंतिम चार खेळाडूंत स्थान मिळविले. तर रियो ऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्या सिंधूनेही आपली विजयी घोडदोड कायम राखताना कॅनडाच्याच ब्रिटनी टॅमला सरळ गेममध्ये पराभूत केले. सिंधूने ही लढत २१-१४ व २१-१७ अशी जिंकत जेतेपदासाठी सायनाबरोबरच आपणही प्रबळ दावेदार असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, पुरुषांच्या एकेती नुकताच जागतिक नंबर १ शटरल बनलेल्या किदम्बी श्रीकांतने आपला धडाका कायम राखताना सिंगापुरच्या रियाने एनजी जिनवर मात केली. श्रीकांतने रियानवर २१-५, २१-१२ अशी सहज मात केली. तर भारतचा अन्य एक शटलर एच. एस. प्रणॉयनेही अंतिम चार खेळाडूंत स्थान मिळविताना श्रीलंकेच्या दिनुका करुणारत्नावर मात केली. प्रणॉयने ही लढत २१-१३ व २१-६ अशी जिंकली.

पुरुष दुहेरीत सात्विक रंकी रेड्डी आणि चिराग चंद्रशेखर शेट्टी यांनी उपांत्य फेरी गाठली. काल झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत त्यांनी मलेशियाच्या पेंग सून चॅन आणि सून हुआट गोह यांना २१-१४, १५-१२ व २१-९ असे पराभूत केले.
मिश्र दुहेरीत भारताच्या सात्विक रंकी रेड्डी आणि आश्विनी पोनप्पा यांनी मलेशियाच्या सून हुआट गोह व शेवोन जेमी लाइ यांच्यावर संघर्षपूर्ण लढतीत २१-१९, २१-९ अशी मात करीत अंतिम चारात स्थान मिळविले. मात्र प्रणव चोप्रा व एन. सिक्की रेड्डी यांना मलेशियाच्या पेंग सून चॅन आणि लिउ यिंग गोह यांच्याकडून १७-२१, १२-२१ असा पराभव स्वीकारावा लागला.