सायकल

0
691

– संदीप मणेरीकर

ग्रामीण भागात सायकल ही एकेकाळी महाराणीच्या अवतारात वागत होती. तिचा तोरा काय होता, तिचे रूप, सौंदर्य, तिचा दिमाख, थाटमाट काय सांगणार? खरंच ती जणू काही इंग्लंडची महाराणीच होती. रस्त्यावरून चालत जात असताना जर कोणी सायकलस्वार त्यावेळी रस्त्यानं जात असेल तर त्याचा तोरा काही औरच होता. चालत जाणारी व्यक्ती म्हणजे अगदीच सामान्य आणि आपण म्हणजे साक्षात देवाधिदेव इंद्रच जणू असला काही तिचा थाट असायचा. चाकं दोन आणि घंटा, समोरच्या चाकावर असलेली दांडी, तिच्यावर असलेली सीट, पाठीमागे असलेला कॅरियर, व्वा! असा थाट जणू काही नऊवारी साडी नेसून आमच्या गावाला जेव्हा मातीचा रस्ता होता तेव्हा या रस्त्याने शाळेतून घरी चालत जाताना आम्हांला त्या धुळीतून रस्त्यावर उमटलेले सायकलच्या टायरांचे माग दिसायचे. त्यावरून आम्ही केवळ परीक्षा करत असू की, या रस्त्यावरून कोणाची सायकल गेलेली आहे याची. बर्‍याचवेळा ती चुकलेली असायची. पण असे अंदाज व्यक्त करता करता केव्हा रस्ता संपायचा आणि आम्ही घरी पोहोचायचो तेच कळत नव्हतं. शाळेतून घरी जात असताना अशा आमच्या वर्गातील, शाळेतील कितीतरी मुलांच्या सायकली असायच्या. ते गरगरत सायकली न्यायचे. पण मला कधीच त्यांनी आपल्या सायकलवरून बसवून नेलं नाही, किंवा मलाही कधी त्यांनी आपल्यासोबत सायकलवर बसवून न्यावं असं वाटलं नाही. चालत जाण्याची मौज काही औरच होती. 

रस्त्यानं चालत जात असताना कितीतरी गंमती जमती त्यावेळी घडत होत्या. झाडांबरोबर, पक्षांसोबत बोलत नाही पण त्यांच्या हालचाली टिपत जाता येत होतं. ती मजा सायकलवरून जाण्यात नव्हती, पण तरीही माझ्या हातात सायकल आली तेव्हा मात्र मला सायकलचं सुख काय असतं हे समजून आलं व आजही ते सुख तसंच कायम आहे, असं मला अजूनही वाटतं. माझा मोठा भाऊ, आम्ही त्याला भाई म्हणतो, त्याला दादांनी एक सायकल आणून दिली. तिचा रंग निळा होता. ती तशी लेडिज सायकल होती. तिला पुढची दांडी नव्हती. भाई सायकल चालवायला कधी शिकला हे मला माहीत नाही, किंवा मला आठवत नाही. पण तो सायकल घेऊन घोटगेवाडी येथील शाळेत जात होता. त्यावेळी आम्ही आमच्या गावच्याच मोर्लेबागच्या शाळेत जात होतो. त्यामुळे आम्हांलाही सायकलमधील काही गती नव्हती. कौतुक नव्हतं. पण भाई सायकल घेऊन शाळेत जातो एवढंच आम्हांला माहीत होतं.
माझ्या आरोग्याच्या काही तक्रारी होत्या त्यामुळे मला सायकल चालवायची नाही असा डॉक्टरांचा मला सक्त आदेश होता. त्यामुळे नववीत जाईपर्यंत कधी सायकल हातात घेतली नव्हती. नववीत आरोग्य बरं नाही, असं सांगून मी बर्‍याचवेळा घरी असायचो. मात्र या वेळेत मी सायकल शिकून घेतली. शाळा चुकवून सायकल शिकणे हा त्याकाळात मोठा पराक्रम होता. कारण ज्या रस्त्यावर मी सायकल शिकत होतो, त्याच रस्त्याने माझ्या वर्गातील मुलं, किंवा अन्य वर्गातील मुलं ये-जा करायची. मी बहुधा संध्याकाळच्या वेळी सायकल शिकायचो, पण त्याचवेळी मुलं घरी यायचीही वेळ असायची. अशा वेळी समोरून मुलं येताना दिसली की माझी काय तारांबळ उडायची, मी जमेल त्या वेगाने सायकल पळवत झाडाआड लपायचो. कारण हेच माझ्या वर्गातील विद्यार्थी उद्या शाळेत गेल्यावर, ‘काल संदीप शाळेत येवक नाय पण तो सायकलीर बसान फिरा होतो सर’ अशी कोणी चुगलीही करू शकत होता, म्हणून भीती होती. त्याचप्रमाणे मी खरं तर माझी तब्येत बरी नाही असं सांगून घरी रहात होतो, आणि सायकल शिकत होतो, त्यावर बंदी येण्याची शक्यता होती, ही मोठी भीती होती. खरं तर मला सकाळीच बरं नाही असं व्हायचं, आणि त्यामुळे मी शाळेत जायचं टाळायचो, आई आणि दादाही मग, असो नाही तर नको जाऊदे शाळेत, असं म्हणून माझी पाठराखण करायचे. मी त्यावेळी तब्येतीनेही नाजूक असल्यामुळे माझ्यावर शाळेत जाण्यासाठी जबरदस्ती कोणी जास्त करत नव्हते. पण त्यानंतर मी दहावीत गेल्यावर मात्र मी बहुतेक नियमित शाळेत जाऊ लागलो. मलाही त्यावेेळी जरा गंभीर (कधी नव्हे तो) व्हायची वेळ आलेली. त्यावेळी मी माझं अभ्यासाचं टाईमटेबल तयार केलं होती. (जे कधीच पाळलं नाही) मात्र मी सायकल शिकलो. तीसुद्धा मागे कॅरियरवर बसून मी चालवत होतो. सायकल लहान असल्यामुळे माझे पाय सहजच जमिनीला टेकत होते. त्यामुळे त्यावेळी सायकल चालवण्यात काही फारसा त्रास झाला नाही. मात्र सीटवरून सायकल चालवायला मी शिकलो पण मला तशी चालवली अशी कधी वाटली नाही. कारण पडलो तर सीटवरून पाय पोहोचत नव्हते. मी सीटवर डायरेक्ट बसूनच सायकल शिकल्यामुळे पडायचे झाल्यास मी तसाच डायरेक्ट पडणार होतो, याचीही भीती मला होती. मी पायडलवरून सायकल कधी शिकायचा प्रयत्न केला नाही, कारण तसं शिकतानाही पडण्याची भीती वाटायची. मी कोणाला मला सायकल शिकवा म्हणूनही सांगण्याचा प्रयत्न केला नाही. कारण दादा तर म्हणायचे की, पडल्यानंतरच सायकल शिकायला येते.
एकदा तर सायकल शिकत असताना रस्त्यावरून जात असताना संध्याकाळच्या वेळी शाळा सुटल्याने आमच्या वर्गातील काही विद्यार्थी रस्त्याने येताना मला दिसले. त्यामुळे त्यांनी मी दिसता नये म्हणून जोरात सायकल चालवू लागलो. मी नेहमीप्रमाणे कॅरियर बसून सायकल चालवत होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लहान लहान रानमोडी (गोव्यात त्याला बहुतेक कॉंग्रेस असं म्हणतात) झाडं होती. गच्च लहान लहान झुडपांनी काहीच दिसत नव्हतं अशी ती झाडं वाढलेली होती. मी सायकल चालवत असताना मागे पहात होतो की ती माझ्या वर्गातील मुलं कुठे पोहोचलीत म्हणून आणि त्याचवेळी सायकलचा जो तोल गेला व मी त्या रानमोडीच्या जंगलात पडलो. आता अशी वेळ होती की तिथे कसल्याही प्रकारचं जनावर असू शकेल. त्यामुळे तेथून वाट काढायला हवी होती, पण तिथून बाहेर पडणार तर रस्त्यावर मोठं संकट होतं. ती मुलं गेल्याशिवाय मी बाहेर येऊ शकत नव्हतो आणि इकडे सरपटणार्‍या प्राण्यांची भीती होती, त्यात अंधार पडत चालला होता. बरं मुलं येतानाही गटागटाने येत होती. एक गट गेला की दुसरा गट येत होता. आणि प्रत्येक गटात एक-दोन मुलं तरी माझ्या वर्गात शिकणारी होती. त्यामुळे मला सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही या वाक्याचा त्यावेळी प्रत्यय आला. शेवटी मी तिथेच सायकलीसह थांबण्याचा निर्णय घेतला व मुलं रस्त्यानं दिसायची बंद होईपर्यंत तिथेच जीव मुठीत घेऊन बसून राहिलो होतो.
मी अगदी हल्लीपर्यंत म्हणजे पाच सहा वर्षांपर्यंत सायकल चालवत होतो. मी एकदा भेडशीला गेलेलो. तिथून घरी येताना घोटगेवाडी येथे कालवा आहे. पावसाळ्याचे दिवस होेते. कालव्यात पाणी नव्हतं. पण पावसाचं साचलेलं घाण पाणी, चिखल होता. कडेने वाट होती. त्या वाटेने येत असताना मी एका लाइटच्या पोलला आधार द्यायला खाली ओढलेली जी मोठी वायर असते तिला सायकलचा पायडल अडकला व मी खाली कालव्यात सायकलीसह पडलो. सगळा चिखलाने माखून गेलो. आधी मी वर आलो. वर येऊन पाहिलं तर जरा जरा त्या चिखलात सायकल दिसत होती. कोणी आपल्याला पाहिलेलं नाही असं झाल्यामुळे जरा बरं वाटलं आणि पटकन कशीतरी सायकल वर काढली. त्यानंतर घरी आलो. कपडे चिखलानं माखलेले होते. मी फक्त घरी मी पडलो एवढंच सांगितलं. नंतर मला कळलं की, त्या दिवशी गटारी अमावास्या होती. मी साजरी केलेली आजपर्यंतची ही पहिलीच व शेवटची गटारी अमावास्या होती.
सायकलमध्ये हवा भरण्यासाठी लागणारा पंप त्यावळी सर्वांकडेच नव्हता. अनेक जणांच्या सायकली होत्या पण पंप मात्र कोणाचकडे नव्हता, अशीही अवस्था होती.बर्‍याचवेळा सायकल पंक्चर व्हायची त्यावेळी पंक्चर काढण्याचं एक मोठं काम असायचं. त्यावेळी मनाची अवस्था अत्यंत नाजूक व्हायची. अत्यंत वैताग यायचा, ऐन दुपारच्या वेळी जर सायकल पंक्चर झालेली असेल तर त्यावेळी नको ते हाल अशीच अवस्था व्हायची. कारण पंक्चर काढणारा त्यावेळी जेवणासाठी गेलेला असायचा. त्यामुळे एकतर ते येईपर्यंत थांबणे किंवा तशीच पंक्चर झालेली सायकल घेऊन घरी निघून जाणे किंवा सायकल तिथे टाकून त्याच्या घराकडून डोक्यावर उन्हे घेत घरी चालत येणे. या तिन्हीपैकी जी गोष्ट सोपी वाटेल ती करणे एवढेच आपल्या हातात असायचे. मात्र कोणतीही गोष्ट केली तरी त्याचा त्रास हा ठरलेला असायचा. काहीजणांच्या सायकललीला दोन बाजूला दोन घंटा असायच्या. सायकलच्या टायरना आत सुंदर प्लास्टीकचा ब्रश असायचा. सायकलवरून पाहिजे तेवढे सामान समोरच्या हँडलला आणि कॅरियरला लावून आणता येत होतं. काही सायकलींना समोरच्या हँडलला दिव्याची सोय होती. त्याला डायनामो म्हणत. अशी सोय असलेला सायकलवाला हा आम्हांला मोठा वाटायचा. पण सायकलचा वेग कमी झाला की प्रकाशही कमी होत होता. त्याला पाठीमागच्या टायरला लावण्यासाठी एक काहीतरी यंत्र असायचं. ते आपल्याला हवं तेव्हा ढकलून टायरला चिकटवलं की टायरच्या घर्षणानं समोरचा दिवा पेटायचा. त्यामुळे जर वेग कमी असेल तर प्रकाश कमी पडायचा. आमच्याकडे दादांची एक हिरोची सायकल होती. त्या सायकलला माझ्या काकांनी एक सेलचा खोका समोरच्या दांडीच्या खाली बसवून त्याला एका बटणाची सोय केलेली होती. समोर हँडलच्या खाली एक बल्ब लावलेला होता. अंधार पडला की ते बटण चालू करायचं. मग बल्ब पेटायचा आणि मोटा उजेड पडायचा. आज मात्र सायकली गायब झालेल्या आहेत. प्रत्येकाच्या दारात एकेकाळी दिमाखात उभ्या असणार्‍या सायकलींची जागा आज टू व्हीलरनी घेतलेली आहे. त्यामुळे साहजिकच या टूव्हीलरमुळे प्रदूषण आलेलं आहे. आज गरज नसतानाही प्रत्येकाकडे दोन, तीन दुचाक्या दिसतात. त्यामुळे प्रदूषणातही वाढ झालेली आहे. सायकलीमुळे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नव्हतं. सायकल चालवल्यामुळे आपसूकच व्यायाम व्हायचा. रमत गमत जाता येत होतं. निसर्गाची गंमत जंमत पहात फिरत जाता येत होतं. आज प्रत्येकाला वेगाची नशा चढलेली आहे. वेळ अपुरा पडत आहे. वेगाने वाहने हाकून पाहिजे तिथे सायकलपेक्षा अधिक वेगाने जाता येत असूनही वेळ अपुराच पडत आहे. त्यात काही अपवाद वगळता या दुचाकींवर सामान ठेवण्याची सोय नाही. अगदी दुधाची पिशवी जरी आणायची झाली तरीही ती कशी आणायची याची चिंता चालकाला असते.
ग्रामीण व शहरी भागाची शान असलेल्या या सायकलचा दिमाख आज वाढत्या विकासामुळे आणि आधुनिकीकरणामुळे कमी होत होत नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. एकेकाळी पुण्याची ओळख सायकलींचे शहर म्हणून प्रसिद्ध होते. मात्र आज त्याच पुण्यात या सायकली अत्यल्प झालेल्या असून केवळ सायकलींसाठी मार्ग असे केवळ फलक दिसून येत आहेत. आज माझ्या गावात डांबराचे रस्ते झालेले आहेत. त्यामुळे सायकली जुनाट झाल्या व त्यांची जागा टू व्हीलरनी घेतली. मातीच्या रस्त्यावरून सायकल चालवताना त्रास होत होता तरी मन रमत होतं. आज डांबरी रस्त्याने दुचाक्या उडवतानाही केवळ उडवणेच आहे, त्यात रंजन वा रमणे हा प्रकार नाही.
…………