सानेगुरुजींची खडतर जीवनसाधना

0
308
  • डॉ. सोमनाथ कोमरपंत

ही त्यांची व्यापक दृष्टी कुठे आणि आत्मकोशात गुरफटून राहण्याची आजची दृष्टी कुठे? अंतःकरणाची कवाडे सदैव खुली ठेवणार्‍या साने गुरुजींचे स्मरण म्हणूनच प्रेरणादायी वाटते. त्यांनी आपल्या जीवनदृष्टीने आसमंत शुचिष्मंत केला.

 

भारतीय प्रबोधनयुगातील खडतर कालखंडात तेजस्वी स्त्री-पुरुषांंची मालिका आढळते, त्यांत साने गुरुजींची गणना अग्रक्रमाने केली जाते. महाराष्ट्राच्या ज्ञानपरंपरेतील थोर प्रज्ञावंतांमध्ये समाजमनस्क आणि समर्पणशील वृत्तीचे शिक्षक म्हणून ते ओळखले जातात. चार भिंतींच्या आड असलेले त्यांचे ज्ञानक्षेत्र नव्हते. अभावग्रस्त स्थिती सर्वत्र होती. मनात होती ती अदम्य आकांक्षा, अखंडित टिकवलेली इच्छाशक्ती आणि उत्तुंग ध्येयवादी वृत्ती. या त्रयीच्या बळावर सानेगुरुजींनी संपूर्ण समाज हीच एक प्रयोगशाळा बनविली. रचनात्मक कार्यशक्तीचा आदर्श निर्माण केला. ‘धडपडणारी मुले’ हे पुस्तक लिहून ते थांबले नाहीत. वरून मृदू भासणार्‍या पण अंतर्यामी वज्रनिर्धार असलेल्या या तपस्वी महापुरुषाने स्वातंत्र्यपूर्व कालखंडात धडपडणार्‍या मुलांची फळी निर्माण केली. त्यामुळे खर्‍या अर्थाने ते सार्‍या समाजाचे शिक्षक झाले. सात्त्विकता हा साने गुरुजींचा मनोधर्म होता. त्यांचे हृदय आईचे होते. समाजातील दुबळ्या लोकांविषयी त्यांच्या मनात करुणा होती. स्वातंत्र्य हे जीवनमूल्य त्यांनी प्राणांपलीकडे जपले. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्यासाठी त्यांनी अहर्निश यज्ञ मांडला. प्रखर बुद्धिमत्ता आणि उत्कट भावनाशीलता ही त्यांच्या मनःसृष्टीची मोहक रूपे. साने गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वाचे सारे गुणविशेष त्यांच्या वाङ्‌मयात एकवटलेले आहेत. त्यामुळे त्यांची भाषाशैली लाखात एक अशा स्वरूपाची आहे. तिचे अनन्यसाधारणत्व शब्दांत नाही; तिची महत्ता या परमकारुणिकाच्या ओथंबलेपणात आहे. साने गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वावर आणि संस्कारशील पिढी घडविणार्‍या त्यांच्या वाङ्‌मयावर दुबळेपणाचा आरोप करून सहजतेने मोकळे होता येते, पण प्रतिकूल काळाच्या मुशीत घडलेल्या या व्यक्तिमत्त्वाने सृजनशीलतेचे जे शुभंकर पर्व निर्माण केले आणि त्यानंतरच्या पिढ्यांना नवसर्जनाची जी प्रेरणा दिली तो कालखंड आपल्याला सखोलतेने अभ्यासावा लागेल. तेव्हाची भुई नांगरल्याविण राहिली होती. स्वत्वाचा आणि सत्त्वाचा विसर सर्वांना पडला होता. समष्टी ही संकल्पना दृढपणे जनमानसात रूढ झाली नव्हती. अशा वेळी बुद्धीला आवाहन करण्यापेक्षा हृदय हलविणे हे महत्त्वाचे कार्य होते. ते नेमके साने गुरुजींनी केले. साने गुरुजींनी केलेले लेखन हे पांडित्याचे प्रकटन नव्हते; मराठी मनाशी केलेला तो हृदयसंवाद होता.

साने गुुरुजी आपल्यातून जाऊन आज सत्तर वर्षे लोटली, पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा समाजमानसावरील प्रभाव तिळमात्र कमी झालेला नाही. त्यातील कितीतरी पैलू आजही आपल्याला आल्हाददायी वाटतात. निष्ठावंत शिक्षक, सृजनशील साहित्यिक, कवी, स्वातंत्र्यसेनानी, लोकसाहित्याचे अभ्यासक, कृतिशील विचारवंत, समर्पणशील वृत्तीचे समाजसेवक आणि ‘साधना’ साप्ताहिकाचे यशस्वी संपादक या त्यांच्या तेजस्वी रूपकळा. पण या समृद्ध गुणांच्या समुच्चयातून साकार झालेली महामानवाची मुद्रा तेवढ्याच तोलामोलाची. मराठीच्या वाङ्‌मयक्षेत्रात विशुद्ध सात्त्विकतेचा आणि ऋजुतेचा नंदादीप त्यांनी तेवत ठेवला. त्या स्निग्धतेचा ओलावा प्रेरणादायी स्वरूपाचा आहे.

गरीब कुटुंबात जन्मलेल्या साने गुरुजींना खडतर परिस्थितीवर मात करून विद्यार्जन करावे लागले. दारिद्य्राशी तोंड देत त्यांनी एम.ए.ची पदवी संपादन केली. पैशाचे प्रलोभन न बाळगता शिक्षकी पेशाचा त्यांनी स्वीकार केला. ध्येयवादी वृत्तीने अध्यापनाचे कार्य केले. लहान मुलांचे विश्‍व हे त्यांनी आपले आनंदविश्‍व मानले. त्यांना गोष्टी सांगणे, गोष्ट लिहिणे, गोष्टींमधून देशभक्तीचे, सेवाभावी वृत्तीचे संस्कार करणे यात त्यांनी आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता मानली.

करी मनोरंजन जो मुलांचें|

जडेल नातें, प्रभुशीं तयाचें॥

हे त्यांचे जीवनसूत्र होते. बालपण संघर्षात आणि तारुण्यही संघर्षात. पण साने गुरुजींनी कोणत्याही प्रकारच्या कटुतेचा लवलेश आपल्या मनाला लागू दिला नाही. ‘पद्मपत्रमिव अम्भसा’ असे त्यांचे निर्मळ जीवन होते. जीवनाच्या सर्वांगांवर ते प्रेम करणारे होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व एकांगी नव्हते. रसिकतेने ते ओथंबलेले होते. ‘भारतीय संस्कृती’ हे पुस्तक वाचताना, सुधास लिहिलेली ‘सुंदर पत्रे’ वाचताना हे प्रत्ययास येते. जेवढे जीवनावर त्यांनी प्रेम केले तेवढे मृत्यूवरही. त्यामुळे श्रीहरीच्या चरणी आपले जीवन होमून टाकताना लौकिक मोहपाश या मनाला थोपवू शकले नाहीत.

साने गुरुजींची स्वदेशनिष्ठा ही अधोरेखित करण्यासारखी बाब. महात्मा गांधींनी सुरू केलेल्या सत्याग्रहाच्या चळवळीत त्यांनी निष्ठापूर्वक आणि सातत्याने भाग घेतला. ‘देशभक्ता प्रासाद बंदिशाला’ हे कवितेतील अवतरण साने गुरुजींच्या जीवनयात्रेला अक्षरशः लागू पडणारे. त्यांचा ऐन तारुण्यातील बहर तुरुंगवासात गेला. धुळ्याच्या तुरुंगातून नाशिकच्या तुरुंगात, पुन्हा धुळ्याला, एरंडवण्याला, त्रिचनापल्ली अशी भ्रमंती या स्वातंत्र्यसमरातील निष्ठावंत सेनानीला करावी लागली. या कष्टप्रद दिवसांत गांधीजी आणि विनोबाजी ही उपास्य दैवते मानून साने गुरुजींनी तुरुंगाचे मंदिर बनवले. त्यांच्या दृष्टीने ते ज्ञानसाधनेचे केंद्र बनले. येथून त्यांनी निसर्गाशी संवाद साधला. लेखनाद्वारे जनमानसाशी संवाद साधला.

तुरुंगवासात साने गुरुजींनी शुद्ध, सात्त्विक आणि लखलखीत स्वरूपाची वाङ्‌मयनिर्मिती केली. भारतीय संस्कृतीचे ते निस्सीम उपासक होतेच. ‘भारतीय संस्कृती’ या पुस्तकातून त्यांनी हे सिद्ध केलेच आहे. पांडित्य प्रकट न करता त्यांना भारतीय परंपरेतील नवनवीन द्यावेसे वाटले. भारतीयांच्या मौखिक झर्‍याचे महत्त्व ते जाणून होते. आई हा त्यांचा प्रेरणास्रोत होता म्हणून त्यांची ‘श्यामची आई’ ही सर्वांची आणि सार्वकालीन आई झाली. संवेदनशीलतेत बदल झालेला असूनदेखील… विश्‍वसाहित्यातील जे उत्तम आहे तेदेखील साने गुरुजींना मातृभाषेत आणावेसे वाटले. यात त्यांची विशाल जीवनदृष्टी प्रकट होते. टॉलस्टॉय, व्हिक्टर ह्युगो, रास्किन, तिरुकुरल्ल, श्रीअरविंद, स्वामी विवेकानंद, रामतीर्थ आणि वॉल्ट व्हिटमन हे त्यांच्या दृष्टीने विश्‍वाचेच नागरिक होते. ही त्यांची व्यापक दृष्टी कुठे आणि आत्मकोशात गुरफटून राहण्याची आजची दृष्टी कुठे? अंतःकरणाची कवाडे सदैव खुली ठेवणार्‍या साने गुरुजींचे स्मरण म्हणूनच प्रेरणादायी वाटते. त्यांनी आपल्या जीवनदृष्टीने आसमंत शुचिष्मंत केला.

समाजमनस्कता हाही साने गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वपूर्ण पैलू. त्यांनी ज्या समाजाचे स्वप्न बाळगले तो इतरांहून निराळा होता. त्यांनी समाजातील प्रचलित असलेल्या चातुर्वर्ण्याविरुद्ध, जातीयतेविरुद्ध, विषमतेविरुद्ध आणि कर्मठपणाविरुद्ध वाणी आणि लेखणीद्वारा लढा दिला. एकवेळ राजकीय स्वातंत्र्यासाठी परकीय सत्तेविरुद्ध लढणे सोपे; परंतु सामाजिक दोषांपायी स्वसमाजाविरुद्ध उभे राहणे ही कठीण बाब. फुले, आगरकरांना असे शस्त्र उगारावे लागले आहे. प्रकृतीने मवाळ वाटणार्‍या साने गुरुजींनी उपोषण सुरू केले. अत्यंत वंदनीय असलेल्या महात्मा गांधींनी त्यांना आमरण उपोषण मागे घ्यायला लावले. पण साने गुरुजींनी हा सल्ला मुळीच मानला नाही. त्यांना साथसंगत करायला सेनापती बापट येऊन तेथे बसले. तेथील धर्मसत्तेला शेवटी नमावे लागले.

साने गुरुजी सेवाभावी वृत्तीचे होते. लेखणीच्या लालित्यापेक्षा झाडूचे लालित्य त्यांना श्रेष्ठतम वाटले. जीवनातील अमांगल्याविरुद्ध, विरूपतेविरुद्ध त्यांनी लेखणी परजली. परिपूर्णतेचा ध्यास बाळगणारा हा अस्वस्थ आत्मा होता. या अस्वस्थतेची आणि अशांततेची निःश्‍वसिते त्यांच्या लेखनातून दृग्गोचर होतात. हस्तिदंती मनोर्‍यात राहणारा हा प्रज्ञावंत नव्हता. ज्ञानमार्ग जनसामान्यांना खुला व्हावा असे त्यांना प्रांजळपणे वाटत होते. या प्रांजळपणाची आणि पारदर्शित्वाची साक्ष त्यांच्या लेखनातून प्रकट होते.

‘आंतरभारती’च्या संकल्पनेचे आदिबीज साने गुरुजींनी या भूमीत रुजविले. भाषाभगिनींच्या एकात्मतेचे अंतःसूत्र या विचारात सामावले होते. प्रदेशवैशिष्ट्ये विभिन्न असलेल्या पण सांस्कृतिकदृष्ट्या एकात्म असलेल्या भारतीय भूमीचे जीवनस्वप्न साने गुरुजींनी द्रष्टेपणाने रंगविले. ‘बलसागर भारत होवो’ या त्यांच्या कवितेतून त्यांच्या निदिध्यासाचे उत्कट दर्शन घडते.