साद

0
200
  • वसंत रघुनाथ सावईकर

तो घरटे राखणारा चिमणा एका वेगळ्या प्रकारे ओरडल्यावर ते सारे पक्षी त्या सापावर तुटून पडले आणि त्याला चोची मारू लागले. काही क्षणात तो साप खाली उतरला आणि पळून गेला. ही पक्ष्यांनी घातलेली विशिष्ट प्रकारची ‘साद’ त्या लहान जीवांचे रक्षण करून गेली.

माझे बालपण तसे लाडातच गेले. बर्‍याच वर्षांत पाळणा हलला नसल्याने मी आईचा फार लाडका होतो. माझ्या बाललीलांनी घराचे गोकुळ झाले म्हणे. मला माझी आजी आठवते. तिच्या चेहर्‍यावर सुरकुत्या बर्‍याच होत्या. निमगोरा रंग, स्थूल बांधा, अंगावर सौभाग्य लेणे, हातात पाटल्या, कपाळावर मोठे कुंकू, खणाची चोळी, नऊवारी लुगडे अशी तिची राहणी. माझे आजोबा कोपिष्ठ होते. मी त्यांना फार भीत असे. मी सारखा आजीजवळच असे. आजी म्हणजे मायेचे सागर होता.

मायेचे पांघरुण घालणारी माझी आजी मला फार आवडे. ती रोज रात्री गोष्टी सांगे. रात्रीची जेवणे झाली की झोपण्याआधी एक गोष्ट ठरलेली. एका विशिष्ट वातावरणात ती गोष्ट सांगण्यास सुरुवात करी. खोलीत देवाचा देव्हारा होता. देव्हार्‍याच्या बाजूला एक तेलाची समई अखंड तेवत असे. तिचा सौम्य प्रकाश खोलीभर पसरे, आणि अशा वेळी बाहेरील मिट्ट काळोख अधिकच गूढ वाटे. त्या शांत वातावरणात बाहेर रातकिडे किरकीर करीत आणि त्या मैफलीतच आमच्या गोष्टीला रंग येई. समईच्या सौम्य प्रकाशात आजीचा चेहरा उजळून दिसे.

गोष्ट ऐकण्याची उत्सुकता असेच, पण अंधाराची थोडी भीती वाटे. मी आजीला बिलगून झोपायचो. भीती वाटलीच तर तिच्या कुशीत शिरायचो. आजी गोष्टीला सुरुवात करताना नेहमी ‘आटपाट नगर होते’ अशी करी आणि त्या वातावरणात घेऊन जाई. गोष्ट सांगण्याचे एक अजब असे कौशल्य तिच्याजवळ होते. कथा सांगत असताना ती गोष्टीतल्या व्यक्ती, प्रसंग, वातावरण अगदी जिवंत करीत असे. तिच्या सार्‍या कथा चातुर्मास पुस्तकातील असत. सोमवारची कहाणी, मंगळागौरीची कहाणी, शुक्रवारची कहाणी, शिवामुठीची कहाणी, तर कधी भाऊ-बहिणीच्या प्रेमाची कहाणी पण असे. कधी कोणी व्रत पूर्ण केले नाही किंवा अपूर्ण राहिले तर त्याला कसा शाप मिळाला किंवा त्याने शापमुक्तीसाठी कोणते व्रत केले, या आणि अशाच गोष्टी असत. गोष्ट संपविताना ‘साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण’ असे म्हणत असे.
तिची गोष्ट संपली तरी मी कितीतरी वेळ त्या वातावरणातच असे. आजी या सार्‍या कथांतून मला नैतिकतेचे धडे देत असे. माझ्या आठवणीत माझी आजी मला एकाकी कधी दिसलीच नाही. आजीचे ‘फडताळ’ म्हणजे माझ्या मते मोठा खजिनाच होता. काय नसायचे त्यात? खारिक, शेंगदाणे, गूळ, खडीसाखर…! मी कधी खेळून थकून आलो आणि तिला बिलगलो की ती हातावर खडीसाखर आणि खारिक ठेवत असे. हे तिचे फडताळ कुलूपबंद असे. मला तर ते अलीबाबाची गुहाच वाटे. घराचा आणखी एक भाग मला आवडायचा तो म्हणजे कोनाडा. या कोनाड्यात काही ना काही असे. एका कोनाड्यात दिवा लावलेला असे. त्या दिव्याच्या प्रकाशात तो भाग उजळून जायचा. आजी संध्याकाळी मला पिंपळाच्या पाराजवळ घेऊन जायची. गाईच्या गोठ्यात पण एक कोनाडा होता. तिथे पण आजी संध्याकाळी दिवा लावीत असे. देवाधर्माचे आजीने माझ्यावर केलेले संस्कार फार मोलाचे आहेत.

माझी आजी इतर बायकांबरोबर नागपंचमीच्या खेळात पण भाग घ्यायची. ‘चल ग सखे वारुळाला, नागोबाला पूजायला’ म्हणत गोल फेर धरायची. माझी आजी वृत्तीने धार्मिक होती. गावातील देवळात कीर्तन असल्यास ती चुकवीत नसे. रामजन्माचे, कृष्णजन्माचे पाळणे सुंदर म्हणे. आमच्या घरात काही ना काही देवकार्य असे. शिवाय दर सोमवारी महादेवाच्या देवळात जाणे असे. ती सोबत मला पण घेऊन जायची. माझे शिक्षण चालू झाले होते. वाटेत एक ओहोळ होता. तिथे आमची शेती, पोपळी, नारळीची बागायत होती. शिवाय आंबे, फणस, काजू अशी सर्व प्रकारची झाडे होती. त्यावेळी त्यांना बाजारात भाव नसे. फणस पिकल्यावर त्याचे अनेक प्रकार होत. घरात पोटभर खात आणि शेजार्‍यांनाही देत. मार्च-एप्रिलमध्ये आमसोल तयार करीत. काजू जमा करीत. बायका पापड, सांडगे घालीत.

माझी गावातील शाळा संपली होती. मी आता शहरात शिकत होतो. तिथेच राहत होतो. परीक्षा संपली की गावी येण्याचे, आजी-आईला भेटण्याचे वेध लागत. आता आजीच्या गोष्टी ऐकण्यापेक्षा मी पण गोष्टी सांगू शकत होतो. मी शहरात राहत असलो तरी मनाने गावातच असे. मी गावी आलो की आजीला खूप आनंद होई. रात्री झोपतेवेळी आजीने गोष्टीला सुरुवात केली की मी म्हणत असे, ‘‘आजी, तू मला खूप गोष्टी सांगितल्या, आता मी पण तुला गोष्टी सांगू शकतो.’’ मी तिला गोष्ट सांगे. पण तिच्या गोष्टीची सर माझ्या गोष्टीला येत नसे. खरं तर गावी येण्यासाठी मे महिन्याची सुट्टी किंवा दिवाळीची सुट्टी हवी असे. पण कोणत्याही निमित्ताने मी गावी येण्यास उत्सुक असे.

आता शिक्षण पुरे झाले. नोकरी पण शहरातच लागली. गावात कधीतरी येणे व्हायचे. दिवाळी, गणेश चतुर्थी या सणाच्या दिवशी मी सहकुटुंब येत असे. एकदा दिवाळीत मी सहकुटुंब गावी आलो होतो. सुट्टी पाच दिवसांची असल्याने मी गावीच राहणार होतो. थंडी बरीच पडली होती. धुके पण बरेच होते. शहरात थंडीची, धुक्याची मजा लुटता येत नाही. उणिवा भासू लागतात, परकेपणा जाणवतोच. शहरात पुष्कळ दिवस राहून खेड्यात गेल्यावर हा फरक लक्षात येतो. गावात सफेद, निळ्या रंगाने भरलेल्या विस्तीर्ण आकाशाच्या दर्शनाने मन प्रसन्न होते. सार्‍या सृष्टीने धुक्याचे शूभ्र वस्त्र पांघरल्याचा भास होतो. सकाळी पाखरांचा ऐकू येणारा किलबिलाट, अंगणात येऊन चिमण्यांचे दाणे टिपणे, समोरच्या आंब्याच्या झाडावरील कावळ्यांचा गोंगाट, दारात फुलत असलेल्या प्राजक्ताच्या फुलांचा सडा आणि त्याचा येणारा मंद सुवास… सारे कसे मन प्रसन्न करते.

त्या सकाळी मी आरामखुर्चीत विश्रांती घेत बसलो होतो. समोरच्या आंब्याच्या झाडावर एकदम एक वेगळ्या प्रकारचा चिवचिवाट ऐकू आला. चिमण्यांचाच तो आवाज होता, पण वेगळा वाटत होता. मी बारकाईने पाहू लागलो तर त्या झाडाच्या फांदीवर एक चिमणीचे घरटे होते आणि एक चिमणा किंवा चिमणी त्या घरट्याच्या बाजूलाच बसली होती. घरट्यातील तीन चिमण्यांची पिल्ले चोची बाहेर काढून पाहत होती आणि ती फांदीवरील चिमणी एका वेगळ्याच विशिष्ट आवाजात ओरडत होती. चिमणीचा हा आवाज वेगळाच वाटल्याने मी बारीक लक्ष देत होतो. तिच्या त्या आवाजामुळे तिथे बर्‍याच चिमण्या गोळा झाल्या आणि त्या सार्‍या एका वेगळ्याच आवाजात ओरडू लागल्या. मी निरीक्षण करीत होतो. एक साप एका फांदीवरून त्या घरट्याकडे येत होता. ती पिल्ले त्याने पाहिली असावी. तीच खाण्यासाठी तो तिकडे सरकत होता. तो घरटे राखणारा चिमणा एका वेगळ्या प्रकारे ओरडल्यावर ते सारे पक्षी त्या सापावर तुटून पडले आणि त्याला चोची मारू लागले. काही क्षणात तो साप खाली उतरला आणि पळून गेला. माझ्या लक्षात आले, एका वेगळ्या प्रकारच्या आवाजाने ‘साद’ घातल्याने हे सारे पक्षी तेथे जमा झाले असावे आणि आपल्या मित्रांच्या पिल्लांना रक्षण देण्यासाठी पुढे सरसावले असावे. त्यांचे जीव त्यांनी वाचविले. ही पक्ष्यांनी घातलेली विशिष्ट प्रकारची ‘साद’ त्या लहान जीवांचे रक्षण करून गेली.