साडेचारशे किलो भेसळ खवा जप्त

0
133

अन्न आणि औषध प्रशासनाने काल पणजी पालिका मार्केटमधील सनराईज स्विट्‌सच्या बेती येथील मिठाई तयार करण्याच्या ठिकाणावर छापा मारला व कसलीच माहिती देणारी लेबल्स न लावलेल्या खव्याच्या १५ बॅगा ताब्यात घेतल्या. ४५० किलो एवढा हा खवा आहे. भेसळीचे खाद्यतेलही यावेळी सापडले. अत्यंत अस्वच्छ अशा वातावरणात हे पदार्थ ठेवण्यात आल्याचे प्रशासनाला आढळून आले.
याशिवाय १२ बॅगांमध्ये भरून ठेवलेले १५० किलो एवढे फरसाणही जप्त करण्यात आले. या बॅगांवरही फरसाण कधी तयार करण्यात आले त्यासंबंधीची माहिती देणारी लेबल्स नव्हती असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हा संपूर्ण माल सुमारे ९० हजार रु. चा असून तो जप्त करण्यात आला असल्याचे संचालक सलीम वेलजी यांनी सांगितले.