सागरी क्षेत्रात शांतता प्रस्थापित होण्याची आवश्यकता : संरक्षणमंत्री

0
131

> > सागरी परिषद-२०१७ चे उद्घाटन

>> आयएनएस मांडवी येथे आयोजन

समविचारी राष्ट्रांनी सामूहिक प्रयत्नांच्या माध्यमातून भारतीय महाद्वीपात नव्याने उद्भवणार्‍या धोक्यांना आटोक्यात आणण्याची आवश्यकता आहे. भारतीय महाद्वीपामध्ये जागतिक भवितव्य बदलण्याची क्षमता आहे. त्यामुळे आपसात राजकीय आणि आर्थिक संवाद प्रस्थापित झाला पाहिजे, असे मत संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल येथे व्यक्त केले.

संरक्षण मंत्र्यांहस्ते काल आयएनएस मांडवी येथे आयोजित दोन दिवसीय सागरी-परिषद २०१७ चे उद्घाटन झाले. या परिषदेच्या निमित्ताने सागरी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी काय करता येईल यावर सर्वांची मते जाणून घेता येतील, असे त्या म्हणाल्या. काही देशांच्या धोरणांमध्ये असलेली अपारदर्शकता आणि संदिग्ध वर्तणूक यामुळे देशा-देशांमधील संबंधांमध्ये विश्वासार्हता निर्माण होत नाही. भूभागावर सीमाविषयक प्रश्न जे वसाहतवादाकडून वारशाने मिळाले आहेत, त्यांच्यामुळेही संबंधांमध्ये बाधा निर्माण होते. तसेच भिन्न विचारसरणी, राजकीय अस्थैर्य, आर्थिक निर्भरता, तांत्रिक निर्भरता, भौगोलिक मर्यादा या बाबी देशांमध्ये संबंध प्रस्थापित होण्यास कारणीभूत ठरतात, असे त्या म्हणाल्या. या परिषदेमध्ये सागरी सुरक्षा आव्हाने, भारतीय महासागरात संवादावर भर देऊन मतभेद दूर करणे, यावर परिषदेत ऊहापोह करावा, असे सूचना त्यांनी केली.

गोवा नाविक युद्ध महाविद्यालयाने या परिषदेचे आयोजन केले आहे. काल सकाळच्या सत्रात ऍडमिरल (निवृत्त) अरुण प्रकाश, श्रीलंकेचे ऍडमिरल (निवृत्त) डॉ. जयनाथ कोलोंबगे, संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ ऍशले टेलीस यांनी पहिल्या सत्रात सादरीकरण केले. या परिषदेला भारत, बांगलादेश, इंडोनेशिया, मालदीव, मलेशिया, मॉरीशस, म्यानमार, सेशल्स, सिंगापूर, श्रीलंका व थायलंड या देशांचे नौदल प्रमुख उपस्थित राहणार आहेत.