साखळी पालिकेसाठी आजपासून अर्ज स्वीकृती

0
98

साखळी पालिकेच्या येत्या ६ मे च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज आज गुरुवार १२ एप्रिलपासून उपजिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकारण्यात येणार असून त्यासाठी डिचोली कार्यालयात सर्व तयारी करण्यात आलेली आहे.
साखळी पालिका ११ प्रभागांवरून आता १३ प्रभागांची झाली असून विद्यमान नगरसेवकांबरोबरच अनेक नवीन उमेदवारांनी पालिका निवडणुकीत उतरण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे.

भाजपा विरुद्ध नगराध्यक्ष धर्मेश सगलानी गट असा हा सामना रंगणार असून आरक्षणाच्या कात्रीत अनेकांचे पत्ते गुल झाल्याने त्यांनी इतर प्रभागात आपला मोर्चा वळवताना सोयीस्कर ठिकाणी चाचपणी सुरू केली आहे.
गेल्या पाच वर्षांत साखळी पालिकेत राजकारण बरेच रंगलेले असून आरोप प्रत्यारोपांच्या फेर्‍यात विकासावर परिणाम झाल्याची प्रतिक्रिया साखळीतील नागरिकांनी केली आहे.

नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांनी सांगितले की, सरकारने विकासासाठी सहकार्य केलेले नाही. आता शेवटच्या टप्प्यात पालिका निधीतून अनेक योजनांना चालना दिली असल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे भाजपाचे आमदार तथा सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी धर्मेश सगलानी यांना विकासाकडे सतत राजकारण केल्याने प्रकल्प ठप्प झाल्याची टिका केली आहे.