साखळीत कारमध्ये सापडली १५ लाखांची रोख रक्कम

0
103

>> पैसे कॅसिनोत मिळवल्याचा संबंधितांचा दावा

डिचोली पोलिसांनी सोमवारी रात्री गोकुळवाडी साखळी येथे केलेल्या कारवाईत एका कारची तपासणी केली असता त्यात सुमारे १५ लाख रुपयांची रोख रक्कम सापडली. याप्रकरणी पोलिसांनी कारमधील तेलंगण येथील तिघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. त्यांच्याविरुध्द १०२ कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांना पणजीहून बेळगावच्या दिशेने जाणारी एस ०२ एआर ९००० या क्रमांकाची गाडी संशयास्पद वाटल्याने ती रोखली. यावेळी गाडीची तपासणी केली असता त्यात १५ लाखांची रोकड सापडली.
कारमध्ये किशोरकुमार आचारी (वय ३२), कनक अगरवाल (वय ३३) व डी. शर्मा (वय ३२) असे तिघे तरूण होते. त्यांच्याकडे या रक्कमेविषयी चौकशी केली असता त्यांनी आपण ही रक्कम पणजीतील एका तरंगत्या कॅसिनोत जुगार खेळून मिळवल्याचे सांगितले.