साखळीतील रुग्णसंख्या २६ वर

0
180

>> मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांच्या गावी कोरोनाचा वाढता प्रसार

>> दिवसभरात सापडले १३ रुग्ण

साखळीत करोनाचा प्रसार वाढत असून काल सोमवारी एकाच दिवशी १३ रुग्ण सापडल्याने साखळीतील एकूण रुग्णसंख्या २६ झाली आहे. दरम्यान, रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.

साखळी इस्पितळाचे अधिकारी डॉ. उत्तम देसाई यांनी, देसाईनगर येथे काल ८, भंडारवाडा येथे ३, गृहनिर्माण परिसर १ व गावठण परिसरात १ असे एकूण १३ रुग्ण सापडल्याचे सांगितले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांच्या गावी कोरोनाचा प्रसार वाढला असल्यामुळे सर्व परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून सर्व भाग सील करण्यात आला आहे.

साखळीत सोमवारी १६२ लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्या. साखळी पालिकेने काल सायंकाळी विशेष बैठक घेत परिसरात सतर्कता वाढवत गावठण गाव, देसाईनगर आणि मुजावरवाडा सील केला आहे. तर कारापूरवासीयांनी स्वयंस्फूर्तीने काल बंद पाळला.
साळमध्ये स्थिती नियंत्रणात

साळ गावात परिस्थिती नियंत्रणात असून ज्या ठिकाणी चार रुग्ण सापडले तो भाग सील केला आहे. आरोग्याधिकारी डॉ. मेधा साळकर यांनी अनेकांची तपासणी केली. त्यातील ८ जणांचे अहवाल येणे बाकी आहे. साळमध्ये काल घरोघरी फवारणी करण्यात आली. आमदार राजेश पाटणेकर, सरपंच घनःश्याम राऊत आदी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

साखळीची बाजारपेठ बंद
साखळी बाजारपेठ गेले चार दिवस बंद असून ती पुढील काही दिवस बंद ठेवण्याची शक्यता आहे. लोकांना जीवनावश्यक वस्तू पुरवल्या जात आहेत. मुख्याधिकारी प्रवीणजय पंडित यांनी साखळी व परिसरात सर्व ती खबरदारी घेतली जात असून औषध फवारणी तसेच जमाव बंदी व इतर खबरदारी घेतली जात असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी या परिसरात सर्व ती खबरदारी घेण्याचे आदेश दिले असून लोकांनी कारणाशिवाय फिरू नये. सुरक्षित अंतर राखावे व मास्क घालणे आदी काळजी घेण्याची विनंती केली आहे.